आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्यकेंद्री बंडखोरीच्या कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजपरिवर्तनाच्या चळवळींना ग्रासणाऱ्या व्यक्तिवादावर, व्यक्तींच्या कमतरतांवर, वैयक्तिक चढाओढींवर, दांभिक वृत्तींवर अर्जुन जगधने यांच्या कथा नेमकेपणाने बोट ठेवतात.  स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधणारी माणसेही या कथांत भेटतात आणि या माणसांना त्यांची योग्य जागा दाखवून देणाऱ्या स्त्रियाही...


जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशात ‘नैतिकता' ही संकल्पना समजुतीच्या प्राथमिक पातळीवर स्त्रियांशी जोडली गेलेली दिसते. खरे तर नैतिकता ही व्यापक मूल्यसंकल्पना आहे. माणसाच्या जगण्यातील जवळपास सर्वच अंगांमध्ये तिची स्वत:ची अशी एक जागा आहे. तिचे सर्वात जवळचे नाते केवळ आणि केवळ सत्याशी आहे. सत्य काय आहे आणि समोर काय येते किंवा ठेवले जाते किंवा ठेवावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होतो यातल्या फरकावर, अंतरावर ती कृती नैतिक आहे की अनैतिक हे ठरत असते. 


नैतिकता व्यक्तीच्या अंतर्मनाशीही निगडित असते. बाह्य जगाचे नियम, कायदे, समाजरचना, श्रद्धा, समजुती, परंपरा, रीतीरिवाज यांच्याशी कधी सुसंगती साधत तर कधी त्यांचा काच सहन करत माणसे वाट्याला आलेले आयुष्य जगत राहतात. जसजसे हे द्वंद्व वाढत जाते, तसतशी माणसे परिस्थितीशरण  आणि समूहशरण तरी होतात किंवा त्याविरुद्ध बंडखोरी तरी करतात. एक तिसरा मार्गही आहे... वरवर चौकटी सांभाळत व्यवहारात मात्र हवे ते मिळवण्याचा. या तिसऱ्या मार्गात फसवणूक असते,मोठ्या प्रमाणावर; आपल्याशी संबंधित व्यक्ती वा समूहाची आणि अर्थातच आपल्या स्वत:चीही! यात समाजव्यवहारांच्या विसंगतीचा भाग असा, की अशा तिसऱ्या मार्गाने जाणाऱ्यांचा फार गवगवा होत नाही. ती व्यक्ती मातब्बर असेल, धनवान असेल, मुखवटा आणि चेहरा शिताफीने वागवणारी असेल, समूहाला कोणत्याही अर्थाने उपयुक्त ठरणारी असेल आणि मुख्यत: पुरुष असेल तर तिथे काणाडोळा केला जातो. उपरोक्त बाबींशी निगडित असणाऱ्या प्रभावशाली स्त्रियांनाही काही प्रमाणात हा लाभ मिळतो, मात्र त्याला छोट्याशा कारणावरूनही तडा जाण्याची शक्यता कायम राहते. त्यांची प्रतिष्ठा टिकून राहीलच याची शाश्वती पुरुषांच्या तुलनेत कमीच असते. जी माणसे परिस्थितीशरण होणे पसंत करतात, त्यांना केवळ तेवढ्याच एका निकषावर ती सभ्य आणि पर्यायाने नैतिक असल्याची प्रमाणपत्रे मिळून जातात. 


प्रश्न बंडखोरी करणाऱ्यांबाबत निर्माण होतात. समाजनियम आणि अंतर्मन यांच्यातील द्वंद्वात अंतर्मनाच्या बाजूने ठाम उभे राहणाऱ्या व्यक्तींचे व्यवहार सार्वजनिक लेखापरीक्षणासाठी उपलब्ध असतात. त्यांच्या कृती वास्तवात नैतिक असल्या, सत्याच्या जवळ असल्या तरी अशा व्यक्तींवर अनैतिकतेचे शिक्के मारणे सोपे असते.  एका आणखी महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. आयुष्याच्या एका अंगातील तथाकथित नैतिकता पाळली किंवा पाळल्यासारखे दाखवले, की दुसऱ्या अंगांमधल्या नैतिकतेला रामराम ठोकला तरी चालून जाते. उदा: धार्मिक रूढीप्रियतेचे सतत आणि भरपूर प्रदर्शन करत राहिले, की धनसंपत्ती, अन्य व्यक्तींची प्रतिष्ठा, सोयीस्कर सत्य सादर करणे याबाबत केल्या जाणाऱ्या तडजोडी अनैतिक आहेत, असे त्या व्यक्तीला व तिच्या भवतालच्या समाजालाही फारसे वाटत नाही. म्हणजे, सिद्धिविनायकाला सोन्याचा मुकुट अर्पण करणाऱ्याने ते पैसे कोठून आणले किंवा त्याने आपल्या पदाचा वा परिस्थितीचा वापर करून त्याच्याशी संबंधित असलेल्या स्त्रियांचा नको तसा वापर करून घेतला हे जाहीर असले, तरी या गोष्टींची चर्चा जवळपास होतच नाही. परंतु रूढ समाजमान्य समजुतींना आव्हान देणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनातील सूक्ष्म तपशीलही समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरू शकतात.  विशेषकरून, अशा व्यक्तीने उभी केलेली आव्हाने निष्प्रभ करण्यासाठी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक चारित्र्याला वेठीला धरले जाते. पण सर्वात दाहक जर काय असेल, तर सत्य, न्याय आणि समता या नैतिक मूल्यांचा आग्रह धरणे हेच अनैतिक ठरवले जाणे! परिस्थितीशरण न होता, परिस्थिती बदलण्यासाठी ठाम राहणे हाच तथाकथित नैतिकतेशी द्रोह असल्याचा डांगोरा पिटणे!! आपल्यासारख्या जातउतरंडीवर आधारलेल्या आणि स्त्रियांना दुय्यम स्थान असणाऱ्या देशात समाजनियमांचे ठेकेदार हे सर्व सहजपणे अमलात आणू शकतात.  अर्जुन जगधने यांच्या कथांमध्ये अशा बंडखोर व्यक्तींनी मोठा हिस्सा व्यापलेला दिसतो. या कथांमध्ये वावरणाऱ्या व्यक्ती सर्वसामान्य घरांतल्या आहेत, मात्र केवळ स्वत:पुरतं जगणाऱ्या वर्गवारीतल्या नाहीत. त्या निरनिराळ्या तऱ्हेने समाजाभिमुख आहेत. भेदाभेद नसलेला चांगला समाज घडवू पाहणाऱ्या आहेत. बरेचदा त्यांची दिनचर्या आणि वावर चाकोरीबाहेरचा आहे. अगदी नेमकेपणाने सांगायचे, तर यातील बहुतांश पात्रे समाजपरिवर्तनाच्या चळवळींशी निगडित आहेत. ती नुसती बोलत नाहीत, तर जनसमूहांत सक्रीय आहेत.  यातील काही पात्रे कलावंत, शिक्षक वर्गवारीतली आहेत. 


