आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लुम्पेन पताका आभाळापार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात उघडपणे लोकशाहीची गळचेपी होतेय, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बालंट येतंय यावर विरोधी विचारधारेच्या मंडळींमध्ये एकमत आहे. मग यावर उत्तर काय? समाजवाद्यांनी समविचारींसमोर हे धोके मांडत राहणं? आंबेडकरी कलावंत-नेत्यांनी आपल्याच समर्थकांपुढ्यात शाहिरी जलसे भरवणं?डाव्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना एकत्र करून तीच साधनं, तोच मार्ग अवलंबून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात अखंड शंख करत राहणं? प्रत्यक्षात हे सारे घिसेपिटे प्रयोग आहेत, म्हणूनच विरोध-विद्रोहात अस्सलपणा असूनही या साऱ्या संघर्षाचा परिणाम म्हटला तर नगण्य आहे. अशा वेळी गरज जुनेच तुणतुणे वाजवत राहण्याची नव्हे, बदलत्या तंत्रसाधनांची नोंद घेत नवे मार्ग, नवी साधने उपयोगात आणून सांस्कृतिक पातळीवरून विरोधाचा आवाज बुलंद करण्याची आहे, अशी सडेतोड भूमिका मांडणारा हा लेख...


नागराज मंजुळेचा "फॅन्ड्री' आणि राजकुमार तांगडेचा "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला', पा. रंजितचा "काला' आणि मारी सेल्वाराजचा "परियेरूम पेरुमल', दक्षिणेचा प्रसिद्ध शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा आणि ‘डिव्हाइन-नाईझी’ हे धारावीचे "गली बॉईज' रॅपर्स, "चमार पॉप' फेम पंजाबची गिन्नी माही आणि ‘जेएनयु’त शिकत असलेला ओडिसाचा सुमीत सामोस हा दलित रॅपर,चेन्नईचा "कास्टलेस कलेक्टिव्ह' हा म्युझिक बँड आणि शाहीर संभाजी भगतचे "द वॉर बिट' हे युट्युब चॅनेल, कुणाल कामरा - वरूण ग्रोवर हे स्टँडअप कॉमेडियन आणि सारं काही समष्टीसाठी, बहुजन आर्ट फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम...


व्यक्ती वेगळ्या, संस्था वेगळ्या... घटना वेगळ्या, त्याचे प्रकार वेगळे, उद्देश वेगळे, मागण्या वेगळ्या... देशाच्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या या सगळ्यांमध्ये मात्र एक समान धागा निश्चितच तो म्हणजे, प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय आणि  ते सागण्याची प्रत्येकाची पद्धत अनोखी, कल्पक आणि नावीन्यपूर्ण प्रसंगी आक्रमकही आणि म्हणूनच परिणामकारक देखील...!


लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, वणव्यासारखे पसरत जाणारे झुंडशाहीचे थैमान, धर्मव्यवस्थेचा पगडा, असहिष्णूता, समांतर सेन्सॉरशिप, अर्बन नक्षलवादासारखे मिथक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासींचे हक्क, बेरोजगारीचा उच्चांक, गरीब-श्रीमंतामध्ये वाढतच जाणारी आर्थिक दरी, सामाजिक संस्थांचे खच्चीकरण, देशाच्या घटनात्मक संस्थांना मुळापासून उखडून टाकण्याचा डाव, सकल मानवतेची लढाई लढणाऱ्या प्रत्येकाची मुस्कटदाबी आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजेच अघोषित आणीबाणी...


