काँग्रेसचे गोत्र नसलेल्या / काँग्रेसचे गोत्र नसलेल्या सरकारमुळे जगभरात देशाचा सन्मान वाढला; अखेरच्या सत्रात पंतप्रधानांनी देशात बहुमतामधील सरकार आणण्यावर दिला जोर

Feb 14,2019 10:41:00 AM IST

नवी दिल्ली- सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाची बुधवारी समाप्ती झाली. शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अखेरचे भाषण केले. त्यांनी भाषणातून खासदार तसेच संसदेत झालेल्या कामकाजाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या खुसखुशीत शैलीत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आणि त्यांचे कौतुकही केले. विशेषत: विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर त्यांनी स्तुतिसुमने उधळली. मुलायमसिंह यादव यांचे धन्यवाद व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी १६ व्या लोकसभेच्या अखेरच्या भाषणात २०१९ मध्ये पुन्हा पूर्ण बहुमत असलेले सरकार यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात काँग्रेसचे गोत्र नसलेले सरकार आले. पहिल्यांदा अटलजी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये बहुमत असलेले सरकार आले. मोदी व सुषमा यांच्या कार्यकाळात जगभरात भारताबद्दलचा सन्मान वाढला आहे, असे लोक म्हणतात, असा उल्लेख त्यांनी केला. हा सन्मान मिळण्यामागे देशातील बहुमत असलेले सरकार कारणीभूत आहे. त्याचे श्रेय मोदी किंवा सुषमा यांना मिळत नाही, ते २०१४ मध्ये जनतेने घेतलेल्या निर्णयाला जाते, असे मोदी यांनी सांगितले.

सभागृहात काही वेळा असंसदीय शब्दांचा उल्लेख झाला. असे व्हायला नको. टीडीपी खासदार संसदेत अनेक वेळा आपल्या वेशभूषेद्वारे आमच्या तणावाला दूर करत. एकूणच कार्यकाळ हसत खेळत पार पडला. पहिल्या वेळेस तुम्ही मला मदत केली त्याबद्दल आभारी आहे. संसद कर्मचाऱ्यांचेही आभार मानतो. सर्व खासदारांनाही हृदयापासून धन्यवाद देतो, असे मोदी म्हणाले.

राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित, तीन तलाक, नागरिकत्व विधेयके लटकली
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काहीही चर्चा झाली नाही. बुधवारी धन्यवाद प्रस्ताव मंजूर करून कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. १३ दिवसांच्या सत्रात अंतरिम बजेट, लेखानुदान व वित्त विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. ही विधेयके ध्वनिमताने पारित करून लोकसभेकडे पाठवण्यात आली. राज्यसभेत तीन तलाक व नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाहीत.


पहिल्यांदा सरकार..
८ बैठकांत १०० टक्के काम, जास्त महिलांकडे मंत्रिपदे

मोदी म्हणाले, २०१४ मध्ये मी नवागत खासदारांपैकी एक होतो. तीन दशकांनंतर बहुमत व पहिल्यांदाच गैरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले होते. त्यात ८ बैठकांत १०० टक्के कामकाज झाले. १६ व्या लोकसभेत देशात पहिल्यांदाच सर्वात जास्त ४४ महिला खासदार व याच सरकारमध्ये सर्वाधिक महिला मंत्री बनल्या याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खासदारांची स्तुती..
माझ्या भाषणाचे भरणपोषण खरगेंकडून होत होते

मोदींनी विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे यांची स्तुती केली. त्यांचे भाषण ऐकून माझ्या भाषणाचे भरणपोषण व्हायचे. एकेकाळी अडवाणी पूर्णवेळ सभागृहात बसत. आज खरगेही पूर्णवेळ सभागृहात बसतात. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. या वयातही त्यांची ऊर्जा कमी नाही. सर्वांनी आपापल्या परीने मला मदत केली. त्याबद्दल धन्यवाद.


विरोधकांविषयी..
विरोधी बाकावर राहूनही खासदारांचे योगदान

मोदी म्हणाले, मला आज सरकारची कामगिरी सांगायची नाही. विरोधी बाकावर राहूनही अनेक खासदारांनी देशाच्या विकासात योगदान दिले. आज देश सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भारताचा आत्मविश्वास वेगाने वाढतोय.


देशाबद्दल..
मानवतेसाठी काम केले, संयुक्त राष्ट्रात योगाचा ठराव

पंतप्रधान म्हणाले, ५ वर्षांत मानवतेच्या क्षेत्रात भारताची मोठी भूमिका राहिली. नेपाळमध्ये भूकंप, फिजीतील वादळ, श्रीलंकेतील पूर, म्यानमारमधील संकट, येमेनमध्ये अडकलेल्यांना मदतीचे काम भारताने केले. संयुक्त राष्ट्रात योगाबाबत ठराव जलदगतीने मंजूर झाला. योगाला जागतिक लोकप्रियता मिळाली.


सभागृहात कामकाज..
५ वर्षांमध्ये २०३ विधेयके मंजूर, काळ्या पैशाचा कायदा

मोदी म्हणाले, कार्यकाळाच्या दृष्टीनेही माझा ५ वर्षांचा कार्यकाळ चांगला राहिला. यादरम्यान २१९ विधेयके संसदेत पारित झाली. २०३ विधेयके मंजूर झाली. या कार्यकाळात काळा पैसा, दिवाळखोरी, आर्थिक गुन्हे करून देश सोडणारे गुन्हेगारविरोधी कायदे तयार केले. उच्च वर्गातील गरिबांसाठी आरक्षणाची व्यवस्थाही याच सभागृहाने केली. दोन्ही सभागृहांच्या सर्व खासदारांना त्याचे श्रेय मिळायला हवे.

X