आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसाद कुमठेकर
जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब-श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा असंच आजच्या ‘मी’चं अगदी पोटतिडकीचं म्हणणं आहे. थोडक्यात, आजचा ‘मी’ तसा खूपच ओपन आहे.
मी "भारतीय' आहे. ‘मी’ कोत्या मनाचा, दोषयुक्त दृष्टीचा आणि हलक्या कानाचा नक्कीच नाही असं ‘मी’चं स्वतःबद्दलचं आकलन आहे. आजचा ‘मी’ शिकलाय. न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही सर्वोच्च मानवी मूल्ये आहेत हे भूतकालीन ‘मी’कडून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून ती राज्यघटना देशात जेव्हा अमलात आली त्याच क्षणी ते तुम्हा-आम्हा सामान्य गुणीजनाप्रमाणेच भूतकालीन ‘मी’ने स्वीकारलेली आपली जगश्रेष्ठ राज्यघटना वर्तमानकालीन ‘मी’ने मान्य केलीय. आणि एक सच्चा व अच्छा भारतीय असल्याप्रमाणे राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या या गोष्टी आपण चुपचाप स्वीकारल्यात(न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य) याचासुद्धा ‘मी’ला प्रचंड अभिमान आहे. आणि तो अभिमान ‘मी’ छुपेपणाने तर कधी कधी खुलेपणाने मिरवतोसुद्धा. तर आपल्या ‘मी’ला असाच किंवा यापेक्षा काकणभर जास्तच आणखी बऱ्याच लहान आणि लहानपेक्षा लहान गोष्टींचा अभिमान आहे. आणि तो अभिमान अतिशय जाज्वल्यसुद्धा आहे. उदाहरणार्थ -‘मी’च्या गौरवमय परंपरेचा, ‘मी’च्या प्रमाण भाषेचा, ‘मी’च्या देदीप्यमान संस्कृतीचा, ‘मी’च्या पशुप्रेमी व दुग्ध शाकाहारी असल्याचा, ‘मी’ने केल्या ‘मी’ने खात्या पदार्थांचा, ‘मी’च्या पितृसत्ताक कौटुंबिक पद्धतीचा, ‘मी’चे खापरपणजोबा, वडील, भाऊ, भाऊजी, आई, बहीण, नातेवाअकांचा, ‘मी’ दाखवत असलेल्या आदराचा, आपुलकीचा, ‘मी’ने कधीही न वाचल्या वेदांचा, उपनिषदांचा, ‘मी’ने ताळल्या नं ताळल्या शास्त्रांचा, ‘मी’ला मान्य झालेल्या शिक्षणपद्धतीचा, ‘मी’कडच्या हवामानाचा, ‘मी’च्याच फळांचा, फुलांचा, ‘मी’ला आवडणाऱ्या पक्षांचा, ‘मी’कडे असलेल्या प्राण्यांचा, ‘मी’च्या खिडकीमधून बाहेर दिसणाऱ्या तलाव, नद्या, समुद्र, सह्याद्रीच्या रांगांचा, ‘मी’ची श्रद्धा असलेल्या संताचा, ‘मी’च्या श्रद्धेचा, ‘मी’च्या अखत्यारीत असलेल्या भूमीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘मी’च्या धर्माचा, जातीचा आणि त्यापेक्षा खंडीभर जास्त ‘मी’च्या पोटजातीचा. पण ‘मी’च्या मते या शेवटच्या तीन गोष्टी अत्यंत खासगी आहेत आणि त्या तो कधीही सार्वजनिक होऊ देत नाही. कुलधर्म कुलाचार म्हणून जे काही आहे ते फक्त घरातल्या एका कोपऱ्यापर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे असं सर्वसमावेशक ‘मी’चं म्हणणं आहे. आणि आजच्या ‘मी’ने ते तसंच ठेवलंयसुद्धा. आणि तरीसुद्धा ‘मी’ला वाईट वाटतं की अजूनही त्याच्या खांद्यावर हात ठेवला जातो आणि त्याचा तो नेमका कोण याची चाचपणी केली जाते. भारतीयांच्या या मानसिकतेबद्दल प्रख्यात मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ सुधीर कक्कड यांच्या The Indians: Portrait of A People पुस्तकात ते विशद करतात की, युरोपात किंवा अमेरिकेत व्यक्तीनं आपले फक्त नाव सांगितले की ओळख होते आणि तेवढी ओळख पुरते. पण भारतीयांचं तसं नाही. ते नाव,आडनाव, गाव, पाहुणेरावळे यांच्या ओळखीतून त्या व्यक्तीच्या मूळ जातीपर्यंतची ओळख मिळवू इच्छितात आणि त्यावरून त्याच्याशी आपला व्यवहार ठरवतात. कटू आहे पण सत्य हेच.
