आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑनलाइन’ बाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व पुरूष वाचकांसाठी काही प्रश्न आहेत, रात्री एखादी मुलगी, महिला, फ्रेंड लिस्टमधली मैत्रीण ऑनलाइन दिसली तर तुमच्या मनात नक्की काय येतं?

 

स्त्रिया अपरात्री ऑनलाइन असतात म्हणजे ‘अव्हेलेबल’ असा परस्पर सोयीचा अर्थ तुम्ही काढता का? एखादी महिला अवेळी ऑनलाइन असण्यावरून जर तिच्या चारित्र्याबद्दल कमेंट करत असाल तर त्याच निकषावर तुम्ही स्वत:बद्दल काय स्पष्टीकरण देणार? या प्रश्नांची उत्तरं ही केवळ समाजाची प्रातिनिधिक मानसिकता दर्शवणारीच नसतील. नवे शोध हे नव्या समस्यांना जन्म देत आहेत,

 

महिलांच्या अनुषंगानं सकारात्मक बदल करावयाची क्षेत्रं किती व्यापक होत जात आहेत याची झलक दाखवणारीही असतील....  

 

रात्री सोशल मीडियावरच्या प्रोफाइलला ज्या महिलांच्या नावासमोर हिरवं टिंब दिसतं, त्यांना “तू अजून ऑनलाइन का बरं?’ हा प्रश्न सर्रास विचारला जातो. या प्रश्नात वाईट काहीच नाही. प्रश्न विचारण्यामागे जी विचारसरणी आहे ती घातक आहे. 


रात्री अकरानंतर ऑनलाइन असलेली बाई ही ‘त्यातलीच’अर्थात वाईट चालीरीतींची असाच ग्रह अनेकांचा असतो. नोकरीमुळे जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे महिलांना सोशल मीडियाचा वापर सातत्यानं करावा लागतो. हा वापर जसा कामासाठी असतो तसाच तो वैयक्तिक कारणासाठीही असतो.  मात्र बाईचं रात्री ऑनलाइन असणं आणि पुरुषांचं रात्री ऑनलाइन असणं यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. स्त्रिया रात्री ऑनलाइन असताना त्यांच्याशी साधला जाणारा संवाद, त्या संवादाची पातळी यातून हे सहजी लक्षात येतं. स्त्रियांशी  ‘हाय’ पासून सुरू झालेला संवाद बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवर उतरतो. किंबहुना तो पातळी सोडतो असं म्हणणं जास्त योग्य आहे. रात्रीची झोप येत नाही का इथपासून ते नवरा जवळ करत नाही का? इथपर्यंत अनेक वैयक्तिक बाबतीत नाक खुपसले जाते. चौकश्या केल्या जातात. महिलेनं विरोध दर्शवला तरी वैयक्तिक प्रश्न सुरूच राहतात. विरोध दर्शवल्यानंंतरही जर महिला आॅनलाइन राहिली तर तुम्हाला हे सगळ हवंच आहे, तुमचा विरोध वरवरचा आहे, असाही समज करून घेतला जातो. यावर संबंधिताला ब्लाॅक करण्याचा उपाय अनेक जण सुचवतील. मात्र हा उपाय सुचवताना आपण एक गोष्ट विसरतो की सोशल मीडिया हा समाजाचा आरसा आहे. ज्या पद्धतीने लोक महिलांबद्दल विचार करतात त्याच पद्धतीने ते व्यक्तही होतात. त्यामुळे रात्री महिला काही काम करण्यासाठी आॅनलाइन असेल, असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. हेच या पुरुषसत्ताक व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. 
या विषयावर काही महिलांशी बोलल्यानंतर या महिलांचं रात्री अवेळी ऑनलाइन असण्याचं कारण समोर आलं. स्वतःची कंपनी असणारी अजिता सांगते की रात्री इंटरनेटला चांगला स्पीड असतो. यावेळी हेवी फाइल्स डाऊनलोड करणं सोपं जातं. वेळ वाचतो. मात्र डाऊनलोडिंगच्या तेवढ्या मोजक्या वेळातही तुम्ही आॅनलाइन का, हा प्रश्न येतोच. तीन वर्षांचे मूल असणारी नूपुर सांगते, दिवसभर मुलामागे वेळ जातो. स्वतःसाठी काहीही करता येत नाही. रात्री मुलगा झोपल्यानंतर आॅनलाइन पेपर व मासिक वाचण्यासाठी सलग व निवांत वेळ मिळतो. असा वेळ दिवसभरात इतर कुठल्याच वेळेला नाही मिळू शकत. मात्र या वेळेत मेसेंजर बाॅक्समध्ये मेसेज येण्याचे प्रमाण वाढते. त्या मेसेजना उत्तरे देण्याचे टाळले तरी त्यांचा त्रास होतो. 


