आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी यांचा मराठवाड्याला दिलासा: ‘जल जीवन मिशन’साठी देशभरात ३.५ लाख कोटी खर्च करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - मराठवाड्यात कायम दुष्काळ असतो त्यामुळे सर्वांना पाण्याचे महत्त्व आहे. केंद्र सरकारनेदेखील भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन एक नवे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाणी वाचवा अन् घर-घर पाणी पोहोचवा’ अशा पद्धतीच्या अभिनव योजनेसाठी तीन लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे शनिवारी (७ सप्टेंबर) त्यांच्या हस्ते औरंगाबादेत लोकार्पण करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. 

मोदी म्हणाले, ‘मराठवाडा थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेषत: महिलांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यांची हतबलता मी जाणून आहे. त्यामुळेच आता पुढील काळात ‘जल जीवन मिशन’ची सुरुवात करत आहोत. त्यासाठी ३ लाख ५० हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. ‘पाणी वाचवा अन् घर-घर पाणी पोहोचवा’ असे अभियान राबवणार आहोत. राममनोहर लोहिया यांच्या संसदेतील भाषणाचा हवाला देऊन मोदींनी पूर्वीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले.]
 

औरंगाबादच्या आयेशा ठरल्या ८ कोटीव्या गॅसच्या मानकरी
मोदींनी मार्च-२०१८ मध्ये ५ कोटी उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी पुढील वर्षी ८ कोटी गॅस कनेक्शन देण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. सात महिने पूर्ण होण्याच्या पूर्वीच ८ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. औरंगाबादेत पाच महिलांना उज्ज्वला कनेक्शन देण्यात आले. त्यामध्ये आयेशा शेख रफिक यांना आठ कोटीवे कनेक्शन दिले गेले आहे. त्याशिवाय औरंगाबादेतील सुलताना विनोद बर्डे, मंदाबाई आत्माराम पाबळे, जम्मू-काश्मीर येथील नर्गिस बेगम आणि झारखंड येथील रेखादेवी यांनाही कनेक्शन दिले गेले.
 

महिला बचत गट मेळावा | नवीन भारताची निर्मितीच महिलांच्या नेतृत्वात केली जाणार : मोदी
ग्रामविकास विभाग आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे ‘महाराष्ट्र स्टेट रुरल लायव्हलीहूड मिशन’ म्हणजेच ‘उमेद’अंतर्गतच्या महिला बचत गटांच्या राज्यातील प्रातिनिधिक महिलांचा मेळावाही याच कार्यक्रमात घेण्यात आला. या वेळी मोदी म्हणाले, महिलांसाठी शौचालय आणि पाण्याची व्यवस्था केल्यास देश समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. त्यांचा हा संकल्प आतापर्यंत कोणत्याही नेत्याने पूर्ण केला नाही. आमच्या सरकारने मात्र महिलांच्या दोन्ही गरजा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी सरकार महिलांचे कल्याण असे म्हणत होते, आता मात्र नवीन भारताची निर्मितीच महिलांच्या नेतृत्वात केली जाणार आहे. २०२२ दरम्यान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहोत. त्या वेळी देशातील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर, वीज, पाणंदमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. पूर्वीच्या सरकारांनी तुकड्यांमध्ये योजना आणल्या, आम्ही मात्र योजनांमध्ये सुसूत्रता आणण्याचा संकल्प केला असून त्यातूनच सर्वांगीण विकास केला जाईल. पक्के घर, त्यामध्ये मुबलक पाणी, शौचालय, रोजगार आणि सामाजिक सौहार्द अशा आयामांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. प्रास्ताविक करताना पंकजा पालवे म्हणाल्या ‘मोदींनी बेटी बचाआे-बेटी पढाआेचा नारा दिला आहे. त्यामध्ये आम्ही बेटी को आगे बढाआेचे धोरण घेतले आहे. महिला बचत गटाचे उत्पादन अॅमेझॉनसोबत सामंजस्य करार करून विकले जात आहे.’ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे आणि माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी यांनी केले.
 

यूएई, रशियन कंपनीला पायघड्या, वॉटरग्रीडला प्राधान्य : मुख्यमंत्री
नरेंद्र मोदींनी त्यांच्या यूएई दौऱ्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीसमवेत करार केला आहे. त्याशिवाय रशियामधील एम.आर. कंपनीसोबतही बोलणे झाले आहे. या दोन्ही कंपन्या आता ऑरिकमध्ये येऊ घातल्या असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. औरंगाबादेतील अॉटोक्लस्टर सर्वश्रेष्ठ आहे. वॉटरग्रीडमार्फत दुष्काळावर मात करणार आहोत. मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरीत आणणार आहोत. राज्यातील सर्व धरणे एकमेकांना जोडण्यासाठी वॉटरग्रीड केले जाईल. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांचे कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत, असेही त्यांनी म्हटले.
 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...