आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० कोटी लोकांसाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा उद्या श्रीगणेशा; आठ हजार रुग्णालयांशी करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- झारखंडची राजधानी रांचीत रविवारी देशव्यापी पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा (पीएम-जय) शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याची सुरुवात होईल. त्यामुळे देशातील १० कोटी ७४ लाख कुटुंबांना ५० कोटींहून जास्त लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे संरक्षण मिळेल. देशातील सर्वात मोठ्या लाेकसंख्येला लाभ पोहोचवणारी ही योजना असेल. त्यामुळे लाभार्थींना सरकारी व खासगी अशा दोन्ही रुग्णालयांत मोफत उपचार मिळतील. त्यासाठी राज्यांनी खासगी रुग्णालयांशी करार केला आहे. 


राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश अरोरा म्हणाले, भविष्यात २० हजार रुग्णालयांशी करार केला जाईल. हेल्पलाइन नंबर-१४५५५ व मेरा. पीएमजय. कॉम या संकेतस्थळावर लाभार्थींची यादी मिळू शकेल. दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक, सामाजिक-आर्थिक व जाती स्तरावरील जनगणनेतील यादीत समाविष्ट लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यादीतील रुग्णालयांनी सेवा देण्यास नकार दिल्यास लाभार्थी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार करू शकतात. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. 


पंतप्रधान जन आरोग्य योजना : तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल असे सर्व 


कोणास : एईसीसीच्या यादीत समाविष्ट लोक 
ग्रामीण :
एक खोलीचे कच्च्या भिंतीचे घर, कच्चे छत. घरात १६ ते ५९ वयोगटातील सदस्य नसावा. कुटुंबप्रमुख महिला असावी. वरील वयोगटातील पुरुषही घरात नसावा. घरात दिव्यांग व्यक्ती असावेत. एससी- एसटी, भूमिहीन, बेघर इत्यादी निकष. 
शहर : कचरावेचक, भिकारी, घरगुती नोकर, फेरीवाले, बांधकाम मजूर, हातमाग मजूर, वाहतूक कामगार-उदाहरणार्थ- वाहक, चालक, मदतनीस, रिक्षावाले, दुकानात काम करणारे, वेटर, अटेंडंट, छोट्या कार्यालयातील चपराशी, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, धोबीकाम करणारे, चौकीदार इत्यादी. 


मुख्य आजार, लाभार्थी रुग्णांना योजनेत उपचार करता येणार 
बायपास शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॉर्नियल ग्राफ्टिंग, ग्लुकोमा शस्त्रक्रिया, ऑर्थोप्लास्टी. छातीतील फ्रॅक्चर, युरॉलॉजिकल शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रसूती, अॅपेंडिक्स, हर्नियाची शस्त्रक्रिया, डायलिसिस, स्पाइन शस्त्रक्रिया, ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया, नवजात मुलांमधील उत्सर्जनासंबंधी उपचार, कर्करोगात किमोथेरपी व रेडिआेथेरपी, ल्युकेमिया शस्त्रक्रिया. 


कसे : आयुष्यमान मित्र मदत करतील, आेळखपत्र गरजेचे 
सरकारी व करारांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत उपचार करता येऊ शकेल. रुग्णालयांत उपस्थित आयुष्यमान मित्र लाभार्थीस त्यांचे नाव योजनेस पात्र आहे किंवा नाही सांगतील. मेरा. पीएमजय. कॉम या संकेतस्थळाहून संदेश आल्यानंतर आेळखीची पडताळणी केली जाईल. आधार किंवा इतर छायाचित्राचा पुरावा सादर करावा लागेल. 


काय : १३५० प्रकारच्या तपासण्यांसह अनेक शस्त्रक्रियाही मोफत 
लाभार्थीस १३५० प्रकारच्या तपासण्यांसह आरोग्य प्रक्रिया मोफत करता येऊ शकेल. विम्यापूर्वीचा आजारही याेजनेत समाविष्ट केला जाईल. रुग्णालय, सरकार व विमा कंपन्यांमधील दुवा म्हणून आयुष्यमान मित्र काम करतील. लाभार्थी कुटुंबातील नवीन सदस्य उदाहरणार्थ विवाहानंतर आलेली महिला किंवा नवजातालाही लाभ मिळेल. महिलेस विवाह प्रमाणपत्र व मुलाचे जन्म प्रमाणपत्र दाखवावे लागेल. 


आव्हान : २०११ नंतर गरीब झालेल्यांना लाभ नाही 
एसईसीसी डेटा-२०११ च्या स्थितीनुसार तयार करण्यात आला आहे. गत सात वर्षांत आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या लोकांना पुढील जनगणनेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. विशेष परिस्थितीसाठी प्रत्येक राज्याला विशेषाधिकार आहेत. पंचायतीपासून जिल्हाधिकारी स्तरापर्यंत यादीत नवीन नावे समाविष्ट केले जाऊ शकतात. 


कुटुंबाला लाभ 
गुजरात ४४.८५ लाख 
छत्तीसगड ३७.२९ लाख 
महाराष्ट्र ८३.६३ लाख 
पंजाब १४.९६ लाख 
राजस्थान ५९.७१ लाख 
हरियाणा १५.५१ लाख 
झारखंड २८.०६ लाख 
मध्य प्रदेश ८३.८१ लाख 
हिमाचल २.७७ लाख 
बिहार १.०८ कोटी 


राजकारण : भाजपची व्होट बँकेवर नजर, पण काही राज्यांचा अडथळा 
रालोआ सरकार निवडणुकीवर डोळा ठेवून योजना लागू करत आहे. आेडिशा सरकारने नवीन आरोग्य विम्याची घोषणा करून पीएमजय योजनेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. दिल्लीने उत्तर दिले नाही. तेलंगणात सरकार नसल्याने, तर केरळमध्ये पुराचा परिणाम होत असल्याने निर्णय झाला नाही. पंजाबमध्ये स्थानिक निवडणूक असल्यामुळे अंमलबजावणी टाळली. 

बातम्या आणखी आहेत...