आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी काळजी घेणाऱ्या एखाद्या पालकाप्रमाणे भासतात : आदित्य ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यकर्ता ज्या तळमळीने आपल्या राष्ट्राला संबोधित करतो, अगदी तसेच नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या बैठकीतील भाषण व वर्तन हाेते. मोदी यांच्या भाषणाने मी भारावून गेलो आहे. मोदी मला काळजी घेणाऱ्या पालकासमान भासले, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. 


एनडीएच्या घटकपक्षांची शनिवारी दिल्लीत संसदीय नेता निवडीची बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य गेले होते. मोदी यांच्या भाषणाने आदित्य फारच भारावून गेले. त्यासंदर्भात आदित्य यांनी ट्विटवर पोस्टही टाकली.  त्यात आदित्य म्हणतात, ‘मोदी हे राजनेते वाटतात. त्यांचे एनडीए बैठकीतील भाषण राष्ट्राशी आणि जगाशी संवाद साधणारे होते. या भाषणाने मला प्रेरणा मिळाली. मला मोदी हे काळजी करणाऱ्या पालकासमान भासले. जनतेची कामे करण्यासंदर्भात त्यांनी नवनियुक्त खासदारांशी जो संवाद साधला तो फार महत्त्वाचा होता.’ ‘माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत सन्मानाचा आहे. मी अशा बैठकीत सहभागी झालो आहे, ज्यामध्ये नरेंद्र माेदी यांची दुसऱ्यांदा एनडीएचा नेता म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख (उद्धव) यांनी त्या निवडीला अनुमोदन दिले आहे’ असे आदित्यने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


२०१४ मध्ये आदित्यला भाजपने हिणवले होते
गमतीचा भाग म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य सेनेकडून युतीची बोलणी करण्यासाठी भाजपकडे आले होते. तेव्हा भाजपने आदित्यबरोबर काय बोलणी करायची, अशी टिप्पणी केली होती. त्याच आदित्य यांना आज भाजप सन्मानाने वागवतो आहे. विशेष म्हणजे गेली चार वर्षे माेदी यांनी ज्या उद्धव ठाकरे यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते त्याच उद्धव यांना आता एनडीएच्या बैठकीत मोदी यांच्या जवळची खुर्ची दिली जात आहे.  


दिल्लीत मागच्या आठवड्यात एनडीएच्या दोन बैठका झाल्या. या दोन्ही बैठकांना उद्धव यांनी आपल्याबरोबर आदित्यला जाणीवपूर्वक नेले होते. एकूण आदित्य यांचे शिवसेनेत उत्तरोत्तर स्थान बळकट होत चालले आहे.