आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाची प्रशासनाकडूनही तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : उस्मानाबादेत जानेवारीमध्ये (२०२०) होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनही उत्स्फूर्तपणे कामाला लागले आहे. संमेलनाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनातील विविध विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी नुकतीच बैठक घेतली. संमेलन कालावधीत शहर स्वच्छता, जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या मान्यवरांचे आदरातिथ्य यासह संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रशासन उत्स्फूर्त सहभागी होणार असल्याचे जिल्हाधिकारी मुंडे यांनी जाहीर केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील नियोजन समिती सभागृहात प्रशासनातील विविध विभागप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आयोजित केली होती. बैठकीत स्वागत मंडळाच्या वतीने स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासमोर संमेलनाच्या नियोजनाचा आराखडा सादर केला. त्यानंतर विविध विभागातील प्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे (लातूर), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.


संतश्रेष्ठ गोरा कुंभार यांचे समाधी मंदिर तसेच घर या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर करण्याबाबत यावेळी सूचित करण्यात आले. देशभरातून येणार्‍या साहित्यरसिकांनी संत गोरोबा काका यांच्या समाधीस्थळाला तसेच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना भेट द्यावी यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला, परंडा किल्ला, रामलिंग मंदिर परिसर, कुंथलगिरी, ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांचा दर्गा यासह इतर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, स्थळांची माहिती देणारे आकर्षक फलक उभारणीबाबतही या बैठकीत चर्चा झाली.


उस्मानाबाद जिल्ह्याच्या लौकिकात या संमेलनामुळे भर पडणार असून आयोजक समितीच्या समवेत जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होतील असा आशावादही जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी संमेलनाच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महसूल कर्मचाऱ्यांकडून ५ लाखांचा निधी जाहीर
साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहकार्य केले जाते. मात्र वाढत जाणारा खर्च, सहभागी होणाऱ्या मान्यवर, लेखक आणि रसिक श्रोत्यांची संख्या पाहता आणखी मोठ्या प्रमाणात निधी संकलनाची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी सांगितले. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विभागाच्या प्रमुखांनी देखील त्यांच्या कार्यालयांतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छेने उत्स्फूर्त निधी संकलन करण्याबाबत आवाहन त्यांनी केले.
 
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा आराखडा सादर करण्यात आला.