Home | Magazine | Madhurima | Preetee O writes about people rejecting biological parenthood

मुलांच्या प्रश्नांना उत्तरं काय देणार?

प्रीती ओ, पुणे | Update - Sep 04, 2018, 05:29 AM IST

आपल्याला मूल हवं की नको हा खरं तर पूर्णत: वैयक्तिक विषय. या विषयाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात प्रत्येकाची वेगळी मतं असू

 • Preetee O writes about people rejecting biological parenthood

  आपल्याला मूल हवं की नको हा खरं तर पूर्णत: वैयक्तिक विषय. या विषयाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात. महत्त्वाचं आणि आवश्यक आहे ते ही मतं खुलेपणानं व्यक्त होणं. पालकत्व नाकारून त्याबद्दल स्पष्ट मतं असणाऱ्या आणि ती मतं स्वत:च्या नावानिशी वाचकांसमोर मांडण्याचा समजूतदारपणा दाखवणाऱ्या उत्पल आणि तनुजा यांच्याबद्दल...

  ‘मिळून साऱ्याजणी’ या स्त्रीवादी मासिकाच्या ऑफिसमध्ये झालेल्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीत माझी उत्पलशी प्रथम गाठ पडली. इतकी वर्षं पुण्यात राहूनही या माणसाबद्दल आपण ऐकलं, वाचलं कसं नाही असा विचार मनात घेऊनच तिथून बाहेर पडले. मग मात्र पठडीबाहेरच्या विषयांवरचे त्याचे लेख मी वाचले. एकदा ओळख झाल्यावर मात्र आम्ही परत परत भेटत राहिलो. आम्हा दोघांनाही कुठलेच विषय वर्ज्य नसल्यामुळे गप्पा नंतरही रंगत राहिल्या.


  ‘जैविक पालकत्व नाकारताना’ या विषयाची मनात सुरुवात झाली तेव्हा उत्पल क्षितिजावरही नसताना आता मात्र तो त्यातला एक महत्त्वाचा खिलाडी होऊन गेला. लग्न, बायको, नसलेली मुलं, मित्र, मैत्रिणी, प्रियकर, प्रेयसी या अनेक गोष्टींबद्दल बोलताना, जुने मित्रही बोलणार नाहीत इतक्या सहजतेने तो बोलतो. आज खूप बोलल्या जात नसल्या आणि सर्वसामान्यपणे समाजाला मान्य नसल्या तरीही घडत असलेल्या या गोष्टींबद्दल तो फक्त बोलतोच असं नाही तर स्वतःच्या आयुष्यातल्या अशा गोष्टी लपवून न ठेवता खुलेपणाने समाजापुढे मांडाव्यात असं त्याला वाटतं आणि तो ते करतोही, अर्थातच तनुजाच्या संमतीने. मी तनुजाला भेटले ती उत्पलच्या बोलण्यातूनच. त्यामुळे मनात एक प्रतिमा तयार झाली होती. प्रत्यक्ष भेटीत मात्र ती मोडून पडली. आणि तसा कबुलीजबाबही मी तिला दिला. उत्पलसारख्या विचारी आणि अतिशय बोलक्या लेखकाची बायको म्हणून जगताना तिचं व्यक्तिमत्त्व अगदी झाकोळून गेलं असेल असं मला वाटायचं. पण प्रत्यक्षात मात्र तितक्याच ताकदीची विचारी स्त्री माझ्या पुढ्यात उभी होती. एरवी अबोल वाटणाऱ्या (उत्पलच्या तुलनेत) तनुजाला तिचं काम आवडतं का, असं विचारल्यावर ती म्हणते, ‘हो. मला यात लोकांशी बोलावं लागतं जो माझ्या आवडीचा भाग आहे. आमचं ऑफिस छोटेखानी. त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोरच होतात. घरापेक्षा माझा इथे जास्त वेळ जातो. अनेक गोष्टी घरच्यांपेक्षा ऑफिसमधल्या काहींना अधिक ठाऊक असतात.’
  ‘उत्पल, तनुजा आणि तुझा प्रेमविवाह का रे?’मी
  ‘नाही, अरेंज मॅरेज.’
  ‘आणि तुला ते मान्य झालं?’ इतकं काय काय बोलणाऱ्या माणसाने प्रेमविवाह न करता ठरवून लग्न करावं याचं मला वाटणारं आश्चर्य मी लपवू शकले नाही.
  ‘अगं, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याशी लग्न झालं नाही म्हणून...’ असं हसत म्हणाला तो! ‘लग्न करण्याच्या काळात खरं तर ‘ते करू नये’ याकडेच आमचा दोघांचाही कल होता, म्हणजे आपापल्या आयुष्यात, एकमेकांना भेटण्यापूर्वीच. कंटाळाच होता म्हण ना. पण एकत्र राहण्याचा हा पर्यायच दिसला. खरं तर आपली मागची पिढी लग्नानंतर पुढे येणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याशी अजिबातच बोलत नाही, फक्त ‘लग्न करा म्हणजे होईल सगळं व्यवस्थित’ असं म्हणत राहते याबद्दल मला थोडा रागच आहे त्यांचा.’ इति उत्पल.


