आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी-जास्त दाबाच्या पट्ट्यांत ‘ट्रॅप’ झाल्याने राज्यात पाऊस; अजून दोन दिवस बरसण्याची शक्यता, काही ठिकाणी मुसळधार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना पावसामुळे भिजत जावे लागले. - Divya Marathi
सातारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना पावसामुळे भिजत जावे लागले.

पुणे, सातारा, चाळीसगाव - अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील जास्त दाबाचे क्षेत्र (ट्रफ) यांच्यामध्ये राज्याचा बहुतांश भाग ‘ट्रॅप’ झाला असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे वाऱ्यांची दिशा, बाष्प वाहून आणण्याची त्यांची क्षमता, स्थानिक पातळीवरील कमाल तापमानाचा परिणाम, या हवामानशास्त्रीय घटकांची पूरक साथ असल्याने सध्याचा पाऊस पडत आहे. ट्रफ आणि लो प्रेशर एरिया यांची घनता जोवर टिकून आहे तोपर्यंत पावसाचा मुक्काम राज्यात राहणार, हे स्पष्ट आहे. किमान दोन ते तीन दिवस हा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

रविवारी पुण्यासह सातारा, काेल्हापूर, सांगली हे जिल्हे, मराठवाडा व विदर्भातील काही भागात दमदार पाऊस झाला. सायंकाळी सातच्या पत्रकानुसार सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, जालना, बीड या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, राज्यात रविवारचा दिवसही पावसाळी ठरला. दिवसभर किंचितही उघडीप न घेता मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक तसेच कोकणात पडत राहिला.

साताऱ्यात संततधार, जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प
जिल्ह्यात परतीच्या पावसाने ऐन निवडणूक काळात अक्षरशः कहर केला आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सातारा - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. रविवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली. एकीकडे मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. उद्या मतदान केंद्रावर कसे जायचे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. शाहूनगर गोडोली परिसरातील रस्त्यांचे रूपांतर अक्षरशः नदीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांत पाणी शिरले आहे.

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी; नद्यांना पूर, पिकांचे मोठे नुकसान
शनिवारी पुनरागमन झालेल्या परतीच्या पावसाने रविवारी पहाटेपर्यंत तालुक्यात मुक्काम ठोकला. यामुळे नदी-नाल्यांना पुन्हा एकदा पुराचे स्वरूप आले. शनिवारी रात्री तितूर नदीला पूर आल्याने चाळीसगाव शहरात नदीकाठावरील भागात काही रहिवाशांची घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. दरम्यान, परतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला. गेल्या २४ तासांत तालुक्यात एकूण ७७ मिमी पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी दुपारपासून तालुक्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. रविवारी पहाटेदेखील मुसळधार पाऊस कोसळला. चिंचगव्हाण, मेहुणबारे, जामदा, भाऊर, धामणगाव, दसेगाव, वडगाव, रांजणगाव, कोदगाव, हातले, बहाळ खडकी, तळेगाव, हिरापूर परिसरात पावसाने झोडपले. गिरणा परिसरातील भराडी नाल्याला पूर आला. तसेच तिरपोळे गावाजवळचे लहान धरण तुडुंब भरले. पावसामुळे खडकेसीम प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला. मन्याड धरणातदेखील ७० टक्के साठा झाला. परिणामी नांद्रा, पिंप्री, ब्राह्मणशेवगे, देवळी, आडगाव, चिंचखेडे परिसरातील एकूण २२ गावांना दिलासा मिळाला. असे असले तरी परतीच्या पावसामुळे वेचणीवर आलेल्या कापसाचे नुकसान झाले. ज्वारी, बाजरी काळी पडण्याचा धोका आहे. मात्र, हा पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी व भूजल पातळी वाढीसाठी फायदेशीर ठरू शकतो. 
 
 

२४ तासांतील पाऊस
गेल्या २४ तासांत चाळीसगाव मंडळात १२९ मिमी, मेहुणबारे ३३, शिरसगाव २०, हातले ७५, बहाळ ४५, खडकी १८६, तळेगाव ५५ असा एकूण सरासरी ७७.०५ मिमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरी ८१८.०६ मिमी पाऊस झाला आहे.

भडगावला तडाखा
गेल्या दोन दिवसांपासून भडगाव तालुक्यातही पाऊस सुरू आहे. यामुळे वेचणीचा कापूस भिजला. कपाशीच्या कैऱ्या सडण्याचा धोका आहे. ज्वारीही काळ पडण्याची भीती आहे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पिवळी पडली आहेत. हे पाणी मोटार लावून उपसावे लागत आहे.