असेल ते असो, पण ‘मी’च्या मते ‘मी’ टोकाची जात-पात मानत नाही. मी अमुक जातीचा आहे म्हणून ‘मी’साठी एखादं दार बंद झालंय किंवा ‘मी’ला कुठे नकार मिळालाय, असं झालेलं नाही असा ‘मी’चा स्वानुभव आहे असं "मी' खात्रीपूर्वक सांगतोसुद्धा. ‘मी’च्या मते ‘मी’ची क्षमता नव्हती म्हणून ‘मी’च्या पदरी अपयश आलं किंवा ‘मी’ला नाकारण्यात आलंय, त्यात ‘जात’ हा मुद्दा कुठेच नव्हता. आणि खरं तर दोन शून्य दोन शून्यच्या सांप्रतकाळात तसा मुद्दा नसावाच असं ‘मी’ला प्रकर्षानं वाटतं. आणि खासगीत नेहमी आणि सार्वजनिकरीत्या शक्य झाल्यास ‘मी’ तसं कुजबुजतो किंवा बोलतो की ‘आरक्षण आर्थिक निकषावर असावं. (पूर्णविराम) का? (प्रश्नार्थक चिन्ह) अर्थात बोलताना वाक्यात येतो तसा पूर्णविराम टाकून विषय संपवण्याची हिंमत सध्यातरी ‘मी’ करत नाही. कारण ‘मी’च्या मते ‘मी’ शोषितांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. आधी सांगून झाल्याप्रमाणे ‘मी’च्या मते ‘मी’ने जातिव्यवस्थेला कधीच महत्त्व दिलेलं नाही. कारण उदारीकरणाच्या आसपास ज्या कुटुंबात ‘मी’ जन्मला आणि वाढला तिथे त्याच्यासमोर कुणीही, कधीही जाती-पातीची चर्चा केलेली नाही. त्याच्या स्वच्छ, सुंदर, सफेदी की चमकारवाल्या उत्सवप्रिय समाजवर्तुळात आणि वर्तुळाच्या ऑफव्हाइट आजूबाजूलासुद्धा त्याला तसं करताना कुणी दिसलं नाही. ‘मी’च्या या संस्कारकोटीय, सरळरेसीय (रेषीय नाही ‘रेस’वाले रेसीय) विचारसरणीमुळं त्याला त्याच्या आजूबाजूला असणारी ती जीवघेणी ‘जात-पात’ दिसलेली नाही. कदाचित "मी' ते afford करू शकत असल्यानं त्यानं फोकस टाकून ती आहे की नाही हेच कधी पाहिलं नाही. आणि त्यामुळेच कदाचित ‘मी’ला ते कधीच जाणवलंदेखील नाही. असो...