इतिहासात जरा डोकावून पाहिलं की सहजच लक्षात येईल की, कोणतीही राज्यसत्ता घाबरते, ती विचारांना आणि हा विचार मांडणाऱ्या विचारवंत, लेखक, कवी आणि कलावंतांना.  फ्रेंच-रशियन राज्यक्रांतीपासून भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत आणि दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश पासून ते स्वरा भास्कर-प्रकाश राज-नसिरुद्दीन शहापर्यंत... अनेक दाखले देता येऊ शकतील. या अघोषित आणीबाणीविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारी आदिवासी सोनी सुरी, चंद्रशेखर आजाद रावण... राजकीय आखाड्यात उतरलेले जिग्नेश मेवाणी, कन्हैया कुमार... वैचारिक बांधणी करणारे कांचा इलैय्या, डॉ. आनंद तेलतुंबडे, पत्रकार रवीशकुमार... सांस्कृतिक चळवळीची पताका खांद्यावर घेणारे शीतल साठे-सचिन माळी, सुधीर ढवळे, कबीर कला मंच...  राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कोडीं करून ठेवलेल्या यांपैकी प्रत्येकाविरोधात काय शब्दप्रयोग वापरले जातात, तर देशद्रोही, नक्षलवादी, प्रेस्टिट्युट, लेफ्टिस्ट... आणि या शब्दप्रयोगाचा सर्रास वापर कोण करतो तर, ज्यांनी या लेखकांची एक ओळही वाचलेली नसते किंवा सबंध आयुष्याचा लढा ही मंडळी कशासाठी लढताहेत, याची "बेसिक' माहितीदेखील ठावूक नसणारा वेतन आयोगाचे, आयकरातून सूटीचे लाभ पदरात पाडून घेणारा या देशातला नव मध्यमवर्ग. सोशल मीडिया, वृत्त वाहिन्या, ऑफिस, लोकल ट्रेन, घरगुती कार्यक्रमांना जमलेले नातेवाईक इतकेच काय तर घरातल्या वडिलधाऱ्यांचे बोलणं सतत कानावर पडत असलेले शालेय  विद्यार्थीदेखील, कोण  कन्हैया कुमार? तो देशद्रोही... असं इतकं सहज म्हणून जातात की, न्यायदेवतेच्या आवारातच उन्मादी वकिलांकडून कन्हैयाला मारहाण होते, याचेही त्यांना काहीच वाटत नाही आणि "मग कशाला ठेवायचं घरी गोमांस' असं म्हणत मोहम्मद अखलाकच्या हत्येचेदेखील ते अप्रत्यक्षपणे समर्थनच करत असतात.


शॉपिंग मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणं, वॉटर पार्क आणि क्रुझेसमध्ये जाऊन मौजमजा करणं, अमेरिकन लाइफ स्टाइलप्रमाणं जगण्याचा अनुभव घेणं, हायटेक कॉर्पोरेट कल्चर आणि स्टॉक मार्केट क्षेत्राच्या माध्यमातून नव्या जगाकडे पाहणं आणि त्याबरोबरीने जे जे "सोशल' म्हणून आहे तिथे तिथे जाऊन "पिंक टाकणं' हा आता या नव मध्यमवर्गाचा दिनक्रम झाला आहे. एकेकाळी भारतीय परंपरागत मध्यमवर्ग हा राजकीयदृष्ट्या उदासीन आणि काहीसा अलिप्त होता. परंतु नव्याने उदयाला येत असलेला हा मध्यमवर्ग मुख्यत: विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मीडिया-सोशल मीडियातल्या आक्रमक शिरकावामुळे राजकीयदृष्ट्या सक्रीय आहे आणि म्हणूनच त्यांच्या मनात लोकशाहीवरच्या अविश्वासाला अधिक बळकटी देण्यासाठी फुरोगामी, सिक्युलर, देशद्रोही, नक्षलवादी, प्रेस्टिट्युट, लेफ्टिस्ट अशाप्रकारची साधनसामुग्री सत्तेशी हितसंबंध असलेल्यांकडून पद्धतशीरपणे, नियोजनबद्ध प्रकारे पुरवली जाते आहे. गरीबांचे काय, ते  तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दुप्पट, कर्ज माफी, आरक्षण अशा मोहजाळात आपसूकच अडकतात, परंतु नव मध्यमवर्ग अशा भूलथापांना बळी पडत नसतो. तो सावध नि चतूर असतो आणि म्हणूनच मग त्यांच्या मनात असहिष्णुतेचा विखार पद्धतशीरपणे पेटवला जातो.