समवयस्कासोबतच ‘पिकली पानं’ वयोवृद्ध आंबटशौकीनही या प्रकारात मागे नाहीत. संगीता म्हणते,  रात्री एकदा चॅट बाॅक्समध्ये साठी उलटलेल्या एका काॅमन फ्रेंडचा मेसेज आला. त्याला उत्तर देताना संवाद अगदीच वैयक्तिक पातळीवर गेला. तुला कुठल्या साइजचा ब्लाउज लागतो, रात्री नवरा-बायको एकत्र झोपता का? इथपर्यंत. मी विरोधाचा सूर लावला तर “ रात्री आॅनलाइन आहात तर हे प्रश्न तुम्हाला त्रासदायक का वाटतात?  पुढच्या कित्येक महिन्यांत तिने कुणाच्याही मेसेजला रिप्लाय केला नाही. रात्री रिप्लाय करून आपण मोठी चूक केली, असा समज करून घेऊन ती त्यासाठी स्वत:लाच दोष देत बसली. या सर्व प्रकारांचा स्त्रियांना अर्थातच मानसिक त्रास होतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यावर बंधनं घातली जातात. शिवाय यात चूक नसतानाही त्या स्वत:ला दोषी मानतात. रात्री महिला ऑनलाइन असण्यावर सवाल उपस्थित करणारा समाज, पुरुष 
रात्रीच्या वेळी ऑनलाइन काय करतात, हे कधीच का विचारत नाही...?

 

ठोशास ठोसा # सोबतीची खात्री 
साधारणत: दहा वर्षांपूर्वी जेव्हा सोशल मीडियाचं प्रस्थ फार नव्हतं तेव्हा महिला ठरावीक वेळेतच ऑनलाइन असायच्या. या माध्यमाचा दबकत दबकत वापर करायच्या.  मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मित्र, परिचित अथवा इतर कुणाच्याही फालतू कमेंटना, इनबॉक्स चौकश्यांना त्या ठोशास ठोसा न्यायानं उत्तर देतात. इनबॉक्समधे येऊन चॅट करणाऱ्या, लगट करू पाहणाऱ्यांना आजच्या स्त्रिया तंत्रज्ञानाच्या भाषेतच उत्तर देताहेत. अशा ऑनलाइन त्रासाचा स्क्रीनशॉट काढून छळणाऱ्याला तुरूंगाची हवा दाखवणाऱ्या दिवंगत कविता महाजन हे याचं उत्तम उदाहरण होतं. त्यांनी याविरोधात सोशल माध्यमावर मोहीमच उघडली होती.  #सोबतीची खात्री या नावानं. याला खूप प्रतिसाद मिळाला. कविताजींच्या पुरूष मित्रांनीही त्यांना खुलं समर्थन दर्शवलं. विशेष म्हणजे अनेक स्त्रियांनीही या त्रासाला विरोध दर्शवला. छळणाऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून कविताजींना पाठिंबा दिला. सामाजिक व्यासपीठावर महिलेसाठी महिलांनी एकत्र येणं, उघडपणे बोलणं हे या ठिकाणी खूप गरजेचं होतं.

 

आम्हाला सांगा...
ऑनलाईनचे असे अनुभव तुम्ही कधी घेतलेत का? तुम्हीही कधी अशा त्रासाचा सामना केलाय? काय केलं या त्रासातून बाहेर पडण्यासाठी? तुमचे अनुभव, या समस्येवरचे तुमचे उपाय आम्हाला सांगा. आमचा पत्ता शेवटच्या पानावर.