आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नांचे बगळे उडवण्याची गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसाद कुमठेकर यांनी ‘बगळा’ ही कादंबरी  ‘उदगिरी’ भाषेत लिहिलेली आहे. या भाषेचा गोडवा या निमित्तानं इतरांना कळणार आहे. लेखकाची लिहिण्याची शैली ही अवखळ आहे आणि कोणत्याही तथाकथित साहित्यिक मूल्यांचं, संकेतांचं, शैलींचं ओझं तिनं साफ झुगारून दिलं आहे. त्यामुळे यातली मुळातली उदगिरी भाषा, तिला प्रमाण मराठीची फोडणी, सोबतीला हिंदीचा टच यामुळे बोली भाषेचा जिवंतपणा यात टिकून राहिला आहे

माणसाचा आजवरचा प्रवास आणि प्रगती कशामुळे झाली या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नामुळे. माणसाला प्रश्न पडले नसते, त्यानं प्रश्न विचारले नसते आणि त्यांची उत्तरं शोधण्यासाठी प्रयत्न केले नसते तर तो अजूनही जंगलातच इतर प्राण्यांबरोबर जगत राहिला असता. प्रश्नांची मानवी जीवनांत अत्यंत मोलाची कामगिरी आहे आणि तरीही आपल्याला सर्वांत जास्त चीड येते ती या प्रश्न विचारण्याचीच. त्याचं कारण आहे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा ती तुमच्या ज्ञान-माहितीची अनधिकृत परीक्षाच असते. यात बहुतेक लोक अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे आपली झाकली मूठ उघडू पाहणाऱ्या या प्रश्नांना बहुतेक लोक केराची टोपली दाखवतात. प्रश्न विचारल्यामुळे आनंद झालाय असे लोक फारसे आढळत नाहीत. त्यामुळेच प्रश्न विचारण्याचा आनंद घेणारे लोकही फारसे आढळत नाहीत. ते जिथे आढळतात तिथे मग एक छुपं युद्धच सुरू होतं. 

प्रसाद कुमठेकर यांची ‘बगळा’ ही कादंबरी अशाच एका युद्धाची रंजक कथा आहे. यातला नायक आहे चिंत्या नावाचा बारा वर्षांचा एक मुलगा. ज्याला प्रश्न विचारण्याची सवय आहे. या प्रश्न विचारण्यामागे असलेलं त्याचं कुतूहल मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्याचा कायम कोंडमारा होतोय. या कादंबरीत तीन प्रमुख पात्रं आहेत. एक आहे चिंत्या, दुसरा आहे बगळा आणि तिसरा आहे प्रश्न. चिंत्या एकच असला तरी बगळ्यांची संख्या जास्त आहे आणि त्याहून जास्त आहे प्रश्नांची संख्या. या तिघांभोवती फिरणारी ही कादंबरी यांच्या सभोवतालच्या अन्य पात्रांच्या मनोगतांमधून उलगडत जाते. जे चिंत्याबद्दल बोलत राहतात, त्यात त्याचे मित्र आहेत, घरचे लोक आहेत, आणि त्याचे शिक्षक आहेत. ज्यांना चिंत्याच्या प्रश्न विचारण्याबद्दल कौतुक, कुतूहल, चीड, संताप, नवल, अभिमान अशा सर्वच भावना आहेत, ज्या व्यक्तीगणिक बदलत राहतात. याला इतके प्रश्न का पडतात याचं मित्रांना कुतुहल आहे, तर याला इतके प्रश्न पडतातच का याची शिक्षकांना चीड आहे. चिंत्या मात्र याचा विचार न करता आपलं प्रश्न विचारण्याचं काम करत राहतो कारण तो त्याचा उपजत स्वभाव आहे. 