हे असं सगळं आपल्या आजुबाजूला घडत असताना किंवा घडवून आणलं जात असताना, मग आपल्या देशाचे पुन्हा एकदा सहिष्णू देशात रूपांतर व्हावे म्हणून, या देशात जन्मलेल्या बुद्धाची करुणा आपल्या रक्तातून वाहात राहावी म्हणून, धर्म-जाती-लिंग-वंशभेदापलीकडे जाऊन सकल मानवतेची लढाई लढता यावी म्हणून आणि संविधानावर विश्वास ठेवणारा देश असावा यासाठी नेमकं काय करता येईल?


होतंय काय की, सत्ता परिवर्तन हेच अंतिम ध्येय असल्यासारखं वातावरण आहे. मानवतेच्या या लढाईत सत्ता परिवर्तन हे तर उद्दिष्टरूपी हिमालयाचं छोटसं टोक आहे.  सांस्कृतिक परिवर्तन हे राजकीय परिवर्तनापेक्षा अधिक अनुकूल आहे, कारण ते सशक्त लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. व्यक्ति-व्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान आल्याशिवाय समग्र परिवर्तन अशक्य आहे. सचिन माळी त्यांच्या "जातिअंतक सांस्कृतिक आत्मभान' या पुस्तकात   म्हणतात, संस्कृतीची मिरासदारी सांगणाऱ्या साहित्यिकांना, कवींना, शाहिरांना आणि समाजाची मानसिकता घडविणाऱ्या बुद्धि‌जीवींना या सांस्कृतिक चळवळीचे समग्र भान ठेवावे लागेल आणि समाजाचे नेतृत्व करावे लागेल. त्यासाठी कला साहित्याचे भान ठेवावे लागेल. इतिहास बदलण्याची ऐतिहासिक भूमिका घेऊन सांस्कृतिक सेना निर्भयपणे उभारावी लागेल. त्यासाठी नाट्यचळवळ, कलापथके, क्रीडामंडळे, सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, साहित्य मंडळे, नृत्यपथके, लेझीम पथके गावागावांत निर्माण करावे लागतील.


शोषितावस्थेतून, वंचितावस्थेतून बाहेर पडून मुक्तीदायी समाजाकडे वाटचाल करण्यासाठी सांस्कृितक सेना याच मार्गावरून तर आज जात आहे, परंतु तरीही सांस्कृतिक परिवर्तन घडताना दिसत का नाहीये? समाजाला आलेली सूज उतरण्याची चिन्हे का दिसत नाहीत?  मूक-बधीर समाजाला हा आक्रोश ऐकू का येत नाहीये? सांस्कृितक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी हे उपाय कमी तर पडत नाहीत ना? निषेध सभा-निषेध पत्रके, मूक मोर्चा-बोंबाबोंब मोर्चा, कॅन्डल मार्च- मशाल मार्च, मानवी साखळी-रास्ता रोको... निषेधाचे जे जे मार्ग लोकशाही मार्गाने जातात, ते ते घेत आलो आहोत. विद्रोही गाणी - क्रांतीची गाणी, शाहीरी जलसे-सत्यशोधकी जलसे, डफ आणि दिमडी, विद्रोही साहित्य संमेलन-बहुजन साहित्य संमेलन या गोष्टी तर आहेतच,आणि त्या तर पुढेही सुरू राहतीलच. परंतु तेवढचं आता पुरेसं नाही. सांस्कृतिक दहशतवादाविरोधातील या लढाईत जे "टूल' वापरलं जातंय, त्याला आता गंज चढलाय. शाहीर संभाजी भगत त्याच्या विद्रोही गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीलाच सांगतो, "आय एम नॉट हिअर टु एन्टरटेन यु, आय एम हिअर टु डिस्टर्ब यु.' इथेच जराशी गफलत होते. याउलट संघ काय करतो, तर आमची फक्त सांस्कृितक संघटना आहे, असा डंका पिटतो आणि राजकीय हिशेब मांडून शाखेत येणाऱ्या कार्यकर्त्याचा मेंदू हळूहळू पोखरायला सुरूवात करतो. (ही तुलना अर्थात चुकीची असली तरी कार्यपद्धती लक्षात घेणं गरजेचे आहे.) 


