आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पुन्हा हेच सरकार आले तर अर्थव्यवस्थेची वाट लागेल - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘अनेक नेते पक्षांतर करून काँग्रेसमधून इतर पक्षांत जात असले तरी ते कोणत्या कारणामुळे जात आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत अशा नेत्यांना भाजप घेत आहे. आता जनतेनेच विचार करून अशा भ्रष्टाचारी नेत्यांना पुन्हा निवडून द्यायचे का याचा निर्णय घेतला पाहिजे, भ्रष्टाचार करणारा कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,’असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. भाजप सरकारचे विकासाचे सर्व आकडे फसवे असून, पुन्हा हेच सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यास अर्थव्यवस्थेची वाट लागेल,’ असे भाकीतही त्यांनी चव्हाण यांनी वर्तवले. प्रश्न : मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेतून प्रचाराला सुरुवात केलीय. भाजपला किती फायदा होईल? चव्हाण : खरे तर मुख्यमंत्र्यांनी अशी यात्रा काढणे याेग्यच नाही. त्यांनी पाच वर्षांत काहीच काम केलेले नाही. फक्त फसवे आकडे मांडले. नाेकऱ्या, परकीय गुंतवणूक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मात्र हे लपवून ठेवण्यासाठीच ही यात्रा काढलीय. निवडणुकीनंतरच कळेल की यात्रेचा त्यांना किती फायदा झाला आहे. सरकार कसे अयशस्वी ठरले ते हल्लाबोल यात्रेतून आम्ही सांगतच आहोत.जर जनतेने पुन्हा त्यांनाच निवडून दिले तर मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची संपूर्णत: वाट लागेल. शेतकरी संपेल, बेरोजगारी वाढेल आणि प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र शेवटच्या क्रमांकावर जाईल. प्रश्न : परकीय गुंतवणूक आणि रोजगारात राज्य अव्वल असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहेत... चव्हाण : हे सरकार फक्त फसवी आकडेवारी देत आहे. बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक आहे, असा एनएसएसओचा अहवाल आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीत ताे नाकारला, परंतु पुन्हा सत्तेवर येताच ३१ मे रोजी स्वीकारला. मुद्रा योजनेत फक्त २०% लाभार्थींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यात त्यांना जे कर्ज मिळाले ते कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पुरेसे नाही. एनएसएसओच्या अहवालात ही माहिती असून सरकारने हा अहवाल दाबून ठेवला आहे. वाहन उद्योगाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पार्ले कंपनीत १० हजार नाेकर कपातीची भीती आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये मेक इन महाराष्ट्रात ३० लाख रोजगार तर फेब्रुवारी २०१८ च्या मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये ३६ लाख रोजगाराचा दावा करण्यात आला. आता मुख्यमंत्री ६० लाख रोजगार दिल्याचे सांगत आहेत. पण हे रोजगार आहेत कुठे?    प्रश्न : मंदीचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम हाेईल? चव्हाण : अमेरिका-चीन आणि इराण यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. याचा फायदा आपण मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतो. पण आपण ते करण्यात कमी पडलाे. ही मंदी आपण स्वतः निर्माण केलेली आहे. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा हा परिणाम आहे. जीएसटी १८ टक्क्यांच्या वर नको असे आम्ही अगोदरच म्हटले होते, परंतु आमचे ऐकले नाही.   प्रश्न : १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटी दिले तर आम्ही ५ वर्षांत ५० हजार कोटींची मदत केली, असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. चव्हाण : आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना खरी मदत केली. तेव्हा बाजारभाव हमी भावापेक्षा कमी नसल्याने धान खरेदी करण्याची वेळ सरकारवर आली नव्हती. खरे तर सरकारने एक दाणाही खरेदी करणे योग्य नाही. बाजारभाव हा हमी भावापेक्षा जास्त असलाच पाहिजे. परंतु हे सरकार त्यात अयशस्वी ठरले आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांचे धान खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा मदतीचा आकडा फुगवून सांगितला जात आहे. 

