Home | Magazine | Madhurima | Praveen Ghodeswar writes about Gender equality should be established ...

लिंगभाव समानता प्रस्थापित व्हावी...

प्रा. प्रवीण घोडेस्वार, | Update - Jun 25, 2019, 12:16 AM IST

जैविक वैशिष्ट्य बदलता येत नसलं तरी सामाजिक वैशिष्ट्यात काळानुरूप बदल आवश्यक आहेत.

  • Praveen Ghodeswar writes about  Gender equality should be established ...

    लिंग हे जैविक, तर लिंगभाव हे सामाजिक वैशिष्ट्य आहे. जैविक वैशिष्ट्य बदलता येत नसलं तरी सामाजिक वैशिष्ट्यात काळानुरूप बदल आवश्यक आहेत.

    प्रत्येक संस्कृतीत मुलगा आणि मुलगी यांच्या मूल्यमापनाच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्यानुसार मुलामुलींच्या वेगळ्या भूमिका, त्यांचे गुणदोष, प्रतिसादाच्या पद्धती समाजाने ठरवून दिल्या आहेत. जन्मापासूनच मुलामुलींसाठी जणू एक भिन्न सामाजिक आणि सांस्कृतिक कृती कार्यक्रम आखून दिला जातो. यालाच लिंगभाव म्हटले जाते. विचारवंत अना ओकले यांनी सर्वात प्रथम लिंगभाव संकल्पना वापरली. त्यांच्या मते, लिंगभाव ही सांस्कृतिक बाब आहे. त्यातून स्त्री व पुरुषांची बाईपण व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूचित ते.एखादी व्यक्ती स्त्री की पुरुष हे जैविक पुराव्याने ठरते.परंतु व्यक्तीचे बाईपण –पुरुषपण मात्र स्थळकाळानुरूप बदलणाऱ्या सांस्कृतिक निकषांनी ठरत असते. स्त्री-पुरुषातल्या शारीरिक फरकामुळे त्यांच्या समाजातल्या भूमिका आज आहेत तशा ठरल्या असे मानले जाते. पण हे मानवाने ठरवलेय निसर्गाने नाही! आणि तेसुद्धा मनुष्यप्राणी अस्तित्वात आल्यानंतर नव्हे तर काही काळाने! पुरुषाला राकट-उग्र –आक्रमक–आडदंड आणि स्त्रीला शामळू-नाजूक-कोमल –हळवी-सोशिक- लाजाळू- प्रेमळ घडवण्यास प्रारंभ झाला. समाजात वावरण्याची पद्धत, दृष्टिकोन,भूमिका,जबाबदाऱ्या,इतरांशी नाते जोपासण्याची रीत ह्या सर्व गोष्टी स्त्रीसाठी काय योग्य आणि पुरुषासाठी काय याचे संकेत रूढ झाले. या सोबतच जात,वर्ग,वंश,धर्म,वय, काळ ह्या घटकांवरही योग्य- अयोग्य ठरत गेले.


    लिंग हे जैविक तर लिंगभाव सामाजिक वैशिष्ट्य आहे. जैविक वैशिष्ट्य बदलता येत नसलं (लिंग बदलाची शस्त्रक्रिया वगळल्यास) तरी लिंगभाव बदलता येतो. स्त्री असणे किंवा पुरुष असणे याचे आदर्श सतत बदलत असतात. आज स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे. ते बदलता येणे शक्य आहे. श्रम, पुनरुत्पादन, संचार, लैगिकता, संपत्ती यावरच्या हक्कांबाबतीत स्त्रिया दुय्यम स्थानावर आहेत.तसेच कुटुंब संस्था,धर्मसंस्था, न्यायसंस्था,शासनसंस्था,मीडिया याद्वारे तिचे दुय्यम स्थान अबाधित ठेवले जाते. स्त्रिया आणि पुरुष यांच्यात सत्तेचे नाते घडवण्यात आले आहे.म्हणून स्त्रिया मागास राहिल्या आहेत.याचे कारण स्त्रियाच स्त्रियांच्या मार्गात अडचणी आणतात असे नाहीये.तर या मागचे कारण म्हणजे स्त्री- पुरुषांमध्ये असलेले असमानतेचे नाते जे की अनैसर्गिक आहे,ही मांडणी म्हणजे लिंगभाव संकल्पना होय.


    समाजामध्ये सर्व स्तरावर स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे, ही जाणीव-जागृती निर्माण होण्यासाठी, पुरुषांच्या सत्तेचा पुनर्विचार (कुटुंब-वस्ती-गाव-आणि व्यापक सामाजिक पातळीवर) करण्यास प्रवृत्त होण्यासाठी आणि शासनाची ध्येय –धोरणे, विविध उपक्रम , योजना-कार्यपद्धती व प्रत्यक्ष व्यवहार लिंगभाव दृष्टिकोनातून पाहणे व त्यात कोणते /कसे बदल करता येऊ शकतात याचा विचार करण्यास प्रवृत्त क्ररण्यासाठी समाजामध्ये लिंगभाव समानता प्रस्थापित होणे गरजेचे आहे.

Trending