मराठा समाजाच्या ठिय्या / मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात घुले, ढाकणे व राजळेंची उपस्थिती

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास तांत्रिक कारणामुळे विलंब झाला असला, तरी हा प्रश्न लवकर सुटावा, म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सकारात्मक वाटचाल सुरू आहे. आरक्षणासह सर्व प्रलंबित मागण्यासाठी आपण मराठा समाजाबरोबर आहोत, प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

प्रतिनिधी

Aug 06,2018 12:31:00 PM IST

पाथर्डी- मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास तांत्रिक कारणामुळे विलंब झाला असला, तरी हा प्रश्न लवकर सुटावा, म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सकारात्मक वाटचाल सुरू आहे. आरक्षणासह सर्व प्रलंबित मागण्यासाठी आपण मराठा समाजाबरोबर आहोत, प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.


जुन्या बसस्थानक चौकात २७ जुलैपासून सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन सुरू असून नऊला आंदोलन तीव्र करून सरकारला जाब विचारण्याचा निर्णय संयोजकांनी घोषित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शनिवारी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्र्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत सर्व पातळ्यांवर आरक्षणासाठी आपण मराठा समाजाबरोबर आहोत, कोणत्याही संघर्षाची आपली तयारी असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीय ठरवू नये, सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले जात असल्याने लोकांचा संयम सुटून आत्महत्यांचे प्रमाण वाढत अाहे, असा आरोप त्यांनी केला. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात मराठा, धनगर व मुस्लिमांना आरक्षण मिळावे, यासाठी येत्या ९ तारखेला सर्व शक्तीनीशी आपण आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे ढाकणे म्हणाले.


वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाळके महाराज यांनी येत्या ९ ला तालुक्यात येणारे सर्व रस्ते अडवून अांदोलनाचा भाग म्हणून कीर्तन करणार असल्याचे सांगितले. या अांदोलनात सर्व वारकरी, टाळकरी सहभागी होतील, असे ते म्हणाले. आमदार राजळे यांनीही आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. त्या म्हणाल्या, शांततेच्या मार्गाने पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात समाजबांधवांनी आंदोलने केली. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेतली. आरक्षणाच्या मुद्यावर शासनाच्या वाटचालीबाबत शंका घ्यावी, अशी परिस्थिती नाही.


मागासवर्ग आयोगाची बाजू शासनासमोर आल्याशिवाय ठोस निर्णय घेणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा गेला, तर तर तेथे तो टिकला पाहिजे यासाठी सर्व पातळ्यावर खबरदारी घेतली जात आहे. अनुचित प्रकार आंदोलकांनी करू नयेत. आरक्षणासाठी आपण खांद्याला खांदा लावून काम करू, असे राजळे म्हणाल्या.


पक्षाच्या गटबाजीबद्दल नाराजी
सकल मराठा आरक्षण समितीच्या मांडवात सर्वच नेत्यांनी पाठिंबा दर्शक उपस्थिती लावून आंदोलकांशी संवाद साधला, तरी गट व पक्षभेद मात्र अबाधित रहातील, याकडेही लक्ष दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी शनिवारी हजेरी लावली, त्यावेळी अॅड. प्रताप ढाकणे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. ढाकणेंच्या दौऱ्यात घुले यांचे प्रमुख शिलेदार नव्हते. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या दौऱ्यात घुले-ढाकणे गटाच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते गैरहजर राहिले. पक्षाच्या समर्थकांकडून समाजाच्या व्यासपीठावर गटबाजी जोपासली जात असल्याबद्दल आंदोलकांनी नाराजीचा सूर आळवला.

X
COMMENT