दानतवाली दिवाळी / दानतवाली दिवाळी

प्रसन्न जोशी

Nov 11,2018 06:58:00 AM IST

आपण सारे उत्सवप्रिय आहोत. पण हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही? आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय.

आजचा ‘दिव्य मराठी’ अंक हातात पडताना दिवाळी संपत आली असणार आणि आठवडाभराच्या दिवाळी दगदगीनंतर रविवारच्या सुस्तावलेल्या सकाळी तुम्ही थोडे निवांत असणार. फराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके कोपऱ्यात फडफडणाऱ्या रॅपरसह पडून असतील. आजच म्हणजे, आजच्याच रविवारी वाचायचे म्हणून आतल्या खोलीत किंवा हॉलमधल्या कोपऱ्यावरच्या टेबलवर पाच-दहा दिवाळी अंक पान उलटण्याची वाटही पाहत असतील. त्यातून तुम्ही ‘आऊटडोर’ असाल तर प्रश्नच मिटला. तर ते असो.


आपण उत्सवप्रिय आहोत. याचसाठी मला तुम्हा सर्वांचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं. रसायनशास्रात जसा निष्क्रिय एजंट असतो मी व्यक्तिश: उत्सवांच्याबाबतीत तसाच आहे. पण तरीही ही उत्साहाची सालाबाद उधाणं माझ्यावरही आनंदाचे शिडकावे करून जातातच. पण एक खंत आहे. व्यक्तिगत आणि सामाजिकही. हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही? लक्षात घ्या गरज असलेल्या, नियमित आणि शाश्वत रूपात. आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय. फक्त भावनेचे कढ नाही, तर देण्याचं विचारपूर्वक नियोजन म्हणायचंय मला. आपण पैशाचं, संपत्तीचं जसं अधिकाधिक फायद्यासाठी नियोजन करतो, तीच शिस्त मला या ‘देण्याच्या प्लॅनिंग’मध्ये अपेक्षित आहे.


आपलं कसंय ना, की आपण मराठी किंवा एकूणच भारतीय लोक मुळात पैसा सेव्हिंगवाले. लहानपणापासून कॉईन जमा करण्याच्या सवयीपासून मोठेपणीही काटकसर आणि बचत हेच आपलं प्रमुख आर्थिक वर्तन असतं. आता कुठे जरा मराठी मध्यमवर्गात शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफ वगैरे शब्द ऐकायला येताहेत. मग जिथे पैसा साठवण्याची, वाढवण्याची ही तऱ्हा तिथे तो उदात्त सामाजिक भावनेने देण्याबाबत तर आणखीच आनंद! अपवाद सोडता बहुतेक वेळी आपलं देणं म्हणजे जुने कपडे, उरलेलं अन्न किंवा नवे कपडे आणि फराळ, धान्य वगैरे. कधी तरी माहीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा कलाकाराच्या संस्थेला पैसे देणं. तुम्ही जरा जास्त हात ढिला सोडणारे असाल तर आपल्या परिसरात कार्यक्रम करा, हरिनाम सप्ताह आयोजित करा, वारकऱ्यांना जेवण ठेवा, एखाद्या संस्थेला, मंदिराला मोठी देणगी द्या वगैरे. चला हेही ठिकच. पण, याहीपुढे जाता येऊ शकतं का? किंवा हे जे काही करतोय तेवढ्याच पैशात अधिक चांगला विनियोग होऊ शकतो का? एक निरीक्षण मांडून पुढे जातो.


आपल्याकडे शिर्डी, लालबागचा राजा, सिद्धीविनायक अशा देवस्थानांकडे मोठ्या प्रमाणात देणग्या, वस्तू स्वरूपात दान येतं. या रकमा कोट्यवधींच्या आहेत. अशी अनेक देवस्थानं आहेत. परवा, कोलकोत्यातील एका भक्तानं तर कोल्हापूरच्या अंबाबाईला एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. भक्तांच्या म्हणजे पर्यायानं तुमच्या या भक्तीचा मी आदर करतो. पण, एवढ्या प्रचंड पैशाचा देवाला तर थेट उपयोग नाही. म्हणजे, या पैशाचा जो काही सेवाभावी उपयोग देवस्थान करणार ते तिथल्या व्यवस्थापन समितीतले लोक विचार करू शकतील तसा. साधारणपणे हा पैसा भक्तनिवास, रूग्णालय, जीर्णोद्धार, गरजूंना आर्थिक मदतीचं वाटप या स्वरूपात जातो. म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्ती आणि तुम्ही ज्यांना पैसा, सोनं वैगरे देता ज्यांच्याद्वारे पुढचं सेवाकार्य होतं, त्याचा परिघ फारच मर्यादित आहे. ...आणि म्हणूनच आपल्याला गरज आहे ते दानतीच्या नियोजनाची. त्यातल्या बारकाव्यांना जाणण्याची आणि डावं-उजवं करण्याची. सगळ्यात आधी देवस्थानांना किती पैसा-सोनं-नाणं द्यायचं,याचा काही एक धरबंद आपण ठेवायला हवा.

विविध लोककल्याणकारी कार्यात गुंतलेल्या व्यक्ती-संस्था-उपक्रमांना आपण हा पैसा विविध मार्गांनी देऊ शकतो. आज अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या बाजूला आहेत. त्यातील काही व्यक्ती-संस्थांना आपण ओळखत असतो. माध्यमांमधूनही अशा व्यक्ती-संस्थांचा बराच लौकीक तयार होतो. मात्र, मी या लोकांना-संस्थांनांनाही देवस्थानांसारखंच मानतो. होतं काय की ज्यांना लोकांपर्यंत जाणं शक्य आहे, त्यांना लगेच मदत मिळते. समाजकार्यात त्यांचा ब्रँड तयार झालेला असतो. मात्र, त्यांच्यापलीकडे असा हजारो व्यक्ती संस्थांना तुमच्या मदतीची गरज असते.

