Home | Magazine | Madhurima | Preetee Deo writes about her book Paatpaani

पाटपाणी घ्या गं पोरींनो...

प्रीती देव, ब्रॅकनेल, इंग्लंड | Update - Aug 28, 2018, 12:30 AM IST

मराठवाड्यातल्या पारंपरिक पदार्थांविषयी लिहिलेलं, त्या पदार्थांच्या चवी, पाककृती, करणाऱ्या कुटुंबीयांच्या आठवणी यांचं रसा

 • Preetee Deo writes about her book Paatpaani

  मराठवाड्यातल्या पारंपरिक पदार्थांविषयी लिहिलेलं, त्या पदार्थांच्या चवी, पाककृती, करणाऱ्या कुटुंबीयांच्या आठवणी यांचं रसाळ वर्णन करणारं पाटपाणी हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यानिमित्ताने लेखिकेचं हे मनोगत. या पुस्तकाच्या निमित्ताने फेसबुकवरच्या अंगतपंगत या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांविषयीच्या समूहात अनेक खवय्ये व सुगरणींनी त्यांच्या कुटुंबांमधल्या लक्षणीय अशा पाककृती आणि त्यामागची गोष्ट लिहिली होती. त्यातील काही निवडक पाककृती याच अंकात आतील पानांवर देत आहोत.


  पाटपाणी हे पुस्तक माझ्या स्वयंपाकघराकडे झालेल्या प्रवासाबद्दलचं आहे. औरंगाबादेतलं आजोळ, बंगालमधल्या दुर्गापूर आणि कोलकात्यातलं लहानपणचं वास्तव्य, कोल्हापुरात घालवलेली काही वर्षं, त्यानंतर अभ्यासासाठी घराबाहेर राहणं, जालन्यातलं सासर आणि आता इंग्लंडमधलं वास्तव्य या प्रवासाइतकाच माझा स्वयंपाकघरातला प्रवेश आणि तिथे सुरू असलेला प्रवास माझ्या दृष्टीने विलक्षण आहे. आजोळच्या स्वयंपाकघरात आजीसोबत केलेली लुडबुड, नंतर आईने मी नीट जेवावं म्हणून केलेले विविध पौष्टिक पदार्थ आणि मग सासूबाईंच्या हाताखाली शिकलेला स्वयंपाक हे यातले मोठे टप्पे. ‘पाटपाणी घ्या गं पोरींनो,’ असं आम्हा बहिणींना सांगणारा माझ्या आजीचा आवाज अजून कानात घुमतो. पाट, पानं, भोवतीची रांगोळी, तांब्याभांडी ठेवणं, पदार्थ जागच्या जागी त्यांच्या क्रमानं वाढणं, हे सगळं आम्ही मुलंमुली आनंदाने करत असू. त्याआधी स्वयंपाकघरात आजी आणि आत्या/मावशांबरोबर वेगवेगळे पदार्थ करण्यात आमचाही खारीचा वाटा असे. कधी दारच्या कढीलिंबाची पानं तोडून आणणं, तर कधी बटाटे सोलणं, ताक करणं, कोथिंबीर निवडणं, वगैरे. आता माझा नवरा आणि मुलगा हे दोघेही आवडीने स्वयंपाकही करतात आणि मी केलेलं तितक्याच हौशीने खातातही.


  पुस्तक लिहिण्याचं मुख्य कारण आहे, मराठवाड्यातल्या पारंपरिक पाककृतींची ओळख नवशिक्या व्यक्तींना करून देणं. ज्यांना स्वयंपाकाचा काहीच अनुभव नाही, पण स्वयंपाकाची आवड आहे, त्यांच्यासाठी दार किलकिलं करण्याचा प्रयत्न आहे.


  आम्ही कोलकात्यात होतो, ते माझे शाळेचे दिवस अजून लख्ख स्मरणात आहेत. माझी निळी स्कूलबस शाळेत न्यायला यायची. आम्ही सगळ्याच मैत्रिणी बसमध्ये खायला छोटे डबे न्यायचो. शाळेतून परत येताना शाळेबाहेरच ठेला लावून बसलेला झालमुरीवाला (सरसोंचं तेल घातलेली कुरमुऱ्यांची भेळ) जणू आमची वाट पाहत असायचा. कित्येकदा तर आमच्या बसचा दारवानजी आमच्या सगळ्यांच्या भेळीचे पुडे हातात घेऊन आत यायचा.


