आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांचे 'मिशन महाराष्ट्र', औरंगाबादमधील 'ऑरिक सिटी'चे केले उद्घाटन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर औरंगाबादमधील शेंद्रा एमआयटीसीमध्ये सुरू होत असलेल्या "ऑरिक सिटी"चे उद्घाटन करून महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर पंतप्रधानांनी महिला सक्षम मेळाव्यालाही उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, दादाजी भुसे, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे इद्यादी मान्यवर नेते उपस्थित होते.


यावेळी महिला मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील पहिली इंटिग्रेटेड इंडिस्ट्रिअल सिटी ऑरिकचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पहिला टप्पा म्हणून ऑरिक हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणावरुनच समृद्धी महामार्गही जात आहे. डीएमआयसीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला. पुढे ते म्हणाले की, मागच्या 5 वर्षांपैकी 4 वर्षे महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पण आता येणाऱ्या काळात असे होणार नाही. कोकणातील पाणी मराठवाड्याला वळवणार आणि मारठवाड्लाया दुष्काळमुक्त करणार असे ते म्हणाले.


तसेय महाराष्ट्राची पहिली वॉटरग्रीड मराठवाड्यात तयार होत आहे, त्यामुळे 64 हजार किमींची पाइपलाइन टाकून ती प्रत्येक गाव व शहराला जोडणार आहोत. 20 हजार कोटी रुपये खर्च करून हे काम करूत. या योजनेला प्रचंड पैसा लागेल, पण आमच्या पाठीशी मोदीजी आहेत. म्हणून मोदी है मुमकीन है! पुढे म्हमाले की, मागील 5 वर्षांत 50 लाख परिवार बचत गटांशी जोडले. बचत गटांशी इंडस्ट्रियल पार्क तयार करत आहोत. यासाठी 30 टक्के जागा आणि 300 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. महिला बचत गटांना दिलेला पैसा पूर्णपणे परत येतो. त्यामुळे कोणतेही व्याज न घेता कर्ज उपलब्ध केले.

धुरापासून सुटका झालेल्या महिलांचे मी अभिनंदन करतो- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. या दरम्यान, मोदी भाषणा येताच मोदी-मोदीचा जयघोष सुरू झाला. यावेळी ते म्हणाले की, आज गौरी आणि महालक्ष्मी विसर्जनाचा महत्त्वाचा दिवस असूनही एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली, तुमचे खूप खूप आभार. ही ऑरिक सिटी लाखो तरुणांना रोजगार देणार आहे. औरंगाबाद आज एका मोठ्या सिद्धीचे साक्षीदार बनत आहे. ही सिद्धी देशातील कोट्यावधी बहिणींची आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचा जो संकल्प आम्ही केला होता, तो आज या औरंगाबादेत पूर्ण होत आहे. 8 कोटींपैकी 44 लाख एकट्या महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. यासाठी मी तुम्हा सर्वांचे तसेच देशातील भगिनींचे, ज्यांची धुरापासून सुटका झाली त्यांचे अभिनंदन करतो. या योजनेत ज्यांनी मदत केली, अशा सर्व सहभागी असणाऱ्यांचे आभार मानतो. पूर्वी आम्ही फक्त 5 कोटी गॅस कनेक्शनचे लक्ष्य ठेवले होते. परंतु गेल्यावर्षी मार्चमध्ये हे लक्ष 8 कोटींवर नेले. निवडणुकांदरम्यान जेव्हाही मी तुमच्यात आलो, तेव्हा हे लक्ष्य प्राप्त करण्याचा निश्चय केला होता. सरकार बनल्याच्या 100 दिवसांतच आम्ही हे लक्ष प्राप्त केले आहे. 
 


'उज्ज्वला योजनेला चालना देण्यासाठी 5 किलोच्या सिलिंडरलाही प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील अनेक ठिकाणी पाइपद्वारे गॅस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाण्यासाठी माझ्या भगिनींना किती त्रास सहन करावा लागतो, याची मला कल्पना आहे. यामुळेच देशात "जल जीवन मिशन"ची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पूर्ण देश संकल्पबद्ध आहे. येणाऱ्या 5 वर्षांत जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये या पाण्याच्या अभियानावर खर्च केले जातील.' असे मोदी म्हणाले.पुढे ते म्हणाले, 'तुम्ही ऐकले असेल की, समाजवादी नेते राम मनोहर लोहियाजी 60-70 च्या दशकात संसदेत म्हणाले होते की, देशातील महिलांच्या दोन प्रमुख समस्या आहेत, एक शौचालय आणि दुसरे पाणी. यांचे तत्काळ समाधान झाले पाहिजे, असे झाले तर याच महिला देशाच्या समस्यांचे समाधान बनून समोर येतील. यानंतर अनेक सरकार आली आणि गेली, परंतु आमच्या सरकारने निश्चय केला की, प्रत्येक घरात पाणी आणि प्रत्येक घरात शौचालय होईल. मराठवाड्याचा हा भाग या योजनांचा सर्वात मोठा लाभार्थी होईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिलीच आहे. येथील वॉटरग्रीड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या भागातील पाण्याची उपलब्धता वाढेल. प्रत्येक घरात पाणी येईल. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी जरूर ती मदत राज्य आणि केंद्र सरकार उचलत आहे. शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत, पशूंचे लसीकरण अशा अनेक माध्यमातून होत आहे.

