आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडे तुमचे-आमचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित रुद्रवार भारतमाता चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या आदल्या दिवशी फुल टू धुमाकूळ सुरू झाला संध्याकाळपासून. रिअल फायर वाइन शॉपसमोर शिस्तीत रांग लागली होती. आपला नंबर येण्यास वेळ आहे, असे लक्षात आल्यावर कोसळती अर्थव्यवस्था. भ्रष्ट राजकारणी, जाती-धर्मावरून वाढत चाललेली तेढ अशा विषयांवर चर्चा सुरू झाली. तुम्ही म्हणाल की, हे सगळं तुम्हाला कसं माहिती. तर रांगेत मी माझ्या खास मित्रासह होतो. गप्पा सुरू असताना माझे लक्ष चौकातल्या कोपऱ्यात गेले. तर तिथे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे उभे होते. ते पाहून माझ्यातील संवेदनशील, सर्जनशील माणूस जागा झाला. मग मित्राला तू जरा रांगेतच थांब, असे म्हणत मी झेंड्याजवळ पोहोचलो. आणि त्यांच्या गप्पा ऐकू लागलो. त्यातला एक जण म्हणाला, खरं तर आम्ही सारेच माणसाला आनंद देण्यासाठी. पण त्यांनी जात, धर्मनिहाय रंग निश्चित केला. एका रंगाचा झेंडा लावला की दुसऱ्या रंगाच्या झेंड्याला मानणारे लोक तो झेंडा काढूून टाकतात. जाळतात. कधी कधी जागा बळकावण्यासाठी आमचा वापर करतात. पण हीच माणसं रंगपंचमीच्या दिवशी सगळ्या रंगांची मनसोक्त उधळण करतात. ही करामत ते नेमकी कशी करतात, हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. दुसऱ्यानं वाइन शॉपसमोरील गर्दीकडे इशारा करत सांगितलं की, सावध राहा हा… त्यांच्यातील विखारी द्वेषाचा वारा आपल्याला लागता कामा नये. त्यावर साऱ्या रंगाचे झेंडे म्हणाले… होय...होय...अजिबात लागता कामा नये. ते असं म्हणेपर्यंत एक भलीमोठी काठी तिथं आली. आणि म्हणाली, उगाच काहीतरी बडबड करू नका. माझ्यासारख्या मजबूत काठीचा आधार नसला तुम्हाला ही माणूस मंडळी विचारणारच नाहीत. आता तुम्ही ज्या काठ्या आणल्या त्या फेकून द्या आणि माझ्या मजबूत खांद्यावर विराजमान व्हा. झालं, त्या कणखर ऑफरनं सर्व रंगांचे झेंडे गडबडून गेले. एक जण म्हणाला, मी कायम सत्तेतला. सत्ताधारी कायम मला मिरवत असतात. त्यामुळं या काठीवर विराजमान होण्याचा पहिला मान मलाच मिळाला पाहिजे. त्यावर दुसऱ्या रंगाचा झेंडा म्हणाला, अरे फक्त तुझ्या एकट्याच्या रंगाचा झेंडा नसतो सत्ताधाऱ्यांचा. त्यात तीस टक्के मी असतोच की. त्यामुळं मलाही संधी मिळालीच पाहिजे. तसा तिसरा तावातावाने उद्गारला, वा रे वा. महाविकास आघाडी आहे. ट्वेंटी पर्सेंट मी पण आहेच. मला विसरून कसे चालेल. या तिघांची स्पर्धा पाहून चौथा म्हणाला, विरोधी पक्षच सर्वात मजबूत आहे. त्यामुळं माझाच अधिकार आहे. पाचव्यानं सांगितलं, की, सत्तेत कोणीही आला तरी सपोर्टमध्ये माझ्या रंगाला मानणारे असतात. मला कसे डावलता? आणि मग काय पाहता पाहता जोरदार वादावादी सुरू झाली. अगदी अंगाला लावलेल्या काठ्या काढून एकमेकांंवर चालून जाण्याची तयारी सुरू झाली होती. तत्पूर्वी सुदैवाने त्यांचे लक्ष पांढऱ्या रंगाकडे गेले. तो खिन्नपणे उभा होता. साऱ्या रंगांनी त्याला विचारले, काय हो...तुम्ही काही बोलत नाहीत? तो उत्तरला, तुम्हाला माणसाची लागण झाली. एक मजबूत काठी काय मिळाली तर तुम्ही एकमेकांवर हल्ला करणे सुरू केले. मग माणसांत आणि तुमच्यात काय फरक राहिला. आपल्यामुळं काठी आहे. काठीमुळं आपण नाही, याचा विसर पडू देऊ नका. कारण तो पडला तर एक दिवस सर्वांना काळ्या रंगात सामील व्हावं लागेल. तो पाहा तो काळा रंग त्या वाइन शॉपच्या मागे दबा धरून बसला आहे. पांढरेबुवांच्या या उद्गाराने सारेच भानावर आले. माणसाच्या रूपातील मजबूत काठीच्या नादी लागणेच नको, असे म्हणत आपापल्या मुक्कामी निघाले. 

संपर्क-९९२२९०७९८३

बातम्या आणखी आहेत...