पुणे / कारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात

पोलिसांची  होणार रक्तगट, ब्लड प्रेशर, शुगर, हिमाेग्लाेबीन, डाेळे-नाक तपासणी

विशेष प्रतिनिधी

Jun 20,2019 09:39:36 AM IST

पुणे - राज्यातील विविध कारागृहांत माेठ्या प्रमाणात शिक्षा झालेले व शिक्षेची सुनावणी सुरू असलेले कच्चे आणि पक्के कैदी आहेत. त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेऊन कारागृहातील सुरक्षा याेग्य राखण्याकरिता सुमारे पाच हजारपेक्षा अधिक कारागृहातील अधिकारी व कर्मचारी राज्यभरात कार्यरत आहेत. कैद्यांच्या वेगवेगळया कल्याणकारी याेजना दरवेळी प्रशासनाकडून राबवल्या जातात. परंतु यापुढील काळात वेगवेगळया आजाराने ग्रस्त, वजन वाढलेले आणि शारिरिक तंदुरुस्ती नसलेल्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्लीम करण्यासाठी कारागृहाचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक सुनील रामानंदन यांनी कंबर कसली आहे. यापुढे काेणत्याही कारागृहातील अधिकारी, कर्मचारी ढेरपाेट न दिसता स्लीम हाेण्याच्या दृष्टीने सर्वांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.


महाराष्ट्र कारागृह विभागात एकूण नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, एक खुली वसाहत आणि १७२ उपकारागृहांचा समावेश आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची ३० जूनपर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तगट चाचणी, उच्च रक्तदाब , शुगर, हिमाेग्लाेबीन, डाेळे-नाक तपासणी करून त्याबाबतचा एक अहवाल तयार केला जाणार आहे. नागपूर, पुणे, आैरंगाबाद, मुंबई या विभागांच्या कारागृह अधीक्षकांचा व्हिडिआे काॅन्फरन्स घेण्यात येत असून ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वजन जास्त आहे, विविध आजारांनी ग्रस्त पोलिसांना तब्येत सुधारण्यासाठी दृष्टीने तज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली
तंदुरुस्तीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष्य नसल्याने त्यांना दरराेज पीटी व ड्रील मैदानावर करावे लागणार असून दर शुक्रवारी कारागृह मुख्यालयात परेड घेतली जाणार आहे. कैद्यांच्या सहवासात काम करावे लागत असल्याने कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली दिसून येत आहे. चिडचिडेपणा, नकारात्मकता या गाेष्टीमुळे पूर्ण क्षमतेने ते काम करू शकत नाहीत. आराेग्य सुविधांकडे लक्ष देऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांना कणखर बनवल्यास त्यांची कार्यक्षमता वाढू शकेल, असा विश्वास कारागृहाचे अतिरिक्त पाेलिस महासंचालक सुनील रामानंदन यांनी व्यक्त केला आहे.

X
COMMENT