  कोलकात्यातली मिठाई हा त्या आठवणींचा एक सुंदर भाग. तिथलं रस्त्यावरचं खाणं मला अतिशय आवडायचं. फुचका म्हणजे पाणीपुरी, अंडा रोल, राधावल्लभी... अहाहा. मग आम्ही कोल्हापुरात आलो. तिथले घरी केलेले मसाले, पांढरातांबडा रस्सा, पिठलं या पदार्थांची चव अजून मनात रेंगाळते आहे. मी शिकायला पुण्यात होते, तेव्हा एका मावशींच्या खानावळीत जेवायचे. त्या फार प्रेमाने आम्हाला वाढायच्या. त्यांनी केलेले रस्साभाजी, पालेभाज्या, कढी, मसालेभात, गोडाचे पदार्थ माझ्या खास आवडीचे होते. त्यांनी केलेलं मटकीचं कळण तर माझ्या आयुष्यातला स्वर्गीय आनंद होता. पुण्यातनं कोल्हापुरात घरी जायचे तेव्हा मी माझ्या आईच्या स्वयंपाकघरात आणि स्वयंपाक करण्यात अधिक रस घेऊ लागले. लग्नानंतर विशिष्ट पद्धतीने पदार्थ रांधणं, ते वाढणं मी पाहत आले. पण मला त्याचा थेट अनुभव नसल्याने, मला मदत करायलाही भीती वाटे. नऊवारी नेसलेल्या आमच्या घरातल्या बायका किती सहजतेने पाचपन्नास माणसांचा स्वयंपाक करत ते मी पाहिलं होतं, पण मला ते करायची भीती वाटे. भीतीमागे आणखी एक कारण होतं ते म्हणजे अनेक पदार्थ करणं किती कठीण आणि किचकट होते त्याच्या सतत चर्चा कानावर पडत. अनुभवी बायकाच हे बोलत असत. माझ्याकडे तर अनुभवही नव्हता आणि स्वयंपाकघरात घुसून काही करण्याची फार मोठी प्रेरणाही. इंग्लंडला आल्यानंतर तर हे सगळं शिकायची संधीही हुकली. मी तेव्हाच भीतीवर मात करून हे पदार्थ एकदा तरी करून पाहायला हवे होते, असं मला सारखं वाटत राहतं. कारण नीट नियोजन केलं, वेळेचं आणि घटकांचं, तर हे पदार्थ नक्कीच जमू शकतात. त्यात आव्हान आहे, पण आनंदही आहे. स्वयंपाक महत्त्वाचा आहेच, पण तो एक सुखकारक अनुभवही असायला हवा, असं मला ठामपणे वाटतं. कोणत्याही पिढीच्या सर्व सदस्यांना थोडा तरी स्वयंपाक आलाच पाहिजे.


  तर मी माझा देश, माझी माणसं सोडून दूर गेले तेव्हा माझ्यातली स्वयंपाकाची आवड जागी झाली. कमलाबाई ओगले यांचं रुचिरा माझ्या मदतीला आलं. पण मग त्यातल्या पारंपरिक पाककृती पाहता मला वाटायला लागलं की, हे सगळे घटक पदार्थ माझ्याकडे हवेत. त्यांसाठी लागणारं हवामान हवं. त्यासाठी वेळ काढायला हवा. मी त्यावरही मार्ग काढला, आणि इंग्लंडच्या लहरी हवामानात अगदी वाळवणंही करू लागले. आता मी स्वयंपाकाची मजा घेऊ शकत होते. तो माझ्यासाठी निव्वळ उदरभरणाचा मार्ग राहिला नाही. माझ्या भावभावना व्यक्त करणारं ते एक माध्यम होऊन गेलं. फूड ब्लाॅगिंग सुरू केल्यापासून मी खाद्यपदार्थांचे फोटो काढू लागले आणि मी या कलेच्या प्रेमात पडले. कढईत केलेली भाजी आणि चांगल्या प्लेटमध्ये सजवून ठेवलेली भाजी यांतला फरक माझ्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसू लागला.


  मला हेही कळू लागलं की, वेळ देऊन केलेले पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट होतात. मराठी जेवणात अनेक मसाले वापरले जातात, आणि त्यांचं प्रमाण योग्य असणं आवश्यक असतं. प्रत्येक मसाल्याचा स्वाद त्याची एखाद्या पदार्थातली जागा ठरवत असतो, हे मला हळूहळू उमजू लागलं. मराठी पदार्थ करण्याच्या कृती आणि काही इतर प्रांतांतल्या कृती यांमधलं साम्य ओळखून, मराठी पदार्थ थोड्या वेगळ्या रूपात सादर करण्याचा आता माझा प्रयत्न असतो, जेणेकरून इतरांना आपल्या पदार्थांची ओळख होईल. यामुळे तरुण पिढीलाही आपल्या पारंपरिक पदार्थांशी जवळीक वाटेल, अशी आशा वाटते. भारतीय पदार्थांबद्दल पाश्चिमात्त्य देशांमध्ये फार गैरसमजुती आहेत. कोणाही अभारतीय व्यक्तीशी खाणं या विषयावर बोलताना गाडी करी हा शब्दावर येऊन थांबतेच. मग मी जाणीवपूर्वक त्यांच्याशी संवाद ठेवते, वाढवते आणि शक्य असल्यास घरी बोलवून खाऊही घालते. या पुस्तकात मुख्यत्वे माझ्या खाण्याविषयीच्या स्मृती जागवल्या आहेत. एखादा विशिष्ट चवीचा पदार्थ खाल्ला, विशिष्ट गंध आला की, आई/आजी/मावशी/काकू वगैरे कोणाची तरी आठवण येते, हा आपल्या सर्वांना अनेकदा येणारा अनुभव. पाटपाणी हे पुस्तक माझ्या दिवंगत सासूबाई, उज्ज्वला देव, यांना अर्पण केलं आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून मला जे काही मिळालं, त्याची उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातून तुम्हा सर्वांना आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांशी जोडून घेता येईल, अशी आशा वाटते.

  - प्रीती देव, ब्रॅकनेल, इंग्लंड
  preetirdeo@gmail.com

Trending