आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठग्स ऑफ ब्रिटन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन, आमिर खानसारखे तगडे नट आणि यशराज फिल्मसारखे त्याहून तगडे बॅनर असूनही दोन-अडीचशे कोटी रुपये खर्चून बनवलेला अतिभव्य, अद््भूत "ठग्स ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट साफ  पडला.  तरीही वर्तमान प्रथेप्रमाणे प्रसिद्धी तंत्राचा वापर करून उत्पन्नाचे कोटींचे आकडे सांगून सकारात्मकतेचं सोंग आणण्याचा प्रयत्न झाला. अर्थात, चित्रपट का पडला-आपटला याचे विश्लेषण करण्यास चित्रपट समीक्षक समर्थ आहेत. इथे मुद्दा, ज्यांच्यावर अख्खा चित्रपट बेतला होता, त्या ठगांच्या वास्तवदर्शी नोंदींचा, ब्रिटिश इतिहासकारांनी निर्माण केलेल्या छद्मसाहित्याचा आहे. प्रत्यक्षात ठग ही जमात कोण होती, तिची जीवनशैली-कार्यशैली कशी  होती? आणि इतिहासाने या जमातीवर कसा अन्याय केला होता, यावर प्रकाशझोत टाकण्याचा आहे... 

 

सिनेमावाल्यांनी ठगांचा इतिहास आणखीनच भडक पद्धताने पडद्यावर मांडला, मात्र अनेक ब्रिटिश आणि फ्रेंच लेखक-संशोधकांनी जेव्हा ठगांचा नव्याने अभ्यास केला किंवा विलियम स्लिमनच्या शोधमोहिमेची चिकित्सा केली आणि त्यातून जे साहित्य अथवा अहवाल समोर आले ते ठगांच्या कृत्यांपेक्षा कित्येकपटीने भयावह ठरले...


तसा या लेखाचा "ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमाशी काहीएक संबंध नसला तरी त्यातला "ठग' हा जो शब्द आहे, त्यावर मात्र इतिहासात डोकावून पाहणं, बोलणं, लिखाण करणं, चर्चा घडणं निश्चितच गरजेचं आहे. "ठग्स ऑफ हिंदुस्तान' प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर ठग्स हा विषय घेऊन चॅनेल्सवर ज्या काही चर्चा झाल्या, जे काही लेख आले, माध्यमांनी ज्याप्रकारे हा विषय हाताळला त्याचा रोख आणि आशय साधारणपणे असा होता...


... इस खूंखार "सीरियल किलर' ने रुमाल से कर दिए ९०० कत्ल!
... रक्ताचा थेंबही न सांडता त्याने केले ७१९ खून
... कहानी ‘नर पिशाच’ ठग बहराम की जिसने किए ९०० से ज्यादा कत्ल
... जिन्होंने मारे करोड़ों लोग और नहीं छोड़ा कोई सुराग़...
... वे मुस्लिम जो काली की पूजा कर देते थे बलि...
... खूंखार सीरियल किलर्स, जिनके जुर्म गिनीज बुक में हैं दर्ज!


जगातल्या या सगळ्यात भयानक गुन्हेगारी टोळीने त्यांच्या ४५० वर्षांच्या अस्तित्वात विविध आकड्यांनुसार जवळपास १० ते २० लाख खून केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे इतका जबरदस्त "मसाला' तयार असताना साहजिकच त्यावर कथा-कादंबऱ्या आणि सिनेमे न बनले तर नवल. ठगांवर सिनेमा निघण्यासाठी जरी भारताला २०१८पर्यंत वाट पाहावी लागली, असली तरी हॉलीवूडमध्येे यापूर्वीच द डीसिव्हर्स (The Deceivers), इंडियाना जोन्स अॅन्ड द टेम्पल ऑफ डुम (Indiana Jones and the Temple of Doom), द स्ट्रँगलर्सऑफ बॉम्बे (The Stranglers of Bombay) हे भारतीय ठगांवरचे चित्रपट गाजले होते. यात फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, ठगांच्या या कार्यशैलीवर आतापर्यंत जे जे साहित्य किंवा सिनेमे उपलब्ध आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या कलाकृतीसाठी मुख्य आधार घेतला होता, तो फिलिप मिडोज टेलर लिखित १८३९ मध्ये प्रकाशित झालेल्या "कन्फेशन ऑफ ठग' या  गाजलेल्या पुस्तकाचा. ब्रिटिश सैन्यात असलेल्या मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमन या अधिकाऱ्याने १८३५ मध्ये कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ "फिरंगिया"ला जेरबंद केले आणि त्याने दिलेल्या कबुलीजबाबावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजेच कन्फेशन ऑफ ठग...


