आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन क्रॅकर्स तयार, फोडण्यासाठी मात्र प्रतीक्षा: धूर 30 टक्के होणार कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) त्यांच्या प्रयोगशाळेत कमी प्रदूषण करणारे फटाके (ग्रीन क्रॅकर्स) तयार केले आहेत. या फटाक्यांचा आवाज, रंग व चमक बाजारात मिळणाऱ्या नेहमीच्या फटाक्यांसारखीच आहेे, पण यातून प्रदूषण कमी होते. ग्रीन क्रॅकर्समुळे धूर व प्रदूषणात ३०% पर्यंत घट होते. पण यंदाच्या दिवाळीत असे फटाके बाजारात येण्याची शक्यता नाही. अशा प्रकारचे फटाके प्रयोगशाळेतून बाजारामध्ये येईपर्यंत कमीत कमी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी म्हटले. दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी दिवाळीत ग्रीन क्रॅकर्सचा वापर व्हावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.


पारंपरिक पद्धतीने फटाके बनवण्यासाठी अॅल्युमिनियम, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर यांसारख्या रसायनांचा वापर केला जातो. परंतु ग्रीन क्रॅकर्स बनवताना या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे फटाके वाजवल्यानंतर आपोआप वाफ निर्माण होऊन फटाक्यातील धूळ यात सामावली जाईल. दिल्लीतील सीएसआयआर मुख्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्याकडे फटाके वाजवताना त्यातून निघणारे रंग, धूर, आतषबाजी, आवाज याचा विचार केला जातो. त्यामुळे प्रयोगशाळेत नवीन तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने  फटाक्यांचे परीक्षण करण्यासाठी त्यांना पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडे पाठवण्यात आले आहे. सीएसआयआरच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीरी), पिलानीनेही प्रदूषणमुक्त ई-क्रॅकर्स तयार केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...