New Governor / भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, 5 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती

5 राज्यांमध्ये नवीन राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे गव्हर्नर

दिव्य मराठी वेब

Sep 01,2019 01:48:05 PM IST

मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतींनी रविवारी महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले. त्यामध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शाहबानो प्रकरणी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले आहे. तामिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या डॉ. तमिलिसाई सुंदरराजन (58) यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या सर्वात युवा विद्यमान राज्यपाल आहेत. यासोबतच कलराज मिश्र यांना राजस्थान आणि बंडारू दत्तात्रय यांना हिमाचल प्रदेशात पाठवण्यात आले आहे.

शिक्षक आणि पत्रकार होते कोश्यारी
17 जून 1942 रोजी जन्मलेले भगत सिंह कोश्यारी उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 2001 ते 2002 पर्यंत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषविले होते. 2002 ते 2007 पर्यंत ते विरोधीपक्ष नेते होते. आणि 2008 पासून 2014 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. राजकारणात येण्यापूर्वी कोश्यारी एक शिक्षक आणि त्याही पूर्वी एक पत्रकार होते. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलनामुळे 1977 मध्ये ते तुरुंगात देखील गेले होते.

काँग्रेसमध्ये राहिलेले आरिफ मोहंमद खान कित्येक वर्षांपासून राजकारणापूसन दूर होते. त्यांनी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे उर्दूमध्ये भाषांतर केले होते. केंद्र सरकारच्या तीन तलाक विरोधी कायदा आणि कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले होते. ते 1984 च्या राजीव गांधी कॅबिनेटमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संसदेत कायदा बदलण्याचा विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता. राष्ट्रपतींनी आता त्यांना केरळच्या राज्यपाल पदावर नियुक्ती दिली आहे.

X
COMMENT