आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी डॉक्टर म्हणाले, पोटातील बाळ आजारी; सिल्लोडच्या रुग्णालयात बाळ जन्मले सुदृढ!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई  - पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील  डॉक्टरांनी गरोदर मातेची तपासणी करून गर्भातील बाळ आजारी असल्याचे सांगून रेफर केले. यानंतर या महिलेला सिल्लोडच्या शासकीय रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी बाळ सुदृढ जन्मले. यामुळे संतप्त नातलगांनी दुसऱ्या दिवशी रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली असता, डॉक्टर आढळून आले नाही. या केंद्राचा नागरिकांनी पंचनामा करून तो अहवाल तहसीलदारांकडे सुपूर्द केला.    


भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ज्ञानेश्वर महादू गाढेकर हे पत्नीला प्रसूती वेदना जाणवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. आरोग्य सेविका व वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करून त्यांना वैद्यकीय कक्षात बोलावून घेतले. नंतर गरोदर मातेसमोरच तुमच्या बाळाचे वजन कमी असून, त्याच्या पोटात शी गेल्यामुळे बाळाची तब्येत खालावत  असून तुम्हाला खबरदारीचा उपाय म्हणून चांगल्या दवाखान्यात प्रसूतीसाठी जावे लागेल, असे सांगितले. यामुळे गरोदर माता रडायला लागली व पतीही गोंधळात पडला. सदर महिलेची ट्रीटमेंट ही बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात सुरू होती. त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व चाचण्या केलेल्या असल्याने व सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याने अशा परिस्थितीत आता काय करावे, हा प्रश्न होता. दुसरीकडे रेफर करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली नाही. खासगी वाहनातून  सदर महिलेला सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्या महिलेने तीन किलो वजनाच्या ठणठणीत बाळाला जन्म दिला. सोमवारी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींसह प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले असता, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गायब असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य सेविकेला विचारले असता, जालना येथे मासिक बैठकीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले. 


बाळाची वाढ पूर्ण नाही   
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेचे मी पहिले सोनोग्राफी रिपोर्ट तपासले. त्यात बाळाची वाढ पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आले.  अपाय टाळावा म्हणून मी त्या महिलेच्या पतीला पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला.    
एन. एम. राऊत, वैद्यकीय अधिकारी, पिंपळगाव रेणुकाई.

बातम्या आणखी आहेत...