  ‘माझ्या एका भावाने उत्पलचं एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरचं प्रोफाइल मला पाठवलं. उत्पलने त्यात जे काही लिहिलं होतं ते मला फारच आवडलं होतं. त्या वेळेस तो तसा ‘लेखक’ झालेला नव्हता. मी जर याही वेळेस ‘नाही’ म्हटलं असतं तरी ते आई-वडिलांनी मान्य केलं असतं. मला आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हायचं होतं आणि मग लग्नाचा विचार करू असं वाटत होतं. कारण आमची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. पण मग आईबाबांचं म्हणणं पडलं की, अजून किती ‘सेटल’ होणार! नोकरी आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, आता अजून किती सेटल होणार? लग्न नोंदणी पद्धतीने करायचं हे आमचं नक्की होतं. मला तर लग्नसमारंभ वगैरे कंटाळवाणेच वाटतात. भावा-बहिणींच्या लग्नांना जायचे तर वाटायचं की, हे एवढं सगळं आपल्याला करावं लागलं तर आपणच कंटाळून निघून जाऊ की काय! आम्ही आमच्या लग्नानंतर अजूनही इतर लोकांच्या कार्यक्रमांना जातो पण ते लोकांना भेटायला, कारण नाहीतर तशा भेटीगाठी होत नाहीत. शिवाय बरेचदा कुटुंबातून कोणीतरी जाणं गरजेचं असतं आणि आम्हाला ते शक्य असतं म्हणून आम्ही जातो. पण मग फार काळ रेंगाळत नाही.’ इति तनुजा.


  ‘आपल्याला मूल नको हे मी लग्न होण्यापूर्वी ठरवलं होतं आणि त्यामुळे अर्थातच या विचाराची मुलगी भेटते का हे बघत होतो. तनुजा भेटली आणि तशी मुलगी सापडली. ‘मला मूल नको आहे,’ असं मी जेव्हा आधी म्हणायचो तेव्हा वरच्या पिढीचं साधारण म्हणणं असायचं की, असं सगळेच आधी म्हणतात, पण नंतर मूल असावं असं वाटू लागतं. मात्र मला आणि तनुजाला लग्नानंतरही कधीच तसं वाटलं नाही.’ इति उत्पल.


  ‘आपल्यालाच एवढे प्रश्न पडलेले असताना, मुलांच्या प्रश्नांना मी काय उत्तरं देणार आहे असं मला वाटायचं. जग दिवसेंदिवस वाईटच होतंय असंही मला वाटतं. आपल्याकडे आपल्या मुलांना द्यायला चांगला वारसा असेल तर मुलं जन्माला घालावीत. समाज म्हणून तर मला तो चांगला वारसा आत्ता दिसत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की, मला काहीच चांगलं दिसत नाही आणि मी नकारात्मक आयुष्य जगते. मी माझं आणि आमचं एकत्र आयुष्य मनसोक्त जगते. मुलं नसल्यामुळे खूप गोष्टींसाठी वेळ मिळतो. मुलं नाहीत म्हणून रितेपणा येत नाही. शेवटच्या क्षणी ठरवूनही अनेक गोष्टी करता येतात. चित्रपट बघणं, पुस्तकं वाचणं, भटकायला बाहेर पडणं हे एका क्षणी अचानक ठरवता येतं. अचानक आलेलं ऑफिसचं काम काळजी न करता अंगावर घेता येतं. मुलंबाळं असलेले माझे सहकारी मी बघते. त्यांचा निम्मा जीव तिकडेच लागलेला असतो. आई व्हावं असं मला खूप कधी वाटलं नाही. ती उपजत भावना माझ्यात नसेल कदाचित. शिवाय आई होण्यासाठी लोक शारीरिक तयारी काय करत असतील ते करत असतील. पण मला वाटतं, आई होण्यासाठीची मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. ती माझी नव्हतीच कधी. आणि आमच्या प्राथमिक कुटुंबीयांनाही आमचे निर्णय ‘आमचे’ म्हणून मान्य होते. त्यांनी अजिबात काहीच म्हटलं नाही असं नाही. उत्पलच्या आईला अजूनही थोडं वाईट वाटतं. पण तरीही त्यांनी तसं सहजपणे हे मान्य केलं.’ इति तनुजा.