नव मध्यमवर्गाला जागं करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी सांस्कृतिक चळवळींची साधनं "टुल्स' बदलायला हवीत. दलित-शोषित-वंचित-कष्टकरी-आदिवासी-शेतकरी-भटके विमुक्त यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी सांस्कृतिक चळवळींचे "फॉर्म' बदलायला हवे. लढण्याची ठिकाणे, गाणी बदलायला हवी, गाण्यांच्या नव्या चाली बांधायला हव्या. संगीत आणि वाद्येही बदलायला हवी...  


साहित्य संमलेनाच्यानिमित्ताने झालेल्या अपमानाचा निषेध करताना ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठिंबा देण्यासाठी कधी नव्हे ते मुंबईत डावे, समाजवादी, आंबेडकरवादी, बहुजनवादी, मानवतावादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. परंतु त्याचे स्वरूप "चला, एकत्र येऊया आणि पुन्हा आपापल्या घरी जाऊया' अशाच प्रकारचे राहिले. नुसतीच भाषणे, पण पुढे काय? ती उर्जा, तो त्या दिवशीचा सळसळता उत्साह ठोस कृतीमध्ये कुठे रुपांतरित झाला? दरवर्षी सहा डिसेंबर रोजी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंची गर्दी जमते. गडबड कुठे होते तर, ज्यांच्यामध्ये क्रांतीची ठिणगी अगोदरपासूनच भिनली आहे आणि "रक्ताच्या प्रत्येक थेंबावर बाबा तुमचे उपकार' असे म्हणत जे लाखो भीमसैनिक जमतात त्यांच्याच समोर क्रांतीची गाणी सादर केली जातात. दरवर्षी तीच गाणी आणि सादर करणारे कलाकारदेखील तेच... गुढी पाडव्याच्यादिवशी डोंबिवलीमध्ये निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये ही मानवमुक्तीची गाणी कशी म्हणता येतील आणि तशी ती म्हणता यावी यासाठी कसा समन्वय साधला जाईल याचे प्रयत्न करणे गरजेचं नाही का?


आताआतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा न फडकवणारे सरसंघचालक थेट डाव्यांचा अभेद्य गड असलेल्या केरळला जाऊन तिरंगा फडकवू शकतात... ममता बॅनर्जीच्या प. बंगालमध्ये शिरकाव करता यावा म्हणून अमीत शहा रॅलीच्या परवानगीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात... त्याच प. बंगालमध्ये वेगवेगळ्या विचारांचे २२हून अधिक पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करू शकतात... उत्तर प्रदेशमध्ये पारंपरिक वैऱ्यांमध्ये युती होऊ शकते, महाराष्ट्रात असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी होऊ शकते... राजकीय पातळीवर हे एवढं सगळं होऊ शकतं, तर मग सांस्कृतिक पातळीवर जयभीम की कॉम्रेड? मेणबत्ती की अगरबत्ती? असे एकमेकांनाच प्रश्न विचारण्याऐवजी संविधानावर विश्वास ठेवणारी सकल मानवतेची, सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई का लढली जात नाही?
सांस्कृतिक चळवळींच्या व्यासपीठावरच ही लढाई लढली जाऊ शकेल. आणि मग तसे असेल तर सांस्कृतिक चळवळींचीं ही नवीन आयुधं काय असू शकतील? पंजाबची लोकप्रिय पॉप गायिका गिन्नी माहीला शाळेत असताना तिच्या एका मैत्रिणीने विचारले, तू कोणत्या जातीची? गिन्नी म्हणाली, शेड्युल कास्ट... मग पुढचा प्रश्न, म्हणजे कोणती? गिन्नी म्हणाली, चमार... मैत्रिण हबकली आणि म्हणाली, मग तर मला तुझ्यापासून जपून राहावं लागेल, कारण चमार म्हणजे एकदम डेंजर... पुढे मग जाणीवपूर्वक तेच शब्द घेऊन गिन्नी माहीने "डेंजर चमार' हे गाणं तयार केलं. जाती व्यवस्थेच्याविरोधात गाणं हेच प्रमुख शस्त्र घेऊन लढणारी गिन्नी माही आज युट्युब आणि फेसबुकवर अक्षरश: धुमाकूळ घालतेय. "डेंजर चमार', "राजा बाबासाहिब दा' या तिच्या युट्युबवरच्या गाण्यांना लाखो हिट्स मिळाल्या आहेत आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर लक्षात येईल की, गिन्नी माहीच्या या नव्या सांस्कृतिक फॉर्मचे समाजातील विविध स्तरांवर कौतुक होतंय.
सुमीत सामोस हा जेएनयुत शिकणारा दलित रॅपर... मूळचा ओडिसामधला. जेएनयुसारख्या विद्यापीठामध्येदेखील जातवास्तव किती दाहक आहे, यावर तो त्याच्या हिपहॉप स्टाइलमध्ये भाष्य करतो. सुमीत म्हणतो, जनम लिया मैने जब से जब से, थप्पा गुन्हेगार लगा मुझ पे, पुछता हूँ मै तुझसे, क्यों हजार जात है, इंतजार है सालो से, गुलामों के बाजार मे, कहते है हम आजाद है... दलित रॅप हा शब्द पहिल्यांदा मी ऐकला आणि मी व्यक्त होऊ लागलो. मी दलित साहित्य वाचले, कृष्णवर्णीयांची रॅप गाणी ऐकली, विद्रोहाचा नवा सूर मला सापडला. जो समाज आम्हाला सतत नीच म्हणून हिणवत असतो तीच ओळख घेऊन जगापुढे आता आलोय, सुमीत सामोसचा हा विद्रोहाचा नवा सूर सबंध जेएनयुमध्ये गाजतोय.


मुंबईच्या धारावी या आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीचे "ब्लॅक लिस्टेड बॉईज'... आज त्यांच्या हिपहॉप आणि रॅप गाण्यांची जगाला भुरळ पडली आहे. काय गातात ही पोरं... तेरे शूटरों का खास मेरे गली में, पुरे शहर की आवाज मेरे गली मे, प्रे आरती या नमाज मेरे गली मे, माँ पे गाली तो चमाट मेरे गली मै... किंवा "व्हॉइस ऑफ स्ट्रीट्स' मधून ते गातात, उठ जा अपनी राख से, तू उड़ जा अब तलाश में... परवाज़ देख परवाने की, आसमान भी सर उठाएगा... आएगा अपना टाइम आएगा... मेरे जैसा शाना लाला, तुझे न मिल पायेगा... हे रॅप गाणारा धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा डिव्हाइन नाईझी आज जगात लोकप्रिय झालाय आणि त्याच्याच आयुष्यावर बेतलाला झोया अख्तर दिग्दर्शित "गली बॉईज' हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतोय. धारावीमध्ये नव्याने उदयास आलेला तामिळ रॅपर्स हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासाचा विषय ठरतोय. पा. रंजितने त्याच्या "काला' चित्रपटात धारावीच्या या रॅपर्सचा अतिशय प्रभावीपणे करून घेतला आहे. 