ही मदत तुम्ही वर्षभर करू शकता. चांगल्या मराठी नाटकांना जाणं, मराठी कला-संस्कृतीच्या कार्यक्रमांना आवर्जून तिकिट काढून जाणं, महिन्याकाठी उत्पन्नाच्या पटीत किमान १०० ते जमतील तेवढ्या पैशांची पुस्तकं, नियतकालिकं घेणं, पुस्तकं भेट देणं, दर्जेदार साहित्यिक-बौद्धिक कार्यक्रमांना शुल्क असेल तर पैसे भरून आणि नसेल तर स्वेच्छाशुल्क म्हणून आयोजकांना काही पैसे देणं, तुमच्या मुली-मुलाच्या शाळा-कॉलेजातील गरीब विद्यार्थ्याचा गणवेश, महिन्याची, वर्षाची फी, पुस्तकांचा खर्च देणं. ही काही वानगीदाखल उदाहरणं. साधं बघा... पुण्यात किंवा तुमच्या शहरात व्याख्यानं होत असतील. आपण किती जण किमान १०० रूपयाचं तिकिट काढून चांगल्या व्याख्यानाला जाऊ? आयोजकांनी दर्जेदार सभागृहात कार्यक्रम घ्यावा, वक्त्याचं मानधन-येणंजाणं पाहावं, झालंच तर तुमच्यासाठी चहा द्यावा, मग आपली जबाबदारी काय? मग, नवे वक्ते, नवे कार्यक्रम कसे होतील?


‘महा अनुभव’ नावाचं मासिक आहे. व्यावसायिक ठोकताळ्यांपलिकडे, चकली-पर्यटन विशेषांकांपलिकडे वाचकाला काही देऊ पाहणाऱ्या साप्ताहिक साधना, मिळून साऱ्या जणी, नवभारत, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त शब्द अशा नियतकालिकांच्या रांगेतलं हे मासिक. तर परवा त्याचे संपादक-प्रकाशक आनंद अवधानी सांगत होते की, इतरवेळी कुटुंबाला बाहेर घेऊन गेल्यावर ५००-१००० सहज खर्च करणारा एकजण मासिकाची वर्गणी लावायची म्हटली तर म्हणाला, “बायकोला विचारून सांगतो”. पुण्याला ‘लोकायत’ नावाची संस्था आहे. दिवंगत प्रा. सुलभा ब्रह्मे त्याचं काम पाहात. त्याच संस्थेचा जेनेरिक म्हणजे परवडणाऱ्या स्वस्त औषधांसाठीचाही विभाग आहे.

ही संस्था अनेक प्रश्नांवर जनजागृतीचं काम करते. आजच्या काळात अशा संस्थेनं कसं जगावं, कसं तगावं? अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. शहरात असतील तर त्यांचं तुलनेनं बरं चालतं. पण, अन्य जिल्ह्यातल्या संस्थांची नावं तरी आपण सांगू शकतो का? आपल्या शहरातल्या रूग्णालयात कोणत्याही दिवशी गरिबीमुळे ऑपरेशन, टेस्ट अडलेले लोक दिसतील. त्यांची राहण्या-खाण्याची पंचाईत असते. दोन-पाच हजारांसाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. मी माझ्यापुरता काही सामाजिक क्षेत्रांना तातडीच्या मदतीची आवश्यक केंद्र मानतो. वृद्ध, अपंग, गतिमंद, महिला, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, अनाथालयं, गरिबांसाठी शिक्षण आणि तसं देणाऱ्या संस्थांना त्यांचं काम पाहून डोळस मदत केली पाहिजे.

कुठल्यातरी देवस्थानाला वाहिलेल्या १ किलो सोन्यात मला एखाद्या अख्ख्या शाळेचं नूतनीकरण, संगणक कक्ष उभारणं ही कामं दिसतात. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी कायमस्वरूपी सामाजिक सहाय्यता निधीची कल्पना मांडली. प्रत्येक शहर, गाव असा निधी का नाही उभारत? गावच्या कमानीवर २-५ लाख खर्च करण्याऐवजी असा निधी ज्यात प्रत्येक शहरवासी-गावकरी रूपया-रूपयाचं दान दर महिना टाकू शकणार नाही का? अनेकदा एक व्हॉट्सअप मेसेज येतो. लष्कराच्या मदत निधीसाठी प्रत्येक भारतीयानं १ रू द्यावा. मी म्हणतो ही कल्पना प्रत्यक्षात का येऊ शकत नाही? लष्करच कशाला आपल्या शहर गावाचंही रूपडं आपण पालटू शकतो. जर हे शहर गाव पातळीला शक्य नसेल तर किमान सोसायटी, गल्ली, वाडीपातळीला शक्य होईल का? जे काम रोटरी-लायन संस्था करू शकतात ते सामान्य लोक साध्या संघटनाद्वारे का करू शकणार नाही? याची सुरूवात लहानपणापासून १ रूपया बचतीचा, १ रूपया समाजसेवेचा अशा सवयीतून करू शकतो का आपण?
दिवाळीचा आनंद घेत असताना साऱ्या समाजातच सहकार्यानं उद्धार घडवू शकणारी ही दानतवाली दिवाळी आपण साजरी करू शकलो तर आपल्या सभोवताली रचनात्मक कार्याच्या असंख्य पणत्या दु:ख, दीनतेचा अंधार फेडतील... त्यातला एक दिवा मात्र आपला पाहिजे!

- प्रसन्न जोशी

[email protected]

X
COMMENT