बचतगटांच्या माध्यमातून तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमच्या बरोबर देशही सशक्त होत आहे. "दीनदयाल उपाध्याय ग्रामीण आजीविका मिशन"द्वारे नव-नवे उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या नेतृत्वात राष्ट्रकल्याणासाठी आमची वाटचाल सुरू आहे. यामुळेच या वर्षीच्या बजेटमध्ये महिला स्वयंसाहायता गटांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या गटांसाठी व्याजावरील सूट आता पूर्ण देशात लागू केली जात आहे. त्यांना जनधनप्रमाणेच 5 हजार ओव्हरड्राफ्टची लिमिट वापरता येईल. यापुढे कोणत्याही सावकाराकडे हात पसरण्याची गरज नाही. 
 


पुढे म्हणाले, मुलींचे आयुष्य वाचवण्यापासून त्यांचे शिक्षण आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी सरकारने मोठी पाऊल उचलली आहेत. पण फक्त सरकारी योजना आवश्यक नाहीत तर सामाजिक विचार बदलणेही गरजेचे आहे. यामध्ये महिलांची भूमिका खूप महत्वाची आहे. मुस्लिम महिलांसाठी तीन तलाकविरोधी कायदा करण्यात आला. आता या कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम तुम्हा महिलांना करायचे आहे.

 
तुम्ही सर्वांना चांद्रयानाविषयी सर्व माहिती आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी मोठे लक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण यामध्ये एक मोठी अडचण आली. मी काल रात्रीपासून त्यांच्यासोबत होते. ते सर्व भावूक होते. पण त्यांच्या एक विश्वास होता. यामधून शिकून ते पुढे चांगले काम करण्यासाठी तयार होते. याच विचाराने देशाला पुढे नेले जाऊ शकते. मला विश्वास आहे की, 2022 मध्ये आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करू तोपर्यंत आपण घेतलेले सर्व संकल्प पूर्ण होतील. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला स्वतःचे घर देण्याच्या लक्षाकडे आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत.


आतापर्यंत देशातील गाव आणि शहरात एक कोटी 80 लाख घर उभारण्यात आले आहे. लाभार्थी त्यामध्ये राहण्यासाठी गेले आहेत. पहिलेही या योजना होत्या. मात्र आम्ही घर नाही तर आम्हाला तुमच्या स्वप्नातील घर बनवायचे होते. येथे सर्व सुविधा उपलब्ध हव्या होत्या. आम्हाला काही तरी चांगले करण्याची गरज होती. कमी काळात जास्त सुविधा देणे हे आमचे उद्दीष्ट होते. आम्ही घराची निर्मिती करताना स्थानिक लोकांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेतल्या. घरात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असाव्या यासाठी आम्ही विविध सरकारी योजनांचा यामध्ये समावेश केला. हे घर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे बनावे यासाठी आम्ही तुमच्या गरजा ओळखल्या. तसेच निर्माण प्रक्रियेतही वाढ करण्यात आली.ज्या लोकांना स्वतःचे घर खरेदी करायचे होते. त्यांनाही आम्ही होम लोनसाठी दीड लाख रुपयांच्या कर्जावर सूट दिली. पैशांचे डायरेक्ट ट्रान्सफर केल्यामुळे कुठेही काहीच घोटाळा झाला नाही. पारदर्शीपणा आला. सरकारने रेरा कायदा आणू घर खरेदी करणाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. गेल्या 5 वर्षात स्वच्छते पासून तर सर्व योजनांमध्ये तुम्हा सर्वांनी योगदान दिले आहे. येणाऱ्या 5 वर्षात जे संकल्प घेण्यात आले आहे. त्यासाठीही मला तुमच्यावर विश्वास आहे. असे म्हणत त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.