प्रश्न : सरकारच्या कामगिरीकडे कसे बघता?
चव्हाण : हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज प्रत्येक रस्त्यावर खड्डे दिसतात. या परिस्थितीत ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ असे बोलायला जीभ तरी कशी उचलते यांची? प्यायला पाणी मिळत नाही. सप्टेंबरमध्येही टँकरची गरज भासते, मग जलयुक्त शिवारचे काम झाले कुठे? पुरातही सरकार नागरिकांना मदत करू शकले नाही. 

प्रश्न :  प्रचारात तुमचा भर कशावर असणार?
चव्हाण : बेरोजगारी, कमकुवत अर्थव्यवस्था आणि शेतकरी समस्या हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाऊ. 

प्रश्न : भाजपच्या देशप्रेमाच्या मुद्द्यापुढे तुमचे मुद्दे टिकतील का? 
चव्हाण : राज्यातील निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना स्थान द्यायचे असते. त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्न घेणार आणि त्यासाठी जनतेसमोर जाऊन मते मागणार. त्यांनी (भाजपने) मात्र भावनिक प्रश्न निर्माण केले आहेत. शेती, उद्योग, बेरोजगारी सोडून ते कलम ३७० आणि अन्य देशप्रेमाचे मुद्दे समोर आणत आहेत. आम्ही ‘३७०’चे वास्तव सांगून भाजप सरकार कशी दुटप्पी भूमिका घेतेय ते लाेकांना सांगू. धार्मिक ध्रुवीकरण हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान असे त्यांचे मुद्दे असले तरी जनतेने आपल्याला काय हवे याचा विचार करून मतदान केले पाहिजे.

प्रश्न : काँग्रेसला गळती लागल्याने त्याचा निवडणुकीत किती फटका बसेल? 
चव्हाण : काहीच नाही. जे गेले त्यांच्या जागी आम्ही दुसरे उमेदवार देणार आहोत. खरे तर ही निवडणूक विचारांची आहे. झुंडशाही, हुकूमशाही, धार्मिक ध्रुवीकरण याकडे जाण्याचा विचार जर मतदारांनी केला तर सांगता येत नाही. आम्हाला नेते नव्हे, जनता हवी आहे. मतदार विचारांवर मते देतील याची खात्री आहे. चेहऱ्यावर नाही.

प्रश्न : काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आता यातून सुटण्यासाठी भाजपमध्ये जात आहेत असे म्हणता येईल का?
चव्हाण : नेत्यांनी कुणाच्यया काळात भ्रष्टाचार केला हे महत्त्वाचे नाही. तर ते भ्रष्ट आहेत की नाहीत हे महत्त्वाचे आहे. जे नेते भाजपमध्ये जात आहेत त्यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. ज्या मतदारांनी त्यांना आमच्याकडे असताना मते दिली तेच मतदार आता त्यांना मतदान करताना विचार करतील. मात्र प्रत्येक भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.

प्रश्न : वंचितसाेबत तुमची आघाडी का झाली नाही?
चव्हाण : वंचितला आमच्यासोबत यायचे होते, परंतु त्यांनी राष्ट्रवादी सोबत नको अशी अट घातली. राष्ट्रवादीची आणि आमची आघाडी अनेक वर्षांपासून आहे. वंचितचा आता उदय झाला आहे. लोकसभेला त्यांच्यामुळे आमचे नुकसान झाले होते त्यामुळे आम्ही त्यांना आता साेबत घेऊ इच्छित होतो. परंतु त्यांची ती पूर्वअट आम्हाला मान्य नाही.

प्रश्न : जागावाटप कधीपर्यंत पूर्ण होईल?
चव्हाण : आमच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी १२५ जागांवर सहमती झाली असून ४१ जागांवर चर्चा सुरू आहे. काही जागांची अदलाबदली करण्याची आवश्यकता असल्याने त्यावरही चर्चा सुरू आहे. ही चर्चा पूर्ण होऊन जागा वाटप अंतिम होईल.

लोकसभा लढवण्याची इच्छा नाही, कराडमधून विधानसभा लढवणार : चव्हाण
मुंबई | उदयनराजे यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आले आहे. येथून उदयनराजे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र चव्हाण यांनी ते फेटाळले आहे. ते म्हणाले, माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी कराडमधूनच विधानसभा लढवणार आहे.