आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कारागृहातील २ कच्च्या कैद्यांची 'पक्की' शक्कल; मानवी मनाेऱ्याने १५ फूट उंच भिंतीवर चढले, उडी घेऊन पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - जिल्हा कारागृहात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात बंदी असलेल्या दोन कच्च्या कैद्यांनी बुधवारी सकाळी ६.१५ वाजता १५ फूट उंच भिंतीवरून उडी घेऊन पलायन केले. हे कैदी तीन महिन्यांपासून कारागृहात होते. बराकीतून स्वयंपाकासाठी बाहेर अाले असता कारागृह रक्षकांची नजर चुकवून ते मानवी मनाेरा तयार करून पसार झाल्याचा अंदाज अाहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपुरे मनुष्यबळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू अाहे. 

 

शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा. बिलवाडी, ता. जामनेर) व रवींद्र भीमा माेरे (वय २९, रा. बोदवड) असे पसार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघे जण पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले अाराेपी अाहेत. ४ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्यावर स्वयंपाक करण्याची जबाबदारी साेपवण्यात अाली होती. बुधवारी पहाटे ५.३० वाजता नेहमीप्रमाणे शेषराव व रवींद्र यांच्यासह ११ कैद्यांना स्वयंपाक तयार करण्यासाठी कारागृहातील बराकीतून बाहेर काढण्यात आले होते. बाळू उत्तम बोरसे व वासुदेव हिरामण सोनवणे हे दोन कारागृह रक्षक त्यांच्यावर पहारा देत होते. सर्वजण किचनमध्ये असताना सकाळी ६.१५ वाजता शेषराव व रवींद्र हे सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून मागच्या बाजूस गेले. तेथून १५ फूट उंच भिंतीवर चढून त्यांनी बाहेरच्या बाजूस उडी मारून पलायन केले. काही वेळातच ही बाब उघडकीस आली. कारागृह रक्षकांनी कैद्यांची मोजणी केली असता दोन जण कमी असल्याचे समोर आले. सकाळी ७.१५ वाजता सायरन वाजवून इतर रक्षकांना अलर्ट करण्यात आले. रक्षकांनी कारागृहाच्या आत व बाहेर तपासणी केली; परंतु दोघे कैदी मिळून आले नाही. या प्रकरणी बाळू बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे. 

 

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अाेढवली नामुष्की 
कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे रविवारपासून पुण्यात मिटिंगसाठी गेले होते. ते बुधवारी सकाळी ९ वाजता कारागृहात परतले. तत्पूर्वी त्यांनी बी. एस. भोयाळ या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपवला होता. वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनील कुवर हे कारागृहात ड्यूटीवर असताना त्यांना पदभार दिला नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कनिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार गेला. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी कुवर यांची असल्याचे वांढेकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे सूर अाहे. 

 

मनुष्यबळ ताेकडे 

मंगळवारी रात्री कारागृहात ४५८ कैदी होते. त्यांच्यावर पहारा देण्यासाठी चार रक्षक होतेे. जळगाव उपकारागृहात २०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे; प्रत्यक्षात अडीच पट कैदी असतात. चार अधिकारी व ३४ कर्मचारी असा एकूण स्टाफ आहे. कमी मनुष्यबळ असल्यामुळे कैद्यांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. शासनाकडे मागणी करूनही मनुष्यबळ वाढवले जात नसल्यामुळे कर्मचारी त्रस्त अाहेत. 

 

सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत : 

कारागृहात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील कैदी आहेत. त्या मानाने सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे. संरक्षण भिंतीची उंची खूप कमी आहे. बाहेरच्या बाजूस पथदिवे, हायमास्ट लॅम्प नाहीत. शिवाय मागच्या बाजूस सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेले नाहीत. त्यामुळे त्या बाजूच्या हालचाली टिपता येत नाहीत. मागच्या बाजूला पळून जाण्यासाठी जागा असून प्रचंड अस्वच्छता असून, निर्मनुष्य परिसर अाहे. 

 

अशी लढवली शक्कल 
स्वयंपाकगृहाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या संरक्षण भिंतीची उंची १५ फूट आहे. कैद्यांनी अंघोळीचा रुमाल, पॅण्ट किंवा आसारीच्या साह्याने मानवी मनोरा तयार करून सुरुवातीला एक जण भिंतीवर चढला असेल. यानंतर त्याने रुमाल किंवा कापडाच्या साह्याने दुसऱ्याला ओढले असावे. त्यानंतर बाहरेच्या बाजूला माती असल्यामुळे थेट उडी मारून पलायन केले असेल. पळून गेलेल्या दोन्ही कैद्यांची पादत्राणे कारागृहाच्या आतल्या बाजूस भिंतीच्या शेजारीच मिळून आली. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका कैद्याने कारागृहातून पलायन केले होते. काही महिन्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली होती. हा कैदी सध्या जामिनावर मुक्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...