पा. रंजितबद्दल तर आजच्या घडीला जितकं बोलवं तितकं कमी आहे. पेरियारांच्या भूमीतून निघालेला हा आंबेडकरवादी दिग्दर्शक आज दक्षिणेत मानवमुक्तीच्या लढाईसाठी एकाचवेळी अनेक उल्लेखनीय प्रयोग करतोय. "कबाली' आणि "काला' हे त्याचे दोन चित्रपट तर सबंध फिल्म इंडस्ट्रीमध्ये मैलाचा दगड ठरले आहेत तर त्याचीच निर्मिती असलेला आणि मारी सेल्वाराजने दिग्दर्शित केलेला "परियेरूम पेरुमल' या चित्रपटाने तर फॅन्ड्री, सैराट आणि कालाच्याही पुढे जाऊन जात व्यवस्थेची चिरफाड केली आहे. सुरुवातीला दक्षिणेकडच्या थिएटर मालकांनी "परियेरूम पेरुमल'ला दरवाजे बंद केले होते, मात्र चित्रपटाची ताकदच इतकी मोठी होती की प्रेक्षकांच्या प्रचंड दबावापुढे थिएटर मालक झुकले आणि या चित्रपटाने क्रांती केली. पा. रंजित फक्त चित्रपट क्षेत्रातच नव्हे तर त्याने दक्षिणेत एक ‘कुगईची लायब्ररी’ या नावाने मोठी सांस्कृतिक चळवळ सुरू केली आहे.  जिथं चेन्नईतल्या झोपडपट्टीतली पोरं येऊन मार्क्स, आंबेडकर, पेरियार वाचतात. जिथं नवनवीन कल्पना स्फुरतात. या पोरांना शोषितांचं जगणं, अन्याय, बंड, रेझिस्टन्स दृकश्राव्य माध्यमातून मांडायचाय, ज्यांना रंजिथने सुरू केलेल्या दलित सिनेमा चळवळीचा भाग व्हायचंय अशा सर्वच तरुणांसाठी एक सांस्कृतिक केंद्र ठरेल अशी लायब्ररी त्याने उभारलीय. तिथे झोपडपट्ट्यांमधली, कोळीवाड्यातली पोरं कॉलेजात जाऊन मीडियाचं शिक्षण घेऊ लागलीत. हीच पोरं इथं येऊन "दास कॅपिटल" वाचायला लागली आहेत. यातल्या अनेकांना रंजितने आर्थिक मदत आणि या क्षेत्रातला कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी तमीळ इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपला वगैरे पाठवलं. कुगईतल्या रॅपर पोरांना एकत्र करून ‘कास्टलेस कलेक्टिव्हज’ नावाचा म्युजिकल बँड त्याने सुरु केलाय. त्यांचा पहिला अल्बम रंजित स्वतः प्रोड्यूस करतोय.  


चेन्नईत नोकरी करणारा गुणवंत सरपते हा महाराष्ट्राचा एक तरुण पा. रंजितच्या प्रत्येक कलाकृतीवर उत्तमप्रकारे लक्ष ठेवून आहे. किंबहुना त्याच्या अनेक फेसबुक पोस्टमुळेच पा. रंजित इथल्या पुरोगामी वर्तुळात लोकप्रिय होतोय. गुणवंत जेव्हा ही लायब्ररी बघायला गेला होता तेव्हा त्याने रंजितला विचारलं, "अण्णा अमेरिकेत जसं ब्लॅक मूव्हमेन्टमधून ब्लॅक सिनेमा जन्माला येऊ शकतो, तर आपल्याकडं तसं प्रस्थापित सिनेमे झुगारून स्वतंत्र दलित/आंबेडकरी सिनेमा का उभा राहू शकत नाही? यावर रंजितअण्णा हसून म्हणाला, "महाराष्ट्रातला आहेस ना? दलित पँथर चळवळ माहितीच असेल, दलित पँथर फक्त, काही अॅग्रेसिव्ह युथचं संघटन नव्हतं. तिची सुरुवात साहित्यातून झाली होती, ते व्यवस्थेविरोधातलं एक कल्चरल रिव्होल्युशन होतं. आता सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, आजवर काय झालं ते मला माहीत नाही, पण आता आम्ही उभं ठाकलोय. अँड वि आर नॉट गोइंग टु स्टॉप. ओकेवा?"