हेच ते "कन्फेशन ऑफ ठग' पुस्तक आणि हाच तो "विलियम हेनरी स्लीमन' ज्याने भारतीय इतिहासाची एक "काळीकुट्ट' बाजू साऱ्या जगाला दाखवली आणि ठग हा अस्सल भारतीय शब्द ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत जाऊन बसला. गिनीज बुकात त्याची नोंद झाली. धूर्त, चोर, लुटारू, दरोडेखोर अशा अर्थाने ठग या शब्दाकडे पाहू जाऊ लागले आणि दुर्दैवाने ठग या शब्दापुढे हिंदुस्तान जोडले गेले. 


मुद्दा हा आहे, की ठगांच्या बाबतीत जे काही लेखन किंवा संशोधन झाले आहे ते केवळ ब्रिटिश संशोधकांनीच केले आहे. एकाही भारतीय इतिहासकाराने अथवा संशोधकाने ठगांवर संशोधन केलेले नाही,की भारतीय इतिहासात तसे दाखले मिळत नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की, केवळ ब्रिटिशांनी सांगितला म्हणून किंवा ब्रिटिश लेखकांनी पुस्तके लिहिली म्हणून  आपण डोळे झाकून ठगांचा इतिहास खरा मानायचा का? आणि तोही फक्त फक्त एका पुस्तकाच्या आधारावर...? १९७९ च्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ९०० पेक्षा अधिक खून करणाऱ्या बेहराम ठगची नोंंद आहे. ब्रिटिशांच्याच नोंदीनुसार ठगांचा धुमाकूळ हा साधारणपणे १७६५ ते १८४० या कालावधीमध्ये होता. मग तब्बल १२५ वर्षांनंतर गिनिज बुकवाल्यांना असे कोणते पुरावे मिळाले जेणेकरून त्यांनी ठगांचा उल्लेख जगातले सर्वाधिक खूंखार सिरीयल किलर म्हणून केला?
वास्तव हे होते की, ठगांचा बंदोबस्त करताना ब्रिटिशांनी त्यांचे क्रूरपणे समूळ उच्चाटन  केले. ते करण्यापूर्वी त्यांनी एक कायदा संमत केला. ठगी अॅन्ड डकैती सप्रेशन अॅक्ट, (१८३६-१८४८) या कायद्यांतर्गत ब्रिटिशांनी हजारो ठगांना फाशी दिली. तितक्याच संख्येने ठगांना अफगाणिस्तानच्या कानाकोपऱ्यांत तडीपार केले. फक्त पुरुषच नव्हे तर ठगांच्या बायका आणि लहान मुलांचीदेखील धरपकड केली आणि त्यांना आजन्म सेटलमेंटमध्ये डांबून ठेवले. भारतीय इतिहासाच्या पानांमधून ठगांचे अस्तित्वच कायमचे पुसून टाकले गेले...  


अनेक वर्षे लोटली... दंतकथा बनलेल्या हजारो ठगांना ज्या थडग्यात पुरले गेले तो इतिहास पुन्हा एकदा उकरण्यात आला. जसा तो इतिहास सिनेमाकर्त्यांना खुणावत होता,तसाच तो लेखक- संशोधकांनाही खुणावत होता. सिनेमावाल्यांनी ठगांचा इतिहास आणखीनच भडक पद्धताने पडद्यावर मांडला. मात्र अनेक ब्रिटिश आणि फ्रेंच लेखक-संशोधकांनी जेव्हा ठगांचा नव्याने अभ्यास केला किंवा विलियम स्लीमनच्या शोधमोहिमेची चिकित्सा केली, तेव्हा त्यातून जे साहित्य अथवा अहवाल समोर आले ते ठगांच्या कृत्यांपेक्षा कित्येकपटीने भयावह ठरले. मार्टिन व्हॅन वर्कन्सलिखित "द स्ट्रॅँगल्ड ट्रॅव्हलर : कॉलोनियल इमॅजिनिंग अॅन्ड द ठग्स ऑफ इंडिया', किम वँगरलिखित "ठगी : बँडिट्री अॅन्ड द ब्रिटिश इन अर्ली नाइटिन्थ सेन्चुरी इन इंडिया', माइक डॅशलिखित "ठग : द ट्रू स्टोरी ऑफ इंडियाज मर्डरर्स कल्ट' या आणि यासारख्या अनेक पुस्तकांतून ब्रिटिश वसाहतवाद, ठगांच्या निमित्ताने ब्रिटिशांनी केलेले धार्मिक आणि सांस्कृतिक ध्रुवीकरण आणि साम्राज्य विस्ताराकरिता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या योजना  यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इंग्रजांचे ठगांच्या बाबतीततले अनेक दावे या संशोधकांनी खोडून काढले. ठग या शब्दाच्या व्युत्पत्तीपासून डिक्शनरीमध्ये झालेल्या समावेशापर्यंतचा हा सगळा प्रवास किती कल्पक, रंजक आणि दूरदृष्टी आखून केलेला होता हे या नव्या संशोधकांनी धाडसाने मांडले. 


