आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात काँग्रेसतर्फे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेली मराठा क्रांती मोर्चाची ताकद, कोरेगाव भीमा घटनेमुळे नाराज दलित आणि भाजपच्या “हिंदुत्ववादी’ लाटेमुळे दबलेले मुस्लिम या तीन समूहांच्या पाठिंब्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि  काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झाल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भाजपचे भगवे वादळ रोखण्यासाठी अन्य सामाजिक संघटनांना सोबत घेण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भूमिकेतून गायकवाड यांचे नाव पुढे आले आहे. भाजप सरकारविरोधातील मराठा समाजाच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील ८ लाख मराठा मते कोरेगाव भीमा घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांविरोधात जाहीर भूमिका घेतल्याने दलित संघटनांसोबतचे सख्य आणि मुस्लिम समाजात शिवाजी महाराज पोहोचवून निर्माण केलेला विश्वास यामुळे गायकवाड यांचे पारडे जड होऊ शकते. अर्थात, पक्षांतर्गत उमेदवार म्हणून काँग्रेसचे मोहन जोशी यांचाही या उमेदवारीसाठी दावा आहे.  


१९९० पर्यंत काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पुणे लोकसभा क्षेत्रातील वारे १९९१ पासून पालटले. १९९१ मध्ये अण्णा जोशी यांच्या माध्यमातून या मतदारसंघात भाजपने प्रवेश केला. त्यानंतर १९९६ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत, २००४ आणि २००९ मध्ये पुन्हा कलमाडी आणि २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे असा काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताबदलाचा खेळ होत राहिला. प्रत्येक वेळी काँग्रेस आणि भाजपमधील पाऊणशे मतांचा फरक मागील निवडणुकीत तब्बल तीन लाखांवर पोहोचून काँग्रेसचे विश्वजित कदम यांचा दणदणीत पराभव करून भाजपचे अनिल शिरोळे निवडून आले. लोकसभा निवडणुकीतील ही मोदी लाट विधानसभा निवडणुकीतही कायम राहून या लोकसभा मतदारसंघातील कसबा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि पुणे छावणी या सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलले. भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या मतदारसंघातून उमेेदवार देण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. पक्षातून सध्या मोहन जोशी हेदेखील इच्छुक आहेत. जोशी यांनी १९९९ मध्ये या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या वेळी भाजपचे प्रदीप रावत यांनी त्यांचा पराभव केला होता.  


हिंदुत्ववादी लाटेचा सामना करण्यासाठी मराठा, दलित आणि मुस्लिम या समाजातील मतांची मोट एकत्र बांधण्याच्या दृष्टीने गायकवाड यांचे नाव पुढे आले आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मराठा समाजाचा त्यांना असलेला पाठिंबा, कोरेगाव भीमा घटनेेच्या वेेळी हिंदुत्ववादी संघटनांविरोधात जाहीर भूमिका घेऊन दलित-मराठा समाजात सामंजस्य राहावे म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे दलित संघटना त्यांच्यासोबत राहू शकतात. मुस्लिम ब्रिगेडच्या  माध्यमातून मुस्लिम समाजासोबतचा संवाद, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षसंघटनांचा गायकवाड यांना पाठिंबा मिळू शकतो. मोदी लाट असूनही मनसेचे दीपक पायगुडे यांना गेल्या वेेळी ९३ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघातील ४० टक्के म्हणजे ८ लाख मते मराठा समाजाची असल्याने काँग्रेसकडे तेवढ्या ताकदीचा मराठा उमेदवार नाही. कलमाडी प्रकरणानंतर पुणे काँग्रेसला लागलेली उतरती कळा आणि भाजपची पकड या पार्श्वभूमीवर मराठा नेता, दलित, मुस्लिम आणि भाजपविरोधकांचा पाठिंबा या मुद्द्यांच्या आधारावर गायकवाड यांची शिफारस करण्यात आल्याचे कळते.  


पृथ्वीबाबांचा आग्रह, अशोक चव्हाणांची नाराजी  
गायकवाड यांच्या नावासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आग्रही आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा यास विरोध आहे. गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रस्सीखेचीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सरशी होईल, अशी त्यांना भीती वाटते. “मराठा’ फॅक्टरच्या आधारावर भाजपचे संजय काकडे या जागेसाठी काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते. तूर्तास, पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मराठा उमेदवार देण्यासाठी  शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...