टी. एम. कृष्णा हा सुरांचा बंडखोर गायक... शास्त्रीय संगीताची ब्राम्हणीकरणाची चौकटच या महान गायकाने तोडून टाकली. तो चेन्नईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जातो आणि रागदारी सादर करतो. तो फक्त आणि फक्त कर्नाटकी संगीतासाठी चेन्नईमध्ये जे सभागृह प्रसिद्ध आहे त्याच सभागृहात जोगव्यांना निमंत्रित करतो आणि त्यांच्या लोकसंगीताला कर्नाटकी संगीताशी जोडून घेतो.  म्हणजेच ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान देतो. या व्यवस्थेने उभारलेल्या भेदाच्या भिंती फोडतो. बहुजन कलांमध्ये दडलेल्या समृद्धी आणि सौंदर्याची जगाला ओळख करून देतो.  कृष्णा म्हणतो, कलेचा संबंध हा जरी बहुतांश वेळेस पांडित्याशी जोडला जात असला, तरीही तिचा उगम हा सामान्यांमध्येच असतो. शास्त्रीय संगीतातील रचनादेखील लोकभाषेत आहेत. परंतु बहुजनांमध्ये जन्मलेल्या या ‘शास्त्रीय' कला एका विशिष्ट वर्गापर्यंत, जातीपर्यंत मर्यादित राहतात का? तसे असल्यास त्याचे कारण काय? आणि हे जर खरं असेल तर आपण ते मान्य करून या कला सर्वसामान्यांसाठी खुल्या करणार आहोत का?


गेल्या तीन-चार वर्षांपासून मुंबईत "सारं काही समष्टीसाठी' या नावाने उरूस भरतो.  आयोजकांची भूमिका अतिशय प्रभावी आहे. ते म्हणतात,  स्पृश्य-अस्पृश्यतेचा गटारागंगेतून वाहत चाललेल्या समाजाची गरज आहे, जे जे सडलेलंय ते गाडून टाकणं. अस्पृश्यतेच्या भेदाला उखडून टाकणं. कलात्मक राजकारणाचे, सांस्कृतिक राजकारणाचे सारे मंच उभे राहतील असं सचेत काम करणं. हे मंच उभे रहावेत, यास लागू नये कुणाचाही दंभस्पर्श, नेस्तानाबूत करत चालाव्यात सांस्कृतिक दहशतवादाच्या झुंडी, नकाराच्या जाळ्यांना कातरून उभं करावं नवं दालन ज्यात, उपजेल माणुसकीचं बीज तरारून... एक असा मंच, जो खुला असेल सर्वांसाठी, जो टाकेल दान शोषकांच्या पदरातही स्वीकाराचं, नी उचलून धरेल लुंपेन पताका आभाळापार...!


शोषितावस्थेतून, वंचितावस्थेतून बाहेर पडून मुक्तीदायी समाजाकडे वाटचाल करण्यासाठी निघालेले हे सगळे आधुनिक सांस्कृतिक सेनेचे सैनिक आहेत. या सैनिकांकडे हत्यारे आहेत, ती जात-धर्मपंथ विरहित मानवतावादी क्रिएटिव्हिटीची... ही अशी एक गोष्ट आहे, जी उजव्या विचारसरणीकडे मुळातच अभावाने आहे. आणि म्हणूनच "द अॅक्टिडेन्टल प्राइम मिनिस्टर'सारखे दंभाचे दर्शन घडवणारे चित्रपट पहिल्याच दिवशी दणकून आपटतात. परंतु डावे, आबेडकरवादी, समाजवादी, आदिवासी यांची ही मोठी ताकद आहे. सांस्कृतिक चळवळींच्या जोरावर काय घडू शकतं,हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. आज फोर जी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे, आपल्याला फक्त एकच करायचंय, हा समष्टीचा गजर महताब करायचाय... समष्टीसाठी आगाज करायचाय... 
समाजाला आलेली सूज हळूहळू उतरायला सुरूवात होते की नाही बघाच...


प्रशांत पवार
shivaprash@gmail.com

बातम्या आणखी आहेत...