आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करुग्ण असूनही गतिमंद मुलाला कर्तृत्ववान बनवणाऱ्या आईचा सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी 'वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने १ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात 'वयोश्रेष्ठ पुरस्कार-२०१९' वितरित करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी, अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव या वेळी उपस्थित होत्या. उल्लेखनीय योगदानासाठी १२ श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना या वेळी १५ पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रिटीपर्यंत पोहोचवण्याची किमया करणाऱ्या इचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी 'वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता पुरस्काराने' सन्मानाने गौरवण्यात आले. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या अंतर्यातना आणि मुलाच्या बाह्य यातना अशा कठीण समयी डगमगून न जाता त्यांनी परिस्थितीचा धिटाईने सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरू असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. गतिमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत मागील १० वर्षांपासून दाते कार्यरत असून योगदान देत आहेत.

दातेंचा समाजापुढे आदर्श
शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे आपल्या मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनवणाऱ्या मातेलाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
शारदा दाते यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुलगा प्रथमेश ग्रंथपाल
इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मागील ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणेही येतात.

बातम्या आणखी आहेत...