आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. उमरगा तालुक्यातील काही गावांसह तुळजापूर, परंडा, लोहारा तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही काही भागात वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान झाले. उस्मानाबाद तालुक्यातील आंबेहोळमध्ये वादळाने पेरूच्या बागेचे नुकसान झाले. उमरगा तालुक्यात सोमवारी रात्री सरासरी १८.२ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक उमरगा मंडळात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


उमरगा शहरासह परिसरातील गावात सोमवारी (दि.३) सायंकाळी मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह पुर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरीला सुरुवात झाली होती. तब्बल अर्धा तास झालेल्या पावसाने शहर जलमय झाले तर रात्री अकराच्या सुमारास तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.  तालुक्यात एकूण ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


सोमवारी सायंकाळी व रात्री  शहरासह बलसूर, मुरूम, येणेगूर, जकेकूर, चौस्ता, दाळिंब, कोरेगांव, गुगळगांव, वागदरी परिसरातील गावात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र गारवा जाणवू लागला आहे. सोमवारी रात्री झालेला पाऊस सर्वदुर असल्याने सर्वाधिक उमरगा मंडळ विभागात ४२ मिलिमीटर पाऊस झाला.   गत वर्षीही याच तारखेदरम्यान तालुक्यात इतकाच पूर्वमोसमी पाऊस झाला होता. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


धुवाधार पावसाने कोरेगाव भुयारी मार्ग पाण्यात
सोमवारी रात्री झालेल्या पुर्व मोसमी पावसात शहरासाठी करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर कोरेगावकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आले असून पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने भुयारी रस्ता पाण्याखाली गेला असून वाहनधारकांना कसरत करावी लागली. दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता चौपदरीकरण कामावेळी रस्ता क्रॉसिंगवर पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात होत आहेत.


काक्रंबा येथील शेतात पाणी
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व परिसरात सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सायंकाळी सलग दोन दिवस  दमदार पाऊस झाला . तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, हंगरगा तुळ, काक्रंबावाडी, वडगाव लाख, खंडाळा, बारूळ, होनाळा आदी गावांत सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सायंकाळी पाच ते साडे पाच च्या सुमारास  मेघगर्जनेसह  पावसाने दमदार हजेरी लावली. 


परंड्यात सखल भागात पाणी, आंबेहोळमध्ये पेरूच्या बागेचे नुकसान
परंडा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. सोमवारी सायंकाळीही परंड्यात पाऊस झाला हेाता. लोहारा तालुक्यातील काही गावांमध्येही मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस  झाला होता. उस्मानाबादेत मात्र मंगळवारी पाऊस झाला नाही. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने आंबेहोळ येथील शेतकरी शकील शेख यांच्या पेरूच्या फळबागेचे प्रचंड नुकसान झाले.