आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधान्यक्रमाने राजूर तालुक्याची पहिल्या टप्प्यात लागू शकते वर्णी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजूर- राजूर गाव तीर्थक्षेत्र असून वर्षाला लाखो भाविक या ठिकाणी दाखल होतात. यासह तालुक्यासाठी लागणाऱ्या ४० निकषांतही पात्र आहे. हे गाव तालुका व्हावेच, अशी सर्व स्तरातून मागणी आहे. यासाठी आंदोलने, निवेदनेही झाली आहेत. मात्र शासनाने याची नोंद घेतल्याचा पुरावा राजूरकरांकडे नव्हता. राजूर हे गाव शासनाच्या तालुका प्रतीक्षा यादीत ४५ व्या क्रमांकावर असल्याचे तालुका संघर्ष समितीने शासनाकडून मागवलेल्या माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. यामुळे आता राजूरसह परिसरातील ७० गावांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील राजूर महाराष्ट्रासह देश, विदेशात राजुरेश्वरामुळे प्रसिद्ध आहे.

 

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी संकष्टी तसेच अंगारकी चतुर्थीला दहा लाख भाविक या ठिकाणी दाखल होतात. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १५९ गावांचा समावेश आहे. सर्वात मोठा तालुका म्हणून गणल्या जात आहे. मोठा तालुका असल्यामुळे सर्वसामान्यांच्या कामांना वेळ लागत आहे. राजूर तालुक्याची सात ते आठ वर्षांपासून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आदींची मागणी आहे. भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या तिन्ही तालुक्यांतील ७० गावांना राजूर हाकेच्या अंतरावर आहे. हे गाव तालुका व्हावे म्हणून परिसरातील १०० गावांनी ग्रामपंचायतीचे ठरावही घेतलेले आहेत.

 

आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीत सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका कृती समिती यांनी मागणी तीव्र करण्यासाठी रास्ता रोको, उपोषण, धरणे असे विविध प्रकारचे आंदोलने केली आहेत. तालुका होण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर कायम मागणी केली जात आहे. मात्र, याची नोंद शासनाने घेतली की नाही या बाबत कृती समिती तसेच आंदोलकांनाही नव्हती. सध्या शासनाकडे महाराष्ट्रातून ११४ गावांनी तालुका होण्यासाठी मागणी केलेली आहे. शासनाने तालुक्याची मागणी केलेल्या गावांची गरजेप्रमाणे क्रमवारीनुसार यादी तयार केलेली आहे. महसूल विभागाने तयार केलेल्या क्रमवारी यादीत राजूरचे नाव ४५ व्या क्रमांकावर आहे. तालुक्याच्या उंबरठ्यावर राजूर येऊन पोहोचल्याचे दिसत असल्याने नागरिकांच्या आशा परत पल्लवित झाल्या आहेत. ही बाब राज्य तालुका कृती समितीने मागवलेल्या माहिती अधिकारातून समोर आली आहे.

 

शासनाने तालुक्याच्या मागणीच्या यादीत राजूरचे नाव घेतल्याने आता मागणीला पुन्हा जोर येणार असून तालुका निर्मितीच्या हालचाली झाल्यास प्राधान्यक्रमाने राजूर तालुका होण्याच्या पहिल्या दहाच्या यादीत येऊ शकतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी विशेष लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. राज्यस्तरीय तालुका कृती समितीचे अध्यक्ष मोहम्मदी मशहूद मुगीस यांनी माहितीच्या अधिकारामध्ये संभाव्य तालुक्यांची नावांची माहिती मागितली होती. या मागणीच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी भार. र. पाटील यांनी तालुक्यांची यादी व पत्र नुकतेच मोहम्मदी मुगीस यांना पाठवले आहे.गणपती मंदिर हे राजूरचे मुख्य आकर्षण असून वर्षाला दहा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी येतात, असा विश्वस्तांचा दावा आहे.

 

शासनाकडे तालुका निर्मितीच्या प्रतीक्षेत ११४ गावे
गावाचे रूपांतर हे तालुक्यात व्हावे म्हणून राज्यातील अनेक गावांनी मागणी केलेली आहे. मात्र, शासनाकडे प्राधान्यक्रम असलेल्या ११४ गावांची नावे आहेत यामध्ये तालुका निर्मितीच्या प्रतीक्षा यादीत राजूरचे स्थान ४५ व्या क्रमांकावर आहे. जवळपास पंधरा वर्षांपासून राज्यात तालुकानिर्मिती झालेली नाही. शासनाने याबाबत आता विचार केल्यास प्राधान्यक्रमाने इतर महत्त्वाच्या गावांसह राजूरचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

 

तालुक्यासाठी संघर्ष सुरू 

महाराष्ट्रातील प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यांची घोषणा सरकारने तत्काळ करावी, शासनाला विचाराधीन असणाऱ्या तालुक्यांची माहिती मी, माहितीच्या अधिकारांमध्ये मागवली होती. शासनाने या बाबतची माहिती नुकतीच मला पाठवली आहे. शासनाने पाठवलेल्या यादीत महाराष्ट्रातील ११४ गावांची क्रमवारीनुसार नावे आहेत. जालना जिल्ह्यातील राजूरचा ४५ वा क्रमांक आहे.

- मोहम्मदी मशहूद मुगीस, अध्यक्ष, राज्यस्तरीय तालुका कृती समिती.

बातम्या आणखी आहेत...