आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor Expelled From JDU After Criticising Amit Shah And Nitish Kumar Over Caa, Nrc, News And Updates

प्रशांत किशोर यांची जदयूतून हकालपट्टी, नितीश कुमारांना खोटारडा म्हटल्याच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका करून चर्चेत असलेले प्रशांत किशोर यांना जदयूने (संयुक्त जनता दल) बर्खास्त केले आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस पवन वर्मा यांची देखील हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या विरोधात हालचाली केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे जदयूकडून सांगण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रशांत किशोर यांचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध आहे. तर पवन वर्मा यांनी भाजप आणि जदयूच्या आघाडीवरच आक्षेप घेतला होता. तत्पूर्वी प्रशांत किशोर यांच्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले होते, की अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच प्रशांत किशोर यांना जदयूमध्ये आणले होते. त्यांना दुसऱ्या कुठल्याही पक्षात जायचे असेल तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. त्यावर प्रतिक्रिया देताना बुधवारी किशोर यांनी कुमारांना खोटारडा म्हटले होते. त्याच्या अवघ्या काही तासांनंतर ही कारवाई समोर आली आहे.


पक्षातून काढले जाण्याच्या अवघ्या काही मिनिटांनंतर जदयूचे माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी ट्विट केले. यात त्यांनी लिहिले, "धन्यवाद नितीश कुमार! खुर्ची टिकवून ठेवल्याबद्दल माझ्य़ाकडून तुम्हाला शुभेच्छा. देव तुमचे भले करो."

काँग्रेसच्या वाटेवर प्रशांत किशोर?


प्रशांत किशोर यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा विरोध केला. तसेच या तिन्ही गोष्टींना विरोध करणाऱ्या काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधींना धन्यवाद केले होते. त्यांनी एक ट्विट करून या कायद्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना धन्यवाद म्हटले होते. सोबतच, बिहारमध्ये सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही असा दावा केला. एकेकाळी नरेंद्र मोदींना लोकसभेत सर्वात मोठा विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काहींच्या मते, ते राजकीय पक्षांचे सदस्यत्व घेण्यापासून दूर राहून त्यांना निवडणुकीत व्यूहरचना बनवून देण्याचेच काम करतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.