कथेतील दुसरं पात्र आहे बगळा. चिंत्याची त्याच्याशी ओळख योगायोगानं होते. क्रिकेट खेळताना हरवलेल्या चेंडूची नुकसानभरपाई म्हणून अकरा रुपये मिळवण्यासाठी कोणीतरी चिंत्याला बगळे विकण्याचा सल्ला देतो. चिंत्याच्या शाळेच्या मागेच एक तळं आहे आणि तिथं भरपूर बगळे आहेत. इतके बगळे विकले तर त्यातून आपले बरेचसे आर्थिक प्रश्न सुटतील असं एक गणित चिंत्याच्या डोक्यांत आहे. तिथून त्याचा बगळ्यांशी संबंध सुरू होतो. बगळे पकडण्याच्या नादात त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे शिक्षक त्याच्या घरी पत्र पाठवून त्याची तक्रार करतात. शिक्षक, विद्यार्थी, शाळा आणि शिक्षण व्यवस्था यांची परिस्थिती यावरच चपखल आणि परखड विश्लेषण या निमित्तानं केलं जातं. सुदैवानं चिंत्याचे मुख्याध्यापक करडखेलकर गुरुजी हे समंजस आहेत. मुलांच्या मनांची त्यांना जाणीव आहे. ते कलासक्त आहेत. मुख्य म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या चिंत्याची त्यांना भीती वाटत नाही जशी इतरांना वाटते. चिंत्याच्या अनुपस्थितीवरून ते ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतात त्याचा सर्व शिक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. 

प्रसाद कुमठेकर यांनी उदगिरी भाषेत लिहिलेली ही कादंबरी आहे. ही लातूर उस्मानाबाद पट्ट्यातली भाषा. या भाषेचा गोडवा या निमित्तानं इतरांना कळणार आहे. लेखकाची लिहिण्याची शैली ही अवखळ आहे आणि कोणत्याही तथाकथित साहित्यिक मूल्यांचं, संकेतांचं, शैलींचं ओझं तिनं साफ झुगारून दिलं आहे. त्यामुळे यातली मुळातली उदगिरी भाषा, तिला प्रमाण मराठीची फोडणी, सोबतीला हिंदीचा टच यामुळे बोली भाषेचा जिवंतपणा यात टिकून राहिला आहे. लेखकानं यात वापरलेल्या प्रतिमा आणि उपमा यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण त्या सामान्य माणसाच्या सामान्य जगण्याचं प्रतिनिधित्त्व करतात. अलंकृत बोजड अवघड अर्थदुष्कर पांडित्याचं प्रदर्शन मांडणारी ही भाषा नाही. “बोबड्याचा वाडा म्हन्जी रेल्वेच्या डब्यावानी हाय”, “तिची स्मायलिंग म्हन्जी ‘बहारो ूुल बरसाओ’, “आता आव्वा एकदम पानपसंद मदल्या बाईसारखी झपमन कडू सुरातून गोड सुरात आली.” ही रोजच्या जगण्यातली भाषा आहे. जी थेट मनात घुसते. अन्य पात्रांच्या दृष्टिकोनातून चिंत्याची ही गोष्ट उलगडत जाते हे या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे या बाकीच्या पात्रांचे स्वभावही आपल्या मनाची पकड घेतात. यातलं प्रत्येक पात्र हे ठाशीव आहे पण ते बटबटीत वाटत नाही. कारण त्याचा पाया साधेपणावर उभारलेला आहे. या सर्वांना बांधून ठेवणारा चिंत्या हा साधेपणाचं, निरागसपणाचं उदाहरण आहे. ब्राह्मणी कुटुंबातील हा मुलगा इतर जातीधर्मांच्या मुलांसोबत वावरताना आपल्या या निरागसपणामुळेच सर्वांना आकर्षित करून घेतो. त्याची प्रश्न विचारण्याची सवय ही इतरांच्या कुतूहलाचा विषय बनते. ज्यातून प्रश्न विचारण्याला आपला समाज कसा प्रतिक्रिया देतो हेही उलगडत जातं. त्याची काही उदाहरणं सांगण्यासारखी आहेत. “मोठ्यांचं हे मातर लैच भारी असतंय बरं का. आपल्याला उत्तर इना गेलं का इचारनाऱ्याचा प्रश्नच खारीज करायचा.” किंवा “ज्येंना काई येत नाही त्यांना उगूच्च कमीपना वाटतोय. मंग आपल्या कमीपनाची भरती आमच्यावर हिडीस फिडीस करून होत होती.” 