या पात्रांचा संघर्ष समाजाशी तर आहेच, पण ते ज्या गटांत, ज्या संस्था-संघटनांत कार्यरत आहेत, तेथील विसंगतींशीही आहे. त्यांच्या या संघर्षमय, क्रियाशील आणि संवेदनशील जगण्याचा प्रभाव आणि परिणामही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांवर पडताना दिसतो. त्यातून जे ताणतणाव निर्माण होतात, त्यामुळे या व्यक्ती पिळवटून निघालेल्या दिसतात आणि त्याच वेळी उपजत अथवा कमावलेल्या संघर्षशीलतेमुळे त्या ठाम उभ्याही राहिलेल्या दिसतात. एवढेच नव्हे, तर धाडसी निर्णय घेताना आणि कृतीही करताना दिसतात. 
या पात्रांचे हे धाडसी निर्णय आणि कृती बरेचदा नैतिक आणि अनैतिक या संकल्पनांची चर्चा छेडतात. तत्त्वच्युत झालेल्या पतीपासून अलग होऊन विचारपूर्वक दुसऱ्या विचारी आणि आवडीनिवडींचे सूत जमू शकणाऱ्या पुरुषाशी नवे सहजीवन सुरू करणाऱ्या स्त्रिया या कथांमधून भेटतात. सरधोपटपणे वागणारा समाज दुसरा विवाह करणाऱ्या स्त्रीकडे फारशा आपुलकीने पाहत नाही. त्यात आधीचा संसार मोडून दुसरी निवड केली असेल, तर नाहीच नाही. पण जगधने यांनी उभी केलेली स्त्री पात्रे काही एका विचारातून, नैतिक भूमिकांतून हा निर्णय घेताना दिसतात. हे वाक्य चमत्कारिक वाटेल, परंतु मूल्यांशी प्रामाणिक असण्याची नैतिकता पाळणे महत्वाचे वाटल्यानंतर केवळ बाह्य समाजाला अनैतिक वाटेल, असे दडपण मनावर येऊ न देता आपल्या जगण्याला पर्याय देण्याचे धाडस त्या दाखवतात. 


स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधणारी माणसेही या कथांत भेटतात आणि या माणसांना त्यांची योग्य जागा दाखवून देणाऱ्या स्त्रियाही! समाज परिवर्तनाच्या चळवळींना ग्रासणाऱ्या व्यक्तिवादावर, व्यक्तींच्या कमतरतांवर, वैयक्तिक चढाओढींवर, दांभिक वृत्तींवर जगधने यांच्या या आठ कथा प्रकाश टाकतात. मात्र केवळ हेच दाखवण्याचा तर्कदुष्टपणा लेखक करत नाही. हे दोष ठसठशीतपणे दाखवतानाच ते दूर करण्यासाठी झोकून दिलेली, प्रयत्नरत असणारी पात्रेही या कथांमध्ये भेटतात. परिवर्तनाच्या चळवळींविषयी लेखकाला असलेली आस्थाच त्यातून प्रकट होते. त्यामुळे हे चित्रण नकारात्मक किंवा केवळ बोटे रोखण्यावर थांबत नाही, तर पर्याय देण्याची जबाबदारीही घेते.  पैसा, मनगटशक्ती, जात, धर्म, कंपूबाजी, गुन्हेगारी यांचा पाया करून उभे राहिलेल्या आपल्या देशातल्या राजकारणावरही या कथा प्रकाश टाकतात. वर्गजातविहीन समाजरचना करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणारी फरफट, निराशा, उपहास याबद्दलही या कथा काही सांगू पाहतात. अर्जुन जगधने हे शिक्षकी पेशातील आहेत. विषय सुलभ करून सांगणे हे व्यवसायविशिष्ट वैशिष्ट्यही या लेखनात आढळते. त्यामुळे एकदा वाचायला सुरुवात केली, की कथा पूर्ण झाल्याशिवाय वाचक थांबत नाही. त्यांच्याकडे अनुभवाचा, मानवी मासल्यांचा खजिना असणार. आपले लेखन त्यांनी चालूच ठेवावे, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते. 


पुस्तकाचे नाव : नैतिक - अनैतिक
लेखक-अर्जुन जगधने. प्रकाशक- ग्रंथाली
पृष्ठे - १८८. मूल्य - २०० रु.


प्रतिमा जोशी   
pratimajk@gmail.com

बातम्या आणखी आहेत...