इस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय रोवायला सुरूवात केली होती. भारत त्यावेळी प्रांताप्रांतामध्ये इतक्या मोठ्याप्रमाणात विखुरला होता, की तिथपर्यंत पोहचण्यासाठी ना फारशी दळणवळणाची साधने उपलब्ध होती ना एकमेकांशी संवाद साधण्याच्या सोयीसुविधा... मात्र धर्म - जात या अशा काही गोष्टी होत्या, ज्यामुळे विखुरलेले असतानाही ते एकमेकांशी जोडले होते. ब्रिटिशांच्या फार लवकर ही गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळेच त्यांनी भारतातल्या विविध जातींचे डॉक्युमेंटेशन करायला आणि त्यानंतर जातनिहाय गणना करायला सुरूवात केली. हे काम सुरू असताना त्यांच्या लक्षात आले की, इथल्या प्रत्येक प्रांताचा एक राज्यशासक किंवा संस्थानिक आहे आणि त्या प्रांतांपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात आदिवासींचे  समूह आहेत, जे त्या राज्यशासकाच्या नियंत्रणाखाली नसून निसर्गाच्या नियंत्रणाखाली राहतात. त्यांची जीवनशैली, त्यांच्या चालीरिती या नागर समाजापेक्षा भिन्न आहेत. सतत होत असलेल्या परकीय आक्रमणांमुळे नागर समाजामध्ये गुलामगिरी सहन करण्याची वृत्ती बळावत चालली आह,े तर दुसऱ्याबाजूला नागर समाजाकडे ढुंकूनही पाहत नसलेल्या आदिवासींना जगात काय सुरू आहे याची पर्वादेखील नाहीये. धर्म आणि त्याला जोडून येणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धा यामुळे नागर समाजाने तोवर जंगलात कोणीतरी अघोरी शक्ती असलेले भूतपिशाच्च, मानवीभक्षक, रानटी लोकं राहतात यावर शिक्कामोर्तब केलंच होतं. 

 

 राजेमहाराजे-संस्थानिक, जमीनदार-सावकार आणि कष्टकरी-शेतकरी यांना आपल्या अधिपत्याखाली घेतल्यानंतर इंग्रजांची नजर जंगल संपदेवर होती. जंगलातील कच्चा माल इंग्रज बाहेर नेत. ब्रिटिशांनी सगळ्या आधुनिक कल्पना या आपल्या वसाहतीचे शोषण करण्यासाठी मॉडिफाय करून घेतल्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे मुख्यभूमीवर तयार होणार कच्चा माल. उदा. नीळ, अफू, ताग, कापूस बंदरापर्यंत पोचवणे,त्याच्यासाठी  प्रवासी अन् व्यापारी राज्यमार्ग सुलभ सुकर आणि  सुरक्षित करणे. हा मार्ग अर्थातच जंगलातून किंवा त्याच्या आजूबाजूने जात होता. पण यात मुख्य अडसर लढाऊ आदिवासींचा होता. लढवय्या आदिवासींसमोर इंग्रजांना काही केल्या वर्चस्व गाजवता येत नव्हते. वास्तविक आदिवासी चळवळींचा इतिहास पार चौदाव्या शतकापर्यंत जातो. वेळोवेळी महंमद तुघलक, बिदरचा राजा, बहामनी सरदार यांच्याविरुद्ध एकजूट करून आदिवासींनी आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले यांचे रक्षण केले होते. त्यामुळे इंग्रजांच्या काळातही त्यांना अनेक वेळा लढावे लागले. त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांना आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी स्थानिक जमीनदार आणि धनिक मदत करीत. १७८८ ते १७९५ या काळात छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, १८१२ मध्ये राजस्थानात भिल्ल जमातीने, तसेच १८१८ ते १८३० ईशान्यपूर्व भारतात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार जमातींनी, १८३२ मध्ये संथालांनी इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला होता. 


