आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी सकाळी अल्प कालावधीसाठी येथील श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज विमानतळावर भारतीय वायुदलाच्या विमानाने आगमन झाले. विमानतळावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर शीलाताई भवरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरील स्वागत समारंभ आटोपून अवघ्या पाच मिनिटात पंतप्रधान मोदी भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने तेलंगणातील निझामाबादकडे रवाना झाले.
तेलंगणात सध्या निवडणुका सुरू आहेत. तेथे प्रचाराला जाण्यासाठी नरेंद्र मोदी येथे आले होते. अल्प काळात त्यांच्याशी इतर चर्चा झाली नाही, अशी माहिती प्रदेेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधानांनी विमानतळावर कोणतीही चर्चा केली नाही. केवळ हारतुरे स्वीकारून ते तेलंगणाकडे रवाना झाल्याचे महापौर शीलाताई भवरे यांनी सांगितले.
कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांचा नांदेड दौरा अवघा पाच मिनिटांचा होता. तथापि त्यासाठी विमानतळ, विश्रामगृह येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. पंतप्रधानांच्या आगमन प्रसंगी विमानतळावर केवळ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड अशा केवळ ११ जणांनाच प्रवेश देण्यात आला. विमानतळाला छावणीचे स्वरूप आले होते. तेलंगणाकडे पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने रवाना झाले. तेव्हा एकामागे एक असे तीन भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.