आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवीण ब्रम्हपूरकर
सन्मानपूर्वक प्रसुती आणि अशा प्रसूतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क आहे. तो प्रत्येक गर्भवती महिलेला सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये न मागता मिळाला पाहिजे आणि हा हक्क मातांना तेव्हाच मिळेल जेव्हा गर्भवती महिलांना सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या आचार-विचार व दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल होईल. त्यासाठीच डॉक्टर-परिचारिका व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून झाली आहे.
प्रसुती आणि सरकारी दवाखान्यात... काय वेडबीड लागलंय की काय...? सर्वसामान्यांची ही नेहमीची प्रतिक्रिया. आणि त्याला कारणही तसेच. एकंदरीतच सरकारी दवाखान्याची अवस्था पाहून अशी प्रतिक्रिया उमटणे अत्यंत स्वाभाविक आहे. असे असले तरी एकदा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात जाऊन याच, तुमच्या सर्व शंकाकुशंका काही क्षणातच गळून पडतील. औरंगाबादच्या या सरकारी रुग्णालयाने "सन्मानपूर्वक मातृत्व सेवा'हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याची दखल आज जागतिक आरोग्य संघटनेला घ्यावी लागली आहे. विशेष बाब म्हणजे घाटीत प्रसुतीच्या वेळी लेबर रुममध्ये प्रसुती सोबतीण मग ती मुलीची आई असो अथवा सासू वा तिची मैत्रीण या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
खासगी रुग्णालयात आरोग्यावर होणारा खर्च न परवडणारा असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला सरकारी रुग्णालयांचा मोठा आधार असतो. औरंगाबादच्या शासकीय रुगणालयात २०१२ मध्ये १२ हजार ३३० प्रसुती झाल्या होत्या. गेल्या आठ वर्षात प्रसुती सात हजारांनी वाढली असली तरी त्या तुलनेत सुविधांची वानवा असताना उपचारपद्धतीमध्ये वारंवार सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे सन्मानपूर्वक मातृत्व योजनेमुळे हा बदल झाल्याचे चित्र घाटीत पहायला मिळत आहे.
पूर्वी प्रसूती या रुग्णालयांमध्ये होण्याचे प्रमाण अत्यल्प होते आणि त्यामुळेच माता व बाल मृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते. अलीकडे देशपातळीवरील रुग्णालयांमध्ये प्रसुती होण्याचे प्रमाण हे २० ते ३० टक्क्यांवरून तब्बल ८० ते ८५ टक्क्यांवर गेले आहे आणि त्यामुळेच माता मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये एक लाख जीवित शिशुंच्या जन्मामागे (लाइव्ह बर्थस्) माता मृत्यूचे प्रमाण सरासरी १३०पर्यंत घटले आहे. रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसूती व वेळीच औषधोपचारांमुळे ही प्रगती साधता आली आहे. त्यामुळे आता आणखी गुणात्मक वैद्यकीय सेवा-सुविधा-सुधारणांकडे प्रवास सुरू झाला आहे आणि त्याचाच भाग म्हणून 'एनएचएम'ने 'लक्ष'अंतर्गत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सन्मानपूर्वक मातृत्व सेवा (आरएमसी, रिस्पेक्टबल मॅटर्नमिटी केअर) हा त्याच श्रृंखलेतील पुढचा भाग आहे. यामध्ये प्रत्येक गर्भवती महिलेला सन्मानपूर्वक सेवा-सुविधा व आवश्यक सर्व सुशुश्रा मिळाली पाहिजे, यावर भर देण्यात येत आहे, जेणेकरून प्रत्येक महिलेसाठी प्रसूती ही आनंददायी ठरली पाहिजे आणि पुढे कधीही गरज पडल्यास ती पुन्हा रुग्णालयामध्ये येण्यास इच्छुक असली पाहिजे.