  ‘आमचा हा निर्णय लोकांनी उदाहरणादाखल घ्यावा असं काही मला वाटत नाही. मूल न होऊ देण्याचा ट्रेंड वाढतो आहे हे मला दिसतंय. आणि कालांतराने कदाचित ही काळजीची बाब बनू शकेल असंही वाटतं. अर्थात आजची जगाची आणि खासकरून भारताची लोकसंख्या एवढी आहे की, तशी काळजी आज तरी अजिबातच नाही,’ असं उत्पलचं प्रांजळ मत आहे. तो चित्रपटप्रेमी आहे. ‘Children of men’सारख्या चित्रपटातून असं त्याला वाटलं असणं सहज शक्य आहे. उत्पलला त्याच्या बाबांकडून विचारधन मिळालं. ते सर्वोदयी कार्यकर्ते होते. पण त्या पिढीत असलेलं टिपिकल स्री-पुरुष असमानतेचं नातं तो त्याच्या आईबाबांमध्येही पाहत होता. त्यातूनच तो स्त्रीवादाकडे वळला असं तो म्हणतो. स्त्रीवादात स्त्रियांबरोबरच स्त्रीवादी पुरुषांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि या मित्र पुरुषांचं असणं महत्त्वाचं आहे. ‘जेव्हा मी माझ्या आई-बाबांचा विचार करतो तेव्हा मला हे जाणवतं की, मी त्यांचं प्रतिबिंब आहे आणि माझं असं प्रतिबिंब असणार नाही. पण हा विचार थोडा काळच टिकतो. मी एक लेखक आहे आणि लेखनच माझं प्रतिबिंब असेल असं मला वाटतं. जे की खरं तर, तेवढ्या ताकदीचं असेल, तर चिरकाळ टिकण्याची जास्त शक्यता आहे. माझा एक मित्र मला सांगत होता की मूल वाढवणं, त्या प्रक्रियेमध्ये आपण शिकणं, हे फार समृद्ध करणारं असतं. तू ते ‘मिस’ करशील. मला असं वाटतं की, शिकण्याच्या त्या एका संधीसोबत येणारे इतर तापही मला सहन करावे लागत नाहीएत. मुलं असली की, जहाजाचा नांगर टाकल्यासारखा असतो. तो नांगर नसला की, एवढं मोठं असूनही जहाजाला जसं भरकटायला होईल तसं क्वचित कधीतरी वाटतं, पण त्याहून खूप जास्त वेळा आपला निर्णय आपल्यासाठी योग्य ठरला असंच वाटतं.’ उत्पल.


  ‘मुलं म्हातारपणाची काठी असतात असं समाज मानतो. अगदी आनंदानं नसलं तरीही अनेक जण कर्तव्य म्हणून आपल्या म्हाताऱ्या आई-बाबांची काळजी घेताना दिसतात. याबद्दल काय वाटतं तुम्हा दोघांना?’ ‘जमेल तेवढं स्वतंत्र राहावं. जेव्हा जमणार नाही तेव्हा वृद्धाश्रमात जाऊन राहू. त्यात काही गैर वाटत नाही मला. आणखी एक म्हणजे समजा आम्हाला वेगळं राहावंसं वाटलं तर तेही सहज शक्य आहे मूल नसल्यामुळे. अर्थात मूल असलं तरीही वेगळं राहायचा निर्णय आनंदाने घेता यावाच, पण ते सहज शक्य होईलच असं नाही. मूल नसणं ही काही वेगळं होण्यासाठी केलेली सोय नक्कीच नाही, पण त्याची हीदेखील एक बाजू आहेच,’ तनुजाने अगदी शांतपणे हे सांगितले. स्वरात कटुता नाही की दुःख नाही. ‘असलेल्या प्रॉपर्टीचं काय करणार अशी चर्चा मित्रमंडळींमध्ये कधीतरी होते. आम्ही ती समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेला दान करायचं म्हणतोय. तर काहीजण विनोदाने आमच्या मागे लागलेत की आम्ही ती त्यांना द्यावी म्हणून!’


  सारासार विचार करून इथवर पोहोचलेले उत्पल-तनुजा पाहिले की, वाटतं संसार आणि संन्यास अशा टोकाच्या दोन वाटाच माहीत असलेला समाज आता खरोखरीच बदलतो आहे. या दोन्हीच्या मधल्या वाटा चोखाळतो आहे. उदाहरणं निर्माण करतो आहे. यातलं आपल्याला कुठलं लागू होतं, आपल्याला कशात आनंद वाटतो, आयुष्य मनमुराद जगलो/ले असं वाटतं ते आपण स्वीकारावं. पण आपण मुभा घेताना तीच मुभा आपण दुसऱ्यांनाही द्यायला हवी हे उरी असू द्यावं, म्हणजे झालं.
  - प्रीती ओ, पुणे
  jonathan.preet@gmail.com

Trending