आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रथमेश पाटील
पुस्तक परीक्षण किंवा परिचय ही खरं तर प्रकाशक, विक्रेते आणि वाचणारे यांना जोडणारी गोष्ट. म्हणून बऱ्याचदा परीक्षण वा परिचय नुकत्याच बाजारात आलेल्या पुस्तकासंदर्भातील असतो. पण, मी मुद्दामच एका दुर्मिळ आणि जुन्या इंग्रजी पुस्तकाने सुरूवात करायचं ठरवलं आहे. १८ व्या शतकातील सर्वांत प्रसिद्ध तत्त्वज्ञ-साहित्यिकाच्या लेखनाची गुंफण करणारं आणि त्याला एका आगळ्यावेगळ्या रचनेत बांधणारं हे पुस्तक म्हणजे ‘व्हॉल्टेअर्स अल्फाबेट ऑफ विट.’
व्हॉल्टेअर, म्हणजे फ्रान्स्वा मरी अर्वा हा २१ नोव्हेंबर १६९४ ला फ्रान्समध्ये एका क्लार्कच्या घरी जन्मला. त्याने १७१८ मध्ये नावातले शब्द पुढं-मागं करून स्वतःचं नाव ‘व्हॉल्टेअर’ केलं आणि सार्वजनिक जगातला वावर व लिखाण त्याच नावानं केलं. त्यानं आयुष्यभर त्याच्या खुमासदार, तीक्ष्ण आणि निर्भीड शैलीतून थेट धर्मसत्ता, राजसत्ता आणि धार्मिक कट्टरतावाद्यांवर हल्ला चढवला. त्याच्या एकूणच लिखाणाला, त्या काळात युरोपात जे ‘रेनेसॉ’ आणि ‘एन्लायटन्मेंट,’ अर्थात “प्रबुद्ध’ होण्याच्या चळवळीची पार्श्वभूमी होती. त्याचं लेखन इतकं गाजलं, प्रभावी ठरलं आणि त्याच्यातून एवढी बौद्धिक चेतना निर्माण झाली, की काही जण या पूर्ण कालखंडाला, ‘द एज ऑफ व्हॉल्टेअर’ अर्थात ‘व्हॉल्टेअरचं युग’ संबोधतात.
‘व्हॉल्टेअर्स अल्फाबेट ऑफ विट’ अर्थात व्हॉल्टेअरच्या चातुर्याची बाराखडी, हे पुस्तक आहे फक्त ६० पानांचं. त्याची बांधणी हार्ड बॅक आणि आकार आहे फक्त ४ इंच बाय ७ इंच! एखाद्या टुरिस्ट हँडबुकसारखं, पण हातात काहीतरी सुरेख आहे, असं वाटणारी बांधणी. या पुस्तकात व्हॉल्टेअरच्या संपूर्ण लेखनातून, निवडक बाबतीतले वेचक विचार, इंग्रजी बाराखडीच्या अक्षरानुसार छोट्या छोट्या निबंधाच्या स्वरूपात मांडले आहेत. म्हणजे व्हॉल्टेअरच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचे अवकाश एका मजेशीर, आकर्षक आणि सहज स्वरूपात मांडलं आहे.
या लघुनिबंधांतून व्हॉल्टेअर A या अक्षरात अॅडमपासून, E फॉर इंग्लिश ड्रामा, G फॉर गव्हर्नमेंट, M फॉर मॅरेज ते Z फॉर झीलपर्यंत टिपण करताना दिसतो. पुस्तकाचे संपादक पॉल मॅकफरलीन काळजीपूर्वक निबंध निवडताना दिसतात, ज्यातून व्हॉल्टेअरचं तीक्ष्ण व्यंगात्मक चातुर्य तर दिसेलच, पण त्याच्या विषयांचा अवकाश आणि मर्यादाही दिसतील. आणि हे सगळं फक्त ६० पानांमध्ये. यातील काही निबंध वाचल्यावर लक्षात येतं की व्हॉल्टेअरला अनेक वेळा सत्ताधाऱ्यांचा रोष का सहन करावा लागला आणि त्याला तुरुंगवास का झाला असावा? व्हॉल्टेअर खट्याळ, निर्भीड आणि खूपच ओघवत्या भाषेत लिहायचा आणि ते प्रत्येक ओळीतून आणि उताऱ्यातून जाणवतं. उदा. B फॉर बुक्समध्ये हे लेखकराव स्वतःच्या पुस्तक व्यवसायाबद्दल लिहितात, “तुम्ही एक पुस्तक प्रकाशित करता, तेव्हा एखादी धर्मसंस्था तुमच्यावर धर्मद्रोहाचा ठपका ठेवते, एखादा अगदीच नवखा, कॉलेजमधला तरुण तुमच्या लिखाणातल्या चुका काढतो, एखादा अशिक्षित तुम्हाला शाप देतो, लोक तुमचा अपमान करतात, तुमचा प्रकाशक तुमची सोबत सोडतो आणि मद्य विकणारा तुम्हाला ती उधार द्यायचं बंद करतो. त्यामुळं मी नेहमी माझ्या प्रार्थनेत म्हणतो, ‘हे ईश्वरा, मला माझ्या पुस्तक निर्मितीच्या हौसेतून मुक्त कर!’
आणखी पुढं ‘W फॉर वॉर’मध्ये युद्धाबाबत तो म्हणतो, “देवानं माणसाला बुद्धी दिली, तर त्यानं त्याचा वापर करून स्वतःला प्राण्यांसारखं वागण्यापासून थांबवावं, कारण त्याच्याकडे कोणाला इजा करायला ना प्राण्यांसारखी नैसर्गिक सामग्री आहे ना तसा हिंस्रपणा. मानवतेचा, औदार्याचा, करुणेचा, सहनशीलतेचा, शांततेचा, ज्ञानाचा आणि पावित्र्याचा उपयोगच काय, जर लोखंडाची थोड्या वजनाची एक वस्तू माझ्या आरपार जाऊन मी विसाव्या वर्षी जीव गमवावा, तेही या यातनेत की मी ज्या गावात जन्मलो ते माझ्यासमोर आगीत भस्म होतंय आणि त्या कोसळलेल्या घरांच्या खाली निष्पाप बालकं आणि स्त्रिया किंचाळत आहेत? आणि हे सर्व एका अशा व्यक्तीच्या हट्टासाठी ज्याला मीओळखतही नाही!’
थोडक्यात, व्हॉल्टेअरच्या चातुर्याची बाराखडी हे पुस्तक नवीन वाचक, वाचनाची फारशी आवड नसणारे, नवयुवक यांच्यासाठी तत्वज्ञानातल्या एका भन्नाट व्यक्तिमत्वाची तोंडओळख करून देण्यासाठी अप्रतिम आहे. स्वातंत्र्य, उदारमदवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकता आणि मूल्ये यांची थट्टा होण्याच्या किंवा त्यांचा ऱ्हास होण्याच्या या काळात मराठी प्रकाशकांनी अवजड तत्वज्ञानाची अशा स्वरूपातली पुस्तकं निर्माण करायला हरकत नाही.
लेखकाचा संपर्क : 8237941476
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.