आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यात जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर या अाठ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाले अाहे.
आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार जाहीर झालेली लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.
या आरक्षण सोडतीच्या वेळी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला, वाशीम, धुळे जि.प.ची निवडणूक जाहीर; ७ जानेवारीला मतदान
मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ३६ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली अाहे. या जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी ७ जानेवारीला मतदान हाेईल तर ८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेतील. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी ही घाेषणा केली. या जिल्ह्यात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. १८ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.
जि. प. अध्यक्षपदाचे अारक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदूरबार, हिंगोली
अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदूर्ग, सांगली, वर्धा, बीड
खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.