आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • President Trump Took Government Expense Hospitality In His Own Hotel For 290 Days

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वत:च्याच हाॅटेलमध्ये घेतला २९० दिवस सरकारी खर्चाने पाहुणचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचे हाॅटेल, क्लब, गाेल्फ काेर्सची उलाढाल गेल्या दाेन-तीन वर्षांत वाढली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच त्यांच्या हाॅटेलमध्ये राजकीय कार्यक्रमांची रेलचेल वाढली हाेती. व्हाइट हाऊसमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली आहे. विदेशी सरकार, व्यावसायिक संस्था आणि धार्मिक समूहांकडून त्यांच्या हॉटेलमध्ये कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे. वॉशिंग्टनमधील ट्रम्प इंटरनॅशनल हाॅटेलच्या बारमध्ये अमेरिकी सरकारी अधिकारी, दलाल आणि देणगीदारांची झुंबड उडालेली असते.

ट्रम्प यांनी सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर हजाराेंच्या संख्येत विदेशी नेते, दलाल, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, संसद सदस्य, कॅबिनेट सदस्य आणि राष्ट्राध्यक्षांशी संबंधित अन्य लाेकांनी त्यांच्या हाॅटेल, क्लब आणि अन्य ठिकाणांवर हजेरी लावली आहे. साेशल मीडिया पाेस्ट आणि सर्व्हे करणाऱ्या संस्थांच्या अनुसार २०१७ नंतर ९० खासदार, प्रशासनातील २५० अधिकारी आणि ११० विदेशी राजकीय नेते, अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाॅटेल, क्लबमध्ये हजेरी लावली हाेती. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या हाॅटेल, रिसाॅर्टमध्ये २९३ दिवस सरकारी पाहुणचार घेतला. लाखाे डाॅलर्स या प्रवासात खर्च झाले. पब्लिक सिटिझनचे प्रमुख राॅबर्ट व्हिसमॅन म्हणाले, या साऱ्या बाबीतून भ्रष्टाचाराच्या सामान्यीकरणाची झलक पाहायला मिळते. ट्रम्प यांच्या वाॅशिंग्टनमध्ये अशा प्रकारे व्यवसाय चालताे.

निवडणूक आयाेगाकडील माहितीनुसार जानेवारी २०१७ नंतर राजकीय उमेदवार, पक्ष संघटनांनी ट्रम्प यांच्या हाॅटेलमध्ये ४० काेटी रुपयांहून अधिक रकमेची उधळपट्टी केली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वीच्या पहिल्या चार वर्षांत याच हाॅटेलमध्ये राजकीय संघटनांनी केवळ ८५ लाख रुपये खर्च केले हाेते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी आयर्लंडमधील ट्रम्प इंटरनॅशनल गाेल्फ लिंक आणि हाॅटेलमध्ये दाेन रात्री मुक्काम केला हाेता. त्यानंतर लाभाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. पेन्सच्या मुक्कामावरून वादंग सुरू हाेण्याच्या काही दिवस अगाेदर ट्रम्प यांनी फ्रान्समधील जी-७ देशांच्या बैठकीत आगामी शिखर परिषद ट्रम्प नॅशनल दाेराई रिसाॅर्ट््स, मियामी येथे हाेईल याचे सूताेवाच केले. त्यापाठाेपाठ डेमाेक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्षांकडून सरकारी कामासाठी स्वत:च्या हाॅटेल, रिसाॅर्ट््सच्या वापराच्या चाैकशीस सुरुवात केली आहे. स्काॅटलंडमधील एका विमानतळावर इंधन भरण्यासाठी अमेरिकी लष्करी विमाने सतत थांबत असतात त्याची सध्या चाैकशी केली जात आहे. शेजारच्या ट्रम्प यांच्याच गाेल्फ रिसाॅर्टमध्ये या विमानातील कर्मचारी मुक्काम करीत असतात.
विराेधकांचे सारे आराेप फेटाळून लावत डाेनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्या हाॅटेलमध्ये लाेक थांबतात, कारण आमच्याकडे उत्कृष्ट सेवा पुरवल्या जातात. आमच्या सेवा-सुविधा ग्राहकांना आवडतात. दरम्यान, ट्रम्प यांनी कधीही मंत्री, रिपब्लिकन नेत्यांना आपल्या हाॅटेलमध्ये थांबण्यास किंवा कार्यक्रमाचे आयाेजन करण्यास सुचवले किंवा सांगितलेले नाही, असे व्हाइट हाऊसमधील विद्यमान आणि माजी अधिकारी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...