दुसऱ्या बाजूला सततची धुमश्चक्री, संस्थानिकांच्या कारभाराला लागलेली घरघर, जनतेकडून आकारण्यात येणारे विविध कर, सततचे पारतंत्र्य याने गांजलेल्या आणि भुकेकंगाल लोकांपैकी काहींनी मग सगळ्यात सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे लुटमारीचा. अवध ते दख्खन या मध्य भारतातून जाणाऱ्या अनेक मार्गांवर व्यापारी, सावकार आणि काशी-बनारसला जाणाऱ्या यात्रेकरूंना लुटण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. कायदा-व्यवस्था पुरती ढासळली  होती. या टोळीची दहशत इतकी भयानक होती, की तीर्थयात्रेला निघालेला माणूस निघताना घरदारावर तुळशीपत्र ठेऊन बायकापोरांना कवेत घेऊन ओक्साबोक्शी रडत असे. ‘काठीच्या टोकावर सोन्याजडजवाहिरांचे गाठोडे बांधून काशीला निर्धास्त जावे’ इतका विश्वास त्याकाळात राहिला नव्हता. या लुटमार करणाऱ्या टोळ्या एका विशिष्ट जातीपुरत्या मर्यादित नव्हत्या, त्यात अठरापगड जातीची माणसे होती. आणि महत्वाचे म्हणजे समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरावरची ही मााणसं होती. जंगलाच्या मार्गावरून जाणाऱ्यांना लुटणारे जसे आदिवासी होते, हिंदू होते तसेच मुस्लिमही होते. अनेक संस्थानिकसुद्धा असे पेंढारी व लुटारू पदरी बाळगून त्यांच्याकडून पुंडगिरी करवून त्यांच्या मिळकतीवर जगत असत. 


पेंढारींच्या बाबतीतही (पिंडारी) त्याकाळी अशाच आख्यायिका पसरवल्या गेल्या होत्या. असे म्हणतात की युद्धात अतिशय तरबेज असणारे पेंढारी सैन्य सबंध गाव लुटून न्यायचे. पेंढारींचा हल्ला होणार याची पुसटशी जरी शंका आली तर गावकरी स्वत:च आपले घरदार जाळून तिथून पोबारा करायचे. वास्तविक पेंढारी हा खरं म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मात्र पेंढारी सैन्याने मोघल, राजपूत आणि पेशव्यांना अनेक युद्धांमध्ये मदत केल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पेंढारी सैन्याचा उपयोग त्याकाळचे राजे-महाराजे हे आताच्या भाषेत सांगायचे झाले तर "आउटसोर्स' पद्धतीने करायचे. संस्थानिकांच्या कारभारला घरघर लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात सैन्य दल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नव्हते, त्यामुळे युद्धप्रसंगी बाहेरून पेंढारी सैन्याची मदत घेतली जायची. पहिल्या बाजीराव पेशव्याशी तर पेंढारीचे खुपच सलोख्याचे नाते होते. पेंढारींविरुद्ध ब्रिटिशांनी मोर्चेबांधणी केल्यानंतर या टोळीमध्य़े मोठ्या प्रमाणात फाटाफुट झाली आणि अनेक पेंढारी लुटमार करणाऱ्यांच्या टोळीमध्ये सहभागी झाले. 


