पंतप्रधानांच्या विमानास अमेरिकेसारखी / पंतप्रधानांच्या विमानास अमेरिकेसारखी सुरक्षा, भारत 1356 कोटी रुपयांत खरेदी करणार 

Feb 08,2019 09:55:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या धर्तीवर भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपतींना हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रसज्ज सुरक्षा मिळणार आहे. करारानुसार भारत अमेरिकेकडून दोन बोइंग खरेदी करणार आहे. अमेरिका व भारत यांच्यात यासंबंधीच्या एका करारास मान्यता मिळाली आहे. शत्रूच्या कोणत्याही हालचालींना टिपण्याची क्षमता या विमानातील अत्याधुनिक प्रणालीत आहे. त्यामुळे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या सुरक्षा खऱ्या अर्थाने कडेकोट होणार आहे.

अमेरिकेच्या प्रशासनाकडून या व्यवहारास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानुसार भारताला दोन बोईंगची विक्री केली जाणार आहे. असे विमान केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडेच आहे. भारत-अमेरिका यांच्यातील परराष्ट्र संबंधाला बळकट करण्याच्या दृष्टीने देखील हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. उभय देशांतील हा संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा करार म्हणून याकडे पाहिले जाते. लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काउंटरमेझर्स (एलएआयआरसीएम) व सेल्फ-प्रोटेक्शन सुएट््स (एसपीएस) असे संरक्षण क्षेत्रातील प्रणालीची नावे आहेत. बुधवारी काँग्रेसमध्ये या व्यवहाराबद्दलचा तपशील देण्यात आला. त्याला ट्रम्प प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे.

भारताने अमेरिकेकडे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीची मदत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी एलएआयआरसीएम व एसपीएस प्रणालीसाठी अर्ज दाखल केला होता.

दुसरीकडे उभय देशांतील व्यवहार सुमारे १३५७ कोटी रुपयांत होणार आहे. दोन क्षेपणास्त्रसज्ज विमाने पंतप्रधान व राष्ट्रपतींना अधिक सुरक्षा प्रदान करणारा ठरेल. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा देखील विकास होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यापूर्वी देखील अमेरिकेसोबत अशा प्रकारचा करार झाला होता.


X