आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तिरुवनंतपुरम - देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगरच्या प्रांजल २०१६ मध्ये पहिल्या प्रयत्नातच यूपीएसी उत्तीर्ण झाल्या. त्यांना ७७३ वी रँक मिळाली. त्यांना भारतीय रेल्वे लेखा सेवेत (आयआरएएस) पाठवण्यात आले, पण रेल्वेने दृष्टिहीनतेमुळे त्यांना नोकरी देण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी प्रांजल यांनी यूपीएससीत १२४ वी रँक मिळवली.
६ व्या वर्षी वर्गात विद्यार्थिनीने डोळ्यात मारली होती पेन्सिल
हिंमत, विश्वास आणि निर्धार असला तर शारीरिक अक्षमतेवर मात करून यशाचा मार्ग गाठता येतो हा धडा प्रांजल यांच्या कथेतून मिळतो. प्रांजल ६ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने त्यांच्या डोळ्यात पेन्सिल मारली होती. त्यानंतर त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पालकांनी मुंबईच्या दादर येथील कमला मेहता शाळेत दाखल केले. तेथे ब्रेल लिपीत शिकवले जायचे. तेथे दहावीपर्यंत शिकल्यानंतर चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेत १२ वी केली, तीत प्राजल यांना ८५% गुण मिळाले. बीएसाठी त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजला प्रवेश घेतला. पदवी पूर्ण होताच प्रांजल यांनी दिल्लीत जेएनयूमधून एमए केले. त्यानंतर खरे उद्दिष्ट होते यूपीएससीची तयारी. वर्ष होते २०१५. दरम्यान, प्रांजल यांचा विवाह केबल ऑपरेटर कोमलसिंह पाटील यांच्याशी झाला. शिक्षण सोडणार नाही, अशी अट त्यांनी विवाहाआधी घातली. प्रांजल यांनी कोचिंगशिवाय यूपीएससी उत्तीर्ण केली. जपानचे बौद्ध दार्शनिक डाईसाकू इगेडा यांचे साहित्य वाचून प्रांजल यांच्या दिवसाची सुरुवात होते. काहीही अशक्य नाही ही प्रेरणा प्रांजल यांना त्यांच्यापासून मिळते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.