Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Preliminary for competitive exam in Beed

स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, ४५ हजार विद्यार्थी देणार आता ‘जिज्ञासा कसोटी’ - झेडपीचा उपक्रम

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 10:42 AM IST

३० एप्रिल रोजी आयोजन; चौथी, ७ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

 • Preliminary for competitive exam in Beed

  बीड -
  नवोदय व शिष्यवृत्तीच्या परीक्षांची पूर्वतयारी होऊन जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी यात यशस्वी व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांच्या पुढाकारातून यंदापासून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची नवोदय, शिष्यवृत्तीच्या धर्तीवर जिज्ञासा कसोटी घेण्यात येणार आहे. ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील चौथी व सातवीच्या वर्गातील ४५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.


  इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी नवोदय परीक्षा घेण्यात येत असते तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते. यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची या दोन्ही परीक्षांची चांगली तयारी व्हावी, या परीक्षांबद्दलची त्यांची भीती दूर व्हावी, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कळावे, अभ्यास व्हावा यासाठी सीईओ अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये जिज्ञासा कसोटी यंदापासून घेणार आहे. गत सहा महिन्यांपासून या उपक्रमावर काम सुरु होते. यात अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी, पाठ्यपुस्तकातील अभ्यास, निसर्ग, पर्यावरण, निरीक्षण, आकलन या मुद्यांवर प्रश्नपत्रिका तयार केली आहे. ३० एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहे.

  २३ व २६ एप्रिल रोजी विशेष कार्यशाळा
  सध्या या परीक्षेची जोरदार तयारी सुरू अाहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी येडगे, डेप्युटी सीईओ डी. आर. माळी, शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांच्यासह समिती यावर काम करत आहे. बीड जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांची तर २६ एप्रिल रोजी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांची कार्यशाळा तालुकास्तरावर होईल.

  अशी होईल परीक्षा : ३० एप्रिलला दोन सत्रात परीक्षा होणार आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत दोन पेपर होतील. एकूण २०० गुणांची ही परीक्षा असेल. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. भरारी पथकही यासाठी स्थापन करण्यात आले आहेत.

  विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे यासाठी हा उपक्रम

  ^स्पर्धा परीक्षांविषयीची भीती लहानपणीच दूर व्हावी, नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत झेडपी शाळांची ग्रामीण भागातील मुले यशस्वी व्हावीत यासाठी त्याच धर्तीवर अभ्यासक्रम तयार करुन ही परीक्षा घेतली जात अाहे. याचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल.
  अमोल येडगे, सीईओ, जि.प. बीड.

  ४४ हजार ८७६ विद्यार्थी : इयत्ता चौथीमधील ३१ हजार ९८२ तर इयत्ता सातवीमधील १२ हजार ८९४ असे एकूण ४४ हजार ८७६ विद्यार्थी ही जिज्ञासा कसोटी परीक्षा देणार आहेत. इयत्ता चौथीची परीक्षा १६५ केंद्रांवर तर इयत्ता सातवीची परीक्षा १६४ केंद्रांवर होणार आहे.

Trending