आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी राज्यातील पहिलीच सभा जळगावात घेत आहेत. त्यांच्या सभेसाठी थेट विमानतळाच्या गेटसमाेर असलेल्या एका खासगी कंपनीच्या पटांगणात सभामंडप उभारण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या विविध राजकीय सभांपैकी या सभेसाठी प्रथमच या जागेचा वापर केला जात असल्याने ही सभा वेगळी ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची या निवडणुकीतील राज्यातील पहिलीच सभा जळगावात हाेत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पहिलीच सभा पारंपरिक मैदानाशिवाय नवीन मैदानावर हाेत आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारासमाेर असलेल्या भारत फाेर्ज या कंपनीच्या प्रांगणात ५० हजार आसन क्षमता असलेला सभामंडप उभारण्यात आला आहे. माेदींची पहिलीच सभा हाेणार असल्याने ही नवीन जागा चर्चेत आली आहे. सकाळी ११ वाजता या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र माेदी उपस्थित राहणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून या कंपनीच्या प्रांगणात सभेची तयारी सुरू हाेती. मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस या सभेसाठी येणार आहेत. पंतप्रधान हाेण्यापूर्वी नरेंद्र माेदी दाेन वेळा जिल्ह्यात आले हाेते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयाेजित शिवतीर्थ येथील मैदानावर ते उपस्थित हाेते. तर २०१४च्या लाेकसभा निवडणुकीत भुसावळ राेडवरील टीव्ही टाॅवरजवळ झालेल्या सभेत त्यांनी उपस्थिती दिली हाेती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत एरंडाेल येथे तर आता विमानतळासमाेरील मैदानावर त्यांची सभा हाेणार आहे.
सभास्थळावर कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त
पंतप्रधान माेदी हे भाजपच्या प्रचारासाठी रविवारी जळगावात येत आहेत. सभेच्या ठिकाणी व विमानतळ परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच विशेष खबरदारी म्हणून सभेचे ठिकाण व विमानतळ परिघातील दहा किमीच्या अंतरापर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स, पॅरामोटर्स व हॉट एअर बलुन्स व तत्सम हवाई साधने उड्डाणास व प्रवेशास बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. १२ ऑक्टोबर रोजी २ वाजेपासून ते १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ प्रमाणे कारवाई हाेईल, असे पत्रकात म्हटले आहे.
सभेमुळे वाहतूक मार्गात केले बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रविवारी विमानतळ परिसरात होणार आहे. शहर, जिल्ह्यातील वाहतुकीचे नियमन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीच्या मार्गांत तात्पुरते बदल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी अधिसूचना काढून ही माहिती दिली आहे. जळगाव शहरातून अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी (ता.जामनेर) (जामनेर, पहूर, औरंगाबादकडे जाणारी व येणारी वाहने) मार्ग रविवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अवजड वाहनांना तर हलक्या वाहनांना सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे.
जळगावात गाजलेल्या सभा :
जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान, सागर पार्क, मणियार ग्राउंड आणि भुसावळ रस्त्यावरील टीव्ही टाॅवर येथे राजकीय सभा झाल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, गाेपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, नितीन गडकरी, राज ठाकरे या प्रमुख दिग्गज नेत्यांच्या सभा गाजल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.