"ठग' या शब्दाची व्युत्पत्ती नेमक्या याच काळात झाली.  कुणाच्यातरी कल्पक डोक्यातून लुटण्याची आणि लुटून झाल्यावर त्याला ठार मारण्याची एक अनोखी कला जन्माला आली. आणि बघता बघता प्रत्येक लुटमारीच्या घटनेत हीच मोडस ऑपरेंडी मध्यवर्ती ठरू लागली.  ठगांच्या टोळीत सामील व्हायला विशेष काही प्रशिक्षण नसे, फक्त कुणाची तरी ओळख हवी जो तुम्हाला त्या टोळ्यामध्ये सामील करून घेईल, अशी अट असे.एकदा कुणी टोळीमध्ये सहभागी झाला की एक वरिष्ठ ठग चालण्याबोलण्यापासून ते गळा आवळण्यापर्यन्त सारे प्रशिक्षण देत असे. प्रवास करणाऱ्यांच्या जथ्यात मिळून मिसळून त्यांचा विश्वास संपादन करायचा, सावज हेरायचं आणि योग्य वेळ साधून, ठरलेल्या एकाने परवलीच्या शब्दाची हाळी द्यायची आणि त्याच क्षणी सगळ्यांचे गळे एकसाथ पिवळ्या रुमालांनी आवळायचे. अत्यंत शिस्तबद्ध आणि चोख पद्धतीने ही सर्व कामे होत. कोणत्या मुक्कामावरती किती माणसे मारायची आहेत, याची पूर्वसिद्धता झाल्यावर, खड्डे खोदणारे ‘लघ्घे’ हे काम आधीच करून ठेवत असत. जेथे ही प्रेते गाडली जात, त्या जागेला ‘भिळ’ म्हणत. कोणाकडे काय धन द्रव्य आहे? कोण कोठे जातो आहे? त्याची अंगरक्षक म्हणून किती माणसे आहेत? याची खबरबात जाणून घेण्यासाठी ‘सोदे’ असत. हे सोदे वेष पालटून गावात जात आणि उद्या गावातून कोण असामी, कशासाठी कोठे जातो आहे? त्याच्या संगतीला कोण कोण आहेत? शस्त्रसाठा काय आहे? अशी सगळी चौकशी करूनच सगळी व्यूहरचना केली जाई. रात्रीच्या भोजनानंतर अंमळ मनोरंजन करणारे व गाणे बजावणे करणारे खास कलाकारही ठगांच्या या टोळीसमवेत असत. कधी कधी कार्यक्रम रंगात आला, की ठरलेल्या खाणाखुणा आणि पूर्वनियोजनानुसार शमसे, भटोटी आपआपली जागा धरीत आणि त्याच क्षणी आवाज येई, या गूढ संकेताला ठगांच्या भाषेत झीरणी म्हणत. ‘हुक्का लाव’, ‘पान लाव’, किंवा ‘तमाखू लाव’ बस! पडलेच समजा रुमाल गळ्यात आणि खेळ खल्लास. गुप्तता अबाधित ठेवण्यासाठी ही मंडळी कोणालाच जिवंत सोडत नसत.  रुमालच का, तर रेशमी झुळझुळीत रुमाल प्रवासी म्हणून सोबत बाळगला तरी कोणाला शंका येणार नाही. मारताना कुठेही रक्तपात नाही. बऱ्याचवेळा रुमालाची पट्टी करून त्याच्या बरोबर मध्यात एक जड नाणं ठेवले जात असे अन् सावजाचा गळा आवळताना ते नाणं बरोबर माणसाचे गळगुंडावर येईल असे पाहिले जात असे. जेणेकरुन श्वासनलिकेवर अतिरिक्त दाब येऊन माणूस लवकर मरावा. अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचं काटेकोर नियोजन करूनच हा सगळा खेळ चालत असे. 


