आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतूरला आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/परतूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी परतुरात प्रचार सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याची सध्या जोरदार तयारी केली आहे. विशेषत: सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस विभाग तयारी करत आहे. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत अँटी ड्रोनसह इस्रायलहून खास पथकही सुरक्षेसाठी आहे. शिवाय, पोलिस दलातील विविध शाखांचे राज्यस्तरावरील प्रमुख अधिकारीही परतुरात दाखल झाले आहेत. पोलिस अधीक्षक एस. चैतन्य हेही दोन दिवसांपासूून परतुरात तळ ठोकून होते. त्यांनी कडक बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सभेच्या दहा किलोमीटर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामीटर आदींना प्रवेश व उड्डाणबंदी करण्यात आली. पंतप्रधान जिल्ह्याच्या ठिकाणी येणार असल्यामुळे त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था, प्रचार सभेत कुणी विरोधकांनी गोंधळ घालू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना विशेष काळजी घ्यावी लागते. सभास्थळी सुरक्षेसाठी खास इस्रायलहून विशेष पथक सुरक्षा व्यवस्थेत असणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून दिली. पोलिस दलाने विशेष वाहनाची व्यवस्था केली आहे. या वाहनाने ते सभास्थळी पोहोचतील. त्यांच्या मदतीला दुभाषी म्हणून पोलिस कर्मचारी दिले आहेत. शिवाय त्यांना सभास्थळी टेंट, इन्व्हर्टर यासह इतर आवश्यक साहित्य पुरवण्याच्या सूचना आहेत. परतूर येथे नरेंद्र माेदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारणीचे काम केले आहे. सभेच्या दृष्टिकाेनातून पोलिस दलातील विविध शाखांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सभेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

सभेची तयारी पूर्ण, मुख्यमंत्रीही येणार
परतूर शहराच्या इतिहासात प्रथमतःच देशाचे पंतप्रधान सभेच्या निमित्ताने येणार असून, शहरातील साई मंदिराच्या जवळील वैष्णव यांच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेची तयारी आज पूर्ण झाली. सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार असून, सभेला तब्बल सव्वा लाखाहून अधिक लोकांच्या अपेक्षित उपस्थितीचा अंदाज घेत आसन व्यवस्था केल्याचे राहुल लोणीकर यांनी सांगितले.

कार्यक्रम संपेपर्यंत १४४ कलम लागू
पंतप्रधान नरेंद्र मोदी परतूर शहरातील मैदानावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर परिसर व हेलिपॅड यांच्या सभोवती किमान १० किलोमीटरपर्यंत अंतरावर ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाइट, एअरक्रॉफ्टस, प्रायव्हेट हेलिकाॅप्टर्स, पॅरामीटर व हॉट एअर बलुन्स व तत्सम हवाई साधने उड्डाण, प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी २ वाजेपासून ते १६ ऑक्टोबर कार्यक्रम संपेपर्यंत सदरील परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.