सांप्रतकाळात जात आणि जातिव्यवस्था ही ऐतिहासिक मिथके आहेत असं सर्रास बोललं जात असताना अतिप्राचीन, प्राचीन, मध्य, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर सरंजामी इतिहासात अंत्यजावर झालेल्या अपरिमित अन्यायाचे, शोषणाचे ठळक ठळक दाखले टनाने मिळतात याचं ‘मी’ला मनापासून अत्यंत वाईट वाटतं. आणि जे ‘झालं’ ते अत्यंत घृणास्पद, अत्यंत वाईट, मानवतेला काळिमा फासणारं होतं हेसुद्धा ‘मी’ मान्यच करतो. आपल्या विद्रोही मित्रांशी ही अन्यायकारक जुनी व्यवस्था जातींच्या नव्या सरंचनेमध्ये अजूनही कशी टिकून आहे याचं चर्वितचर्वण करताना ‘मी’... मी ‘ते’ कसं केलं नाही, करत नाही हेच सांगत ‘करे कोई भरे कोई’ हा हिशेब किती योग्य असतो? असा ‘रास्त’ प्रश्नही सातत्याने उभा करतो. आणि आजही अशी अति अति अति नजदीकच्या काळातील अत्यंत अन्यायी, शोषित, पीडित समाज उदाहरणे समोर आली की व्यथित होऊन त्याबद्दल आम्हा आम्हा गुणीजनांसारखी दिलगिरी व्यक्त करून त्याबद्दल ‘कडे शब्दो में निंदा’ करण्याचा मनाचा मोठेपणा नक्कीच ‘मी’मध्ये आहे. जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब-श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा असंच आजच्या ‘मी’चं अगदी पोटतिडकीचं म्हणणं आहे. थोडक्यात, आजचा ‘मी’ तसा खूपच ओपन आहे. बेटीबंदी, रोटीबंदी, व्यवसायबंदी, स्पृशताबंदी, श्रेष्ठ-कनिष्ठता ही जातिव्यवस्थेची प्रमुख लक्षणे आहेत. ही सारीच लक्षणे जन्माधारित आहेत व त्या सर्वाचा मूलाधार बेटीबंदी हा आहे. बेटीबंदी तोडली की जातिव्यवस्थेची सारीच लक्षणे नाहीशी होतात व म्हणून जातींची ही उतरंड व्यवस्थाच उखडून फेकायची असेल तर बेटीबंदीच तोडली पाहिजे असं ‘मी’ वाचून, ऐकून, अभ्यासून आहे. त्याचं महत्त्व त्याला कळलंय, पण ‘मी’ला अजून ते वळलेलं नाही. पाहिजे जातीचेवाल्या ‘मी’च्या मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात ‘मी’ला अजूनही असंच वाटत राहतं की जाती अंतासाठी ‘मी’ने काहीतरी ‘दुसरं’ केलं पाहिजे. ‘मी’ला असं सतत वाटत राहतं की ‘खाप’ आपल्याकडे आता अजिबात उरली नाही. आणि मग ‘मी’च्या या विचारांचा काडकन कंडका पाडून त्याची माती करणाऱ्या खैरलांजीसारख्या सातत्याने समोर येणाऱ्या घटना ‘मी’ला प्रचंड हादरवून टाकणाऱ्या, निंदनीय, निषेधात्मक जरी वाटल्या तरी त्या आता कमी, अगदी कमी, जवळजवळ ‘अपवादात्मक’ झाल्यात असंसुद्धा ‘मी’ला सारखं सारखं वाटत राहतं. आजच्या संवेदनशील, अभ्यासू, विकिपीडीय ‘मी’ला असंच वाटतं की आता आपल्या स्वतंत्र भारतात कास्टिझम जाऊन क्लासीझम आलंय. आता संघर्ष ‘पोतंभर पैशे आणि मूठभर पैशे’ अशा दोनच वर्गात सुरू आहे बस. एकंदर "मी'चा समग्र समाज, त्याच्या आजूबाजूच्या समस्त जैविक भूगोलाने तयार होणारा त्याचा उदार समाजविचार आणि त्यामुळे मायक्रॉन (Micron) मायक्रॉन्सने का होईना वाढत जाणारी "मी'ची समज ही सतत उन्नत, करुणामय होत राहावी अन् बदलताना त्याच्या कानात पडत राहावा नामदेव ढसाळांचा शब्दनिखारा, ज्याने तुला आपले सर्वस्व दिले, तुझे ताजमहाल खडे केलेका आठवत नाहीस त्यांना ? ज्यांच्या हाडामांसाचा खच आजही तुझ्या किल्ल्याकिल्ल्याच्या पायथ्याशी कण्हतो आहे, सांग त्यांच्यासाठी का लिहीत नाहीस मैलामैलाच्या, दगडावर एखादी ओळ ?
लेखकाचा संपर्क - ९८२००४५८२४
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.