Home | Magazine | Madhurima | Pratibha Hampras writes about Priyanka Chopra-Nick Jonas engagement

वयातील अंतराचा इतका बभ्रा का?

प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद | Update - Aug 28, 2018, 12:41 AM IST

नुकतीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियातून सर्वत्र पसरली.

 • Pratibha Hampras writes about Priyanka Chopra-Nick Jonas engagement

  नुकतीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियातून सर्वत्र पसरली. निक अमेरिकन असून प्रियंकापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे हे महत्त्वाचे सूत्र यात सतत अधोरेखित होत होते. याचे पडसाद व्हाॅट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया व गटागटाच्या चर्चेतून उमटत आहेत. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा करण्याइतका खरंच हा गंभीर विषय आहे...


  ऐकलंस का? तिचा नवरा तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे म्हणे…
  काय बाई हे! मोठ्यांच्या गोष्टी, किती दिवस टिकेल हे लग्न शंकाच आहे...
  निक कशाला, भारतात काय कोणी सापडलं नाही का?
  नाही गं, तिने दत्तक घेतला असेल…
  अशा एक ना अनेक कमेंट्सचा भडिमार होतोय. ताशेरे आणि पंरपरेचा बोजवारा झाल्याचा व प्रथा मोडीत निघाल्याचा सूर उमटत आहे.
  खरंच अशी काही भयानक घटना आहे का ही, जिचा इतका ऊहापोह व्हावा, चर्चा व्हावी, लोकांनी वाट्टेल ती विधानं करावी?
  ही एका स्त्री व पुरुषाची वैयक्तिक गोष्ट आहे. वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची बातमी व्हायरल झाली इतकेच ना!
  खरं तर आधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असे विवाह झालेले आहेत. यात गैर काय आहे? आपण फक्त सोयीप्रमाणे बदल स्वीकारतो. बदल विशेष लोकच करतात, हे लक्षात घ्यायला हवे. लग्न टिकण्याची खात्री कोणत्याच ठिकाणी देता येत नाही. पत्रिका, गुणमिलन पाहून, पतीचे वय-शिक्षण-घराणे, सर्व उच्चीचे पाहून केलेले विवाह टिकतातच असेही नाही. आदर्श असेच कोणी तरी वेगळ्या वाटेने गेल्यावर निर्माण होतात. आणि बायको वयाने मोठी असलेले हे पहिले उदाहरण नाही. ही यादी खूप मोठी आहे. सचिन तेंडुलकरपासून… मुळातच जे जे मोठे ते असा लहान विचार करत नाहीत.


  यालाच बदल म्हणतात. नवरा कितीही वयस्कर, मोठा आणि बिजवर असला तर चालेल, पण बायको मोठी असली तर फरक पडेल, परंपरा मोडेल, असे आहे का? जर एकमेकांवर खरेच प्रेम असेल तर वय, जात, धर्म, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. आपल्याकडेच अशा प्रथापरंपरा वा नियम आहेत, असं नाही. इंग्लंडच्या राजघराण्यातील सदस्यांसाठी सामाजिक जीवनात वावरण्याचे खूप कडक नियम व परंपरा असून त्यावर तेथील चर्चच्या धर्मगुरूंचा अंकुश असतो.


  लंडनचा राजा एडवर्ड होता. पण एक वर्षाच्या आत त्याला राज्यपद सोडावे लागले कारण त्याची प्रेयसी राजघराण्यातली नव्हती आणि घटस्फोटित होती. ख्रिश्चन धर्मगुरूंनी काही राजनियम केलेले होते. त्यानुसार एडवर्डला राजा असताना तिच्याशी विवाह करता येणार नव्हता. परंतु आपल्या निस्सीम प्रेमामुळे त्याने राज्यपदाचा त्याग केला आणि विवाह करून फ्रान्सला निघून गेला. काही महिन्यांपूर्वी हॅरी या राजपुत्राचे लग्न झाले, त्याची बायको मेगन मर्केल अमेरिकन अभिनेत्री, लेखिका व स्त्रीस्वातंत्र्य पुरस्कर्ती, घटस्फोटित, हॅरीपेक्षा वयाने मोठी आणि सामान्य घरातली आहे. नियमांच्या बाबतीत अतिशय कठोर असलेल्या ठिकाणी जेथे राजपद त्यागावे लागले होते तेथेच हा सकारात्मक बदल स्वीकारला गेला. मग आम्ही असे संकुचित का?
  पतीचे वय जास्त व पत्नीचे कमी का असावे, यावर स्त्रियांना समज लवकर येते असं मानलं जातं. मग याच न्यायाने स्त्रियांनी बदल पण लवकर स्वीकारायला हवेत. उलट स्त्रियाच जास्त प्रतिक्रिया देतात व विरोधी बोलतात, रूढी-परंपरा त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे बदलायला हव्या - आणि ते स्त्रियांनी करायला हवे. विनाकारण कमेंट करणे हे तर कुणाच्याही खाजगी आयुष्यावर ताशेरे ओढून असुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न वाटतो. उद्या जर हीच घटना जवळच्या नात्यात, रक्ताच्या नात्यात घडली तर काय करणार? वेळ कोणावर सांगून येत नाही. गैरसमज नसावा, भावार्थ लक्षात घ्या.शेवटी प्रत्येकाचे मत वेगळे असते.
  काय वाटते आपल्याला?
  आपल्याच मुलीने वयाने लहान असलेल्या मुलाशी अथवा मुलाने वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी विवाह करायचे ठरवले तर?
  म्हणणार का, दत्तक घ्यायचे का असे? आणि ऐकतील का मुले तुमचे?
  विचार करा. परिस्थिती, समाज, आणि वेळ नेहमी बदलत असते तसे विचारही बदलायला हवेत.

  - प्रतिभा हंप्रस, औरंगाबाद
  pratibha.hampras@gmail.com

Trending