पेशवाईचा अस्त केल्यानंतर इंग्रजांचा युनियन जॅक भारतात घट्ट रोवला गेला. लॉर्ड विलियम बेंटिक हा नवा गव्हर्नर भारतात कार्यरत झाला. फक्त आणि फक्त कंपनीचा नफा वाढवणे, हेच त्याचे लक्ष्य होते. कंपनीला भारतामधून कच्चा माल विनासायास मिळावा म्हणून  बेंटिकने देशाच्या कायदाव्यवस्थेत बारीक लक्ष घालायला सुरूवात केली आणि त्याची नजर ही लुटमार करणाऱ्या टोळींवर पडली. हे गंभीर प्रकरण हाताळण्यासाठी बेंटिकने निवड केली, मेजर जनरल विलियम स्लीमनची. दोन वर्षे सतत मेहनत करून, लोकांमध्ये मिसळून, वेळोप्रसंगी वेषांतर करून, खबऱ्यांना कामाला लावून स्लीमनने या टोळ्यांचा पर्दाफाश केलाच जेव्हा त्याच्या हातात ठग आमीर अली आला. पोलिस चौकशीअंती आमीर अलीने माफीचा साक्षीदार व्हायची तयारी दर्शवली. त्याने स्लीमनला ठगांचे अड्डे दाखवले, एक अशी जागा दाखवली, जिथे १०० च्यावर माणसांची प्रेतं ठगांनी गाडली होती. ते खून करणाऱ्या ठगांची नावे सांगितली. ह्या नंतर स्लीमनने  ठगीच्या घटना झाल्या तिथे भेटी देणे,  ग्रामीण लोकांनी सांगितलेली अतिरंजित वर्णने सूचीबद्ध पद्धतीने लिहून काढणे, ठगांना भौगोलिक फायदा देणारी ठिकाणे, त्यांचे संभाव्य अड्डे नकाशावर नोंदवणे, जास्तीत जास्त प्रवासी कुठल्यामार्गाने प्रवास करतात हे निरीक्षण करणे, साध्यावेषातली  खबरी माणसे सगळीकडे पसरवणे सोबतच माफीचे साक्षीदार झालेल्या ठगांना ठगांच्याच टोळीमधे खबरी म्हणून घुसवणे ...असे सगळे प्रकार केले. स्लीमनच्या या कार्यपद्धतीमुळे पुढे याच ठगी अॅन्ड डकैती सप्रेशन विभागाचे रुपांतर ब्रिटिशांनी "सीआयडी'मध्ये केले आणि त्यातूनच इंटेलिजंस ब्युरो म्हणजे आताची "आयबी' ही जगातली सगळ्यात पहिली गुप्तहेर संघटना जन्माला आली.


पकडला गेलेल्या ठग आमीर अलीच्या कबुलीजबाबावर आधारित "कन्फेशन ऑफ ठग' या पुस्तकाची जेव्हा इतर संशोधकांनी चिकित्सा केली, तेव्हा  आमीर अली हे एक काल्पनिक पात्र असल्याचा पक्का दावा त्यांनी केला. आणि या काल्पनिक पात्राच्या तोंडून ब्रिटिशांनी अॅट्रॉसिटी लिटरचेरचा (अत्याचाराची अतिरंजित मांडणी करणारे छद्म साहित्य) वापर करत भारतीय सामाजिक आणि जाती व्यवस्थेत खूप मोठी पाचर मारून ठेवली असल्याचे  सिद्ध केले. अॅट्रॉसिटी लिटरचेरचा आधार घेत ब्रिटिशांनी ठग नावाची एक जमात तयार केली आणि  त्यासाठी 'सिक्रेटिव्ह कल्ट', 'हाइवे रॉबर्स' आणि 'मास मर्डरर' असे शब्दप्रयोग वापरले. 'कल्ट' म्हणण्यामागचं प्रयोजन म्हणजे, या ठगांचे आपल्या चालीरिती, प्रथा-परंपरा, श्रद्धा, विश्वास, मान्यता होत्या. हे ठग या सर्वांचं धर्माप्रमाणे आचरण करायचे. त्यांची स्वतःची अशी गुप्त भाषा होती. लोकांना ठगवणे हा या समाजाचा वंशपरंपरेने चालत आलेला व्यवसाय असून  काली मातेचे भक्त असलेले हे ठग समाजाला लागलेली कीड आहे, हे ब्रिटिशांनी जगाला ठासून सांगितले. 