अमेरिकेच्या "व्हाईट रिबन अलायन्स'च्या माध्यमातूनही गेल्या तीन वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसुतीचा आढावा घेतला जातोय. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये घाटीत १९ हजार ३२२ महिलांच्या प्रसुतीपैकी तब्बल ७३ टक्के सामान्य प्रसुती तर केवळ २७ टक्के सिझरिंग झाल्या आहे. यामध्ये माता मृत्युचे प्रमाण ०.३८ टक्के तर बालमृत्युचे प्रमाण ३.३५ टक्के इतके आहे. सन्मानपूर्वक मातृत्व सेवा म्हणजे महिला गरोदर असतना प्रसुतीला येते तेव्हा तिला मेडीकलायझेशनला जास्त सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळेस औषध गोळ्या घेणे, प्रसुती कक्षात आल्यास तिला नातेवाईकापासून आई-सासूपासून दुर ठेवणे, पलंगावरच खिळवून ठेवणे,सलाईन लावणे, एनिमा देणे, कळाआल्या नाहीतर कळा यायचे औषध देणे हे सर्व प्रकार मेडीकलायझेशन ऑफ लेबर मध्ये केले जातात. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्ययालायाच्या प्रसुती विभागाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा माहिती देतात की, प्रसुती ही नैसर्गिक असते. मेडीकलायझेशन केल्यामुळे औषधानेच डिलेव्हरी करायची असे सकृतदर्शनी वाटायचे. मात्र रिस्पेक्टीव्ह मँटर्निटी केअर याचा २०११ मध्ये लँन्डमार्क अभ्यास झाला आणि त्यामध्ये काही सुचना केल्या गेल्या. यामध्ये जसे गरज नसताना इंजेक्शन सलाईन लावू नये,महिलेला पलंगावर खिळवून ठेवुु नये, माताला कळा सुरु होतात त्याअगोदरच तिला काही व्यायाम शिकवणे, त्यानंतर कळा सुरु होतात त्यावेळी अशी जागा देणे जिथे ती आरामात फिरु शकेल.
सगळ्यात महत्वाचा बदल प्रसुतीच्यावेळी लेबर रुममध्ये सोबतीण असेल तर त्याचाही खुप मोठा फरक पडतो. राज्यात फक्त औरंगाबादमध्येच ही मातृत्व सन्मान योजना सुरु आहे.ज्याची दखल आता जागतिक आरोग्य संघनटेने घेतली आहे. जगभरात सिझरींगचे प्रमाण ४० टक्के असताना घाटीत हे प्रमाण केवळ २७.३ टक्के आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण १६ टक्के होणे गरजेचे आहे. मात्र अमेरिकेतही सिझेरिंग ४० ते ५० टक्के आहे.
डॉ. सोनाली देशपांडे म्हणतात की, आपल्या ओळखीचे नातेवाईक, आई, सासू, मैत्रिण सोबत असल्यास अनोळखी वातावरणात महिलेची भिती कमी होते. सोबतीण असल्यामुळे तिचे खांदे दाबून देणे, मसाज करणे, डॉक्टरांशी संवाद साधणे, अचुक पोझिशन अवस्था घेण्यासाठी मदत करणे अशी महत्वाची कामे सहज होतात. त्यामुळे मानसिक स्थिती चांगली असल्यास शरीरातील ऑक्सोटोसीन द्रावचे शरीरात प्रमाण वाढून नैसर्गिक कळा येण्यास मदत होते. यामध्ये प्रसुती सोबतीण निवडतांना फक्त तिची एक डिलिव्हरी झाली पाहिजे एवढाच निकष आहे. २००७ मध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्लॉक यांनी “पुश्ड’ हे पुस्तक अनेकप्रकारे सर्व्हे करुन लिहीले. त्यामध्ये अमेरिकेतल्या प्रसुती झालेल्या महिला, डॉक्टर, मीडवाईफ यांच्या मुलाखती घेतल्या. यासंबंधीच्या गाईडलाईन्स पडताळून पाहिल्या. प्रसुतीमध्ये मेडिकलायझेशनचे प्रमाण जास्त होते आणि महिलेच्या इच्छेला फारशी किंमत नसल्याचे लक्षात आले. १९६५पासूनच्या डिलिव्हरीचा त्यांनी अभ्यास करत त्यावेळचा ट्रेंड दाखवला. त्यावेळी असे लक्षात आले की महिलामध्येच ती नैसर्गिक शक्ती आहे, फक्त त्यासाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. व्हाईट रिबन अलायन्सने सन्मानपूर्वक मातृत्व सेवेच्या संदर्भात गेल्या तीन वर्षापासून घाटीला भेट देत स्टाफला प्रशिक्षण देत झालेल्या सुधारणेचाआढावा घेतला आहे. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “इअर ऑफ द नर्स’ आणि “मीडवाईफ’ हे धोरण आखले आहे. घाटीच्या रुग्णालयाचे यात जागतिक आरोग्य संघटनेच्या मँपवर सहभागी रुग्णालय म्हणून नाव आहे. याबाबत आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे यांनी सांगितले की ही सगळी धोरणं लक्षात ठेवूनच आम्ही सन्मानपूर्वक मातृत्व सेवा उपक्रम राबवण्यात सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षात इन्स्टिट्युटमध्ये होणाऱ्या प्रसुती पाहिल्यास २०१२ मध्ये जिथे ३५ टक्के प्रसुती झाल्या होत्या तिथे आता हे प्रमाण ८५ टक्के इतके झाले आहे.
(लेखकाचा संपर्क - ९०९६५२१००७)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.