आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गकन्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगारी मथाई - Divya Marathi
बंगारी मथाई

ग्लोबल वॉर्मिगच्या चिंताजनक परिस्थितीत पर्यावरणाचं संरक्षण, जतन नि संवर्धन करण्यात स्त्रियांची भूमिका व जबाबदारी फार महत्त्वाची आहे. या क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या, तळागाळातल्या लोकांपर्यत पर्यावरणाचं महत्त्व पोहचवणाऱ्या पण आजवर फारश्या प्रकाशात न आलेल्या निसर्गकन्यांच्या कार्याची ओळख, उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त...

 

बंगारी मथाई :

पर्यावरण संरक्षणात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बंगारी  मथाईंचं योगदान विस्मयचकित करणारं आहे. Green Belt या आंदोलनाच्या त्या प्रणेत्या. मथाई यांनी स्त्रियांना पर्यावरणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या  संघर्षामुळेच पर्यावरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आज स्त्रियांचा सहभाग वाढताना दिसतोय. बंगारी मथाई यांच्या या असामान्य कामगिरीची दखल घेऊन २००४ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाची चळवळ परिणामकारक होण्यासाठी मथाई यांनी Reduse– Reuse-Recycle-Repair असे चार आर सांगितले आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया पर्यावरण संरक्षणाच्या  चळवळीत सहभागी होत आहेत.

 

चेकट करिअन जानू :

ह्या सी.के. जानू या नावाने ओळखल्या जातात. त्या केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या. अडियार ह्या आदिवासी जमातीच्या. ही जमात भूमिहीन. अडियार या शब्दाचा अर्थ गुलाम. त्यांना परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत त्या निरक्षर होत्या. पुढे साक्षरता वर्गात जाऊन त्या लिहिणं-वाचणं शिकल्या. ‘ज्या निसर्गाच्या सोबतीने आम्ही वाढलो, त्याच निसर्गाच्या सान्निध्यात आम्हाला राहता यावे’ ही भूमिका घेऊन त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. जानू यांनी १९९२ मध्ये ‘आदिवासी विकसन प्रवर्तक’ समिती स्थापन केली. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आदिवासी नेते यांना निमंत्रित करून एका परिषदेचे आयोजन केले. यात त्यांनी आदिवासींच्या जमिनीवरच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यांच्या प्रयत्नाने ‘आदिवासी गोत्र महासभा’ २००२ मध्ये अस्तित्वात आली. केरळातल्या ३६ आदिवासी गटांची त्यांनी एकी केली. त्यांनी १९९३ मध्ये देशातल्या बहुतेक राज्यांना भेटी देऊन आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले. २००१ मध्ये १२ आदिवासी भूकबळी गेल्याने त्यांनी ४८ दिवस आंदोलन केले. जानू ह्या पुरस्कार-सन्मान-पदांपासून जाणीवपूर्वक दूर राहिल्या. केरळ सरकारचा पुरस्कार त्यांनी नाकारला. संयुक्त राष्ट्रसंघाने जिनिव्हा इथे भरवलेल्या परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या एकमेव प्रतिनिधी होत्या. Organic leader of advasis in Kerala म्हणून सी. के. जानू ओळखल्या जातात.

 

राधा भट :

ग्रामीण विकास,पर्यावरण संवर्धन, महिला सबलीकरण, साधनसंपत्ती, पारंपरिक ज्ञान यावर आधारलेली पर्यायी विकासाची मांडणी राधा भट यांनी केली. भट यांचा जन्म १९३४ मध्ये उत्तरांचलातल्या अलमोडा जिल्ह्यात झाला. १९५७ ते १९६१ या कालावधीत त्या विनोबांच्या भूदान चळवळीत सक्रिय होत्या. त्यांनी हिमालयाच्या वृक्षतोड आणि खाणकामाच्या विरोधात स्थानिक लोकांना जागरूक करून आंदोलने केली. चिपको आंदोलनातही त्या सहभागी झाल्या. मोठ्या धरणांमुळे होणारा पर्यावरण ऱ्हास आणि भूमिपुत्रांचे नुकसान याबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृती केली. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या, विकासाच्या प्रक्रियेत त्यांच्या योगदानाची गरज, चिरंतन ग्रामीण विकास यासाठी त्या कार्यरत आहेत. कस्तुरबा national memorial trust च्या राधा  भट यांनी ‘नदी वाचवा’ आंदोलन सुरू केले असून हिमालय सेवा संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरण संरक्षणात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

