आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्याचं सौंदर्य जपणारं उटणं

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीती सुगंधी

फराळाच्या विविध पदार्थांसाठी जशी दिवाळी प्रसिद्ध आहेे तशीच ती  उटण्यानं केल्या जाणाऱ्या  अभ्यंगस्नानासाठीही. पारंपरिक घरगुती उटण्याचं वर्चस्व निर्विवाद आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी उटणं पूर्वापार वापरलं गेलंय. त्यामुळेच वर्षातून चार दिवस उटणं लावून केल्या जाणाऱ्या स्नानाचं स्वत:चं वेगळं वैशिष्ट्य आहे. केवळ दिवाळीतच नाही तर वर्षभर वापरता येण्यासारखी, त्वचेचं रक्षण करणाऱ्या विविध प्रकारच्या या घरगुती उटण्यांची ही एक झलक... 
 

अभ्यंगस्नानासाठीचं उटणं

साहित्य : मसूर डाळीचं पीठ दोन चमचे, हरभरा डाळीचं पीठ (बेसन) एक चमचा, मुलतानी माती पावडर एक चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, तुळस पावडर पाव चमचा, आवळा पावडर एक चमचा, ज्येष्ठमध पावडर अर्धा चमचा, बदाम तेल दोन चमचे, गुलाबजल अर्धा चमचा, कच्चं दूध आवश्यकतेनुसार.

कृती : वरील सर्व पावडरी चाळणीनं तीन वेळेस चाळून घ्या. त्यानंतर पावडरी आणि पिठं एकत्र करा. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ठेवा. आवश्यकेतनुसार या मिश्रणात गुलाबजल, कच्चं दूध आणि बदाम तेल मिसळून पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण पूर्ण सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या. साबण वापरू नका.
 

ब्रायडल उटणं 

साहित्य : बदाम पावडर दोन चमचे, तांदळाचं पीठ एक चमचा, बदाम तेल एक चमचा, गुलाब पावडर एक चमचा, संत्रा पावडर अर्धा चमचा, दुधात भिजवलेल्या केशराच्या सात ते आठ काड्या, चंदन पावडर दोन चमचे, दही अर्धा चमचा.

कृती : बदाम पावडर, तांदळाचं पीठ, गुलाब पावडर, संत्रा पावडर, चंदन पावडर एकत्र करून चाळणीनं एकदा चाळून घ्या. हे मिश्रण स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवा. नंतर आवश्यकेतनुसार पावडर घेऊन त्यात बदाम तेल, केशर काड्या आणि दही घाला. ही पेस्ट पाच मिनिटं झाकून ठेवा. चेहरा साबण न लावता फक्त स्वच्छ पाण्यानं धुऊन ही पेस्ट चेहरा, मान, गळा, हातावर लावा. चेहऱ्यावरचा हा लेप पूर्ण वाळू द्या. नंतर थंड पाण्यानं धुऊन टाका. साबण लावू नका. बरणीत भरलेली ही पावडर चार ते पाच दिवस टिकते.  
 
 

सुगंधी