ठगांचे मूळ हे मुस्लिम धर्मात सापडत असले तरी लवकरच त्यांना हिंदूदेखील येऊन मिळाल्याचा दावा  स्लीमनने केला. हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मांचे ठग काली मातेचे भक्त होते असेही त्याने म्हटले. कदाचित रक्ताचा एक थेंबही न सांडता समोरच्याचा जीव घेण्याची ठगांची पद्धत आणि काली मातेसंबंधी असलेली आख्यायिका याची ब्रिटिशांनी चलाखीने सांगड घातली असावी. पौराणिक कथांनुसार रक्तबीज नावाचा एक असा राक्षस होता,ज्याला वरदान प्राप्त झाले होते की, त्याच्या रक्ताचा एक थेंबही जर जमिनीवर सांडला तर त्यातून अनेक राक्षस जन्माला येतील. आपल्या या पाशवी शक्तीच्या जोरावर राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ घालायला सुरूवात केली. देवांनी त्याला लढण्यासाठी आव्हान दिले, मात्र युद्धात त्याच्या रक्ताचा थेंब जसा सांडला जाई तसे अनेक रक्तबीज राक्षस तयार होई... देवांना त्याच्याशी युद्ध करणे जमेना. ते दुर्गा मातेला शरण गेले. दुर्गा मातेचे अक्राळ-विक्राळ रुप म्हणजे काली माता. काली माता आणि रक्तबीज राक्षसामध्ये घनघोर युद्ध झाले. रक्तबीजच्या रक्ताचा थेंब खाली सांडण्यापूर्वीच काली माता आपल्या जीभेने तो थेंब पिऊन टाकायची. अशापद्धतीने काली मातेने रक्तबीज राक्षसाचा वध केला. मात्र तोपर्यंत काली माता इतकी प्रकोपली होती,की तिला शांत करण्यासाठी अखेर शंकराला मातेच्या पायाखाली जाऊन पडावे लागले. काली मातेचा पाय शंकराच्या शरीरावर पडला तेव्हाच ती शांत झाली. 


काली मातेची ही आख्यायिका ब्रिटिशांनी ठगांना चिकटवली. ठग हे काली मातेचे भक्त आहेत, काली मातेच्या आज्ञेनुसारच ते रक्ताचा एकही थेंब न सांडवता लोकांना ठार करतात, अशा प्रकारची कथित कहाणी रचून त्यांनी ठगांच्या चालिरीती आणि प्रथा-परंपरेबद्दल समाजामध्ये आणखीनच कुतुहल निर्माण केले. या देशात कायदासुव्यवस्थेचे राज्य आणण्यासाठी आम्हीच कसे सक्षम आहोत हे दाखवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. या युक्तीनुसार त्यांनी ‘अॅट्रॉसिटी लिटरेचर’चा आसरा घेतला. आपली बाजू मांडण्यासाठी ब्रिटिश सरकारने कित्येक लेखकांना पैसे देऊन ठगांच्या विरोधात पुस्तके लिहिण्यास प्रवृत्त केले. 


अठरापगड जातीची माणसे लुटमारीमध्ये सहभागी असतानाही फक्त आणि फक्त वसाहतवाद वाढवण्यासाठी ब्रिटिशांनी ठग नावाची एक नवीन जात जन्माला घातल्याचा स्पष्ट आरोप अनेक संशोधकांनी केला आणि पुढे ते सिद्ध झालेदेखील. कारण ठगांचा १८३६-१८४८ या कालावधीत पूर्णत: बंदोबस्त केल्यानंतर ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बॉम्बे प्रेसिडन्सी कायद्यांतर्गत (Criminal Tribes Act)भटके जीवन जगणाऱ्या जातींना कायदेशीररीत्या गुन्हेगार ठरवलं. म्हणजे या जातींची एक यादी बनवली. ज्यात ठगांसह ब्रिटिशांविरोधात जंगलात लढणाऱ्या अनेक जाती-जमातींचा त्यात समावेश केला गेला. या यादीत समाविष्ट जातींसाठी खुले तुरुंग तयार केले गेले. या तुरुंगातील लोकांसाठी अनेक प्रतिबंध घातले गेले. १८७१ चा गुन्हेगारी जमात कायदा जरी ३१ ऑगस्ट १९५२ ला मोडीत काढला गेला असला तरी आजही भारतात विमुक्त भटक्यांच्या अशा काही जाती आहेत,ज्यांच्या कपाळावरचा चोर-दरोडेखोर असण्याचा शिक्का पूर्णपणे पुसला गेलेला नाही. 


मात्र, हे जळजळीत ऐतिहासिक सत्य ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक लिहिलेल्या  छद्मइतिहासामुळे नजरेआड केले गेले. मुळातल्या अतिरंजित गोष्टीतले सामाजिक-सांस्कृतिक श्लेष ध्यानात न घेता "ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या निर्मात्याने त्यावर आणखीनच कळस चढवला. परिणामी, चित्रपट उताणा पडला, ठगांचा खराखुरा इतिहास झाकोळला राहिला.

बातम्या आणखी आहेत...