ही कादंबरी विद्यार्थी, शिक्षक, शाळा, शिक्षण व्यवस्था यांच्यावरचं एक अप्रतिम निखळ भाष्य आहे. आधी म्हटल्याप्रमाणे करडखेलकर या शिक्षकानं चिंत्याच्या शाळेतील अनुपस्थितीवरून जे मनोगत मांडलंय ते प्रत्येक शिक्षकानं आवर्जून वाचायलाच हवं. इतकंच नाही तर शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रत्येक घटकानं ते वाचायला हवं आणि त्यानुसार आपल्यांत थोडी तरी सुधारणा करायला हवी. लेखक लिहितो की, “इंटरेष्ट ही एकच गोष्ट शिक्षनाला चंद्रावर निवून ठिवू शकते.” या कादंबरीचं सार जर एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर हे वाक्य सांगता येईल. चिंत्यालाही जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत मनापासून रस आहे म्हणूनच त्याला प्रश्न पडतात. त्यांची उत्तरं तो स्वतःहून शोधण्याचा आधी प्रयत्न करतो. त्यासाठी किंमत मोजण्याचीही त्याची तयारी आहे. शिक्षकांवर जर शिक्षणबाह्य कामांचं ओझं नसेल तर कदाचित तेही मुलांना रस घेऊन शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. शिक्षण व्यवस्थेनं शिकण्यात रस निर्माण होईल अशी शिकवणुकीची पद्धत ठेवली तर विद्यार्थ्यांनाही शाळा आवडू लागेल. चिंत्याच्या निमित्तानं लेखकानं शिक्षण व्यवस्थेवरचं एक सुंदर चिंतन या कादंबरीत मांडलं आहे. 

बगळा पकडण्यासाठी धडपडणारा चिंत्या त्या प्रक्रियेत कसा शिकत जातो, अनुभवानं शहाणा होतो याचंही सुरेख चित्रण यात आहे. कारण शेवटी तो जरी बगळा पकडतो तरी तो विकत नाही तर त्याला सोडून देतो. कारण तो सगळ्यांबरोबर उंच उडताना जास्त भारी दिसतो हे त्याला समजतं. मुख्य म्हणजे एकदा बगळा पकडल्यानंतर त्यांतून तो स्वतःची सोडवणूक करून घेतो. कारण त्याला माहित आहे की बगळा पकडणं हे काही त्याचं काम नाही. ती उत्सुकता होती जी आता शमली आहे. आता नव्या कुतूहलांचा शोध घेण्यासाठी तो तयार आहे. कादंबरीच्या शेवटाचं वाक्य इथं लागू होतं, “आज चिंतूचे सगळेच प्रश्न एकसाथ निकाली लागत होते. तोसुद्धा आता सोडलेल्या बगळ्यासारकं मोकळं मोकळं वाटून उडत होता. पुन्हा एकदा त्याचं डोकं हालकं हालकं, रिकामं रिकामं होत होतं, नव्याकोऱ्या प्रश्नांसाठी.” चिंत्याची ही निरागस प्रश्न मालिका अनुभवण्याची संधी कोणाही सुजाण वाचकानं चुकवू नये अशीच आहे. लहान-थोरांनी एकत्र बसून वाचावी अशी ही मराठीतली एक महत्त्वाची समकालीन साहित्यकृती आहे. 

- कादंबरी - बगळा
- लेखक - प्रसाद कुमठेकर
- प्रकाशक - पार पब्लिकेशन्स
- मूल्य - ३०० रु. 

प्रतीक पुरी

pratikpuri22@gmail.com

लेखकाचा संपर्क - ८४११९४७५०२

बातम्या आणखी आहेत...