 

नफिसा डिसूझा :

मुंबईतल्या सधन बोहरी कुटुंबात नफिसा यांचा जन्म झाला. मात्र पावलो फ्रेअरी ह्या ब्राझीलच्या विचारवंताच्या Pedagogy of the Oppressed पुस्तकाने त्या प्रभावित झाल्या नि गरीब, वंचित समाजासाठी काम करू लागल्या. त्या व्यवसायाने समाज कार्य या विषयाच्या प्राध्यापिका. मुंबईच्या निर्मला निकेतन समाजकार्य संस्थेत अध्यापन करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांसोबत आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या अडतीगल्ला या लहानशा गावात त्या गेल्या. मग हीच त्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी इथल्या आदिवासी समुद्यासाठी, त्यांच्या जंगलांसाठी ‘लय’ ही संस्था स्थापन केली. जीवनमान उंचावणाऱ्या साऱ्या आघाड्यांवर ‘लय’ ही संस्था कार्यरत आहे.पर्यावरण रक्षण, आदिवासींची उपजीविका व आदिवासींचे आरोग्य ही तीन उद्दिष्टे समोर ठेवून ‘लय’ ने जंगलाच्या शाश्वत वापराचे महत्व स्थानिकांच्या मनात रुजवले. शिवाय ‘वनांतरम’ नावाचे आरोग्य केंद्रदेखील सुरु केले. लय संस्थेचे एक रिसोर्स सेंटर विशाखापट्टणम इथे सुरू आहे. या ठिकाणी पर्यावरणविषयी संशोधन केले जाते. हवामान बदलाच्या प्रश्नावर नफिसा यांनी Indian Network on Ethics and Climate Change (आयनेक) उभारले आहे.

 

सुषमा अय्यंगार :

‘निसर्गाच्या तडाख्याने भुईसपाट झालेल्यांना फक्त कपडे, धान्य किंवा पैसे नको असतात. त्यांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची हिंमत आणि आधार हवा असतो. त्यांचा परिसर आणि पर्यावरण यांचा विचार करून त्यातील संसाधनाचा योग्य वापर करून उभे राहते, ते अधिक शाश्वत असते,’ अशा शब्दांत सुषमा अय्यंगार विकासाची मांडणी करतात. गुजरातमधल्या भूज इथे त्या ‘कच्छ महिला विकास संघटना’ च्या माध्यमातून काम करतात. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यात पर्यावरणविषयक भानही निर्माण केले आहे. परिसरातली नैसर्गिक साधनसंपत्ती व पाणी संवर्धनाचे उपाय, संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची शेती, जमीन आणि पाण्याच्या गुणवत्तेत झालेली वाढ, दूध संकलन आणि विक्री यात प्रावीण्य मिळवणाऱ्या बायका ही त्यांच्या संस्थेची उपलब्धी. 

 

अर्चना गोडबोले :

जैवविविधता संरक्षण- संवर्धन हा अर्चना यांच्या कामाचा गाभा. त्या पुण्याच्या. त्यांनी अप्लाइड इन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन (AERF) संस्था स्थापली. जंगलांच्या आधाराने जगणारी समाज संस्कृती टिकवणं, जैवविविधता जतनासाठी लोकांची क्षमता,जाणीव वाढवणं यावर त्यांचं मुख्य काम आहे. कोकणाशिवाय अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशातही त्यांचं काम आहे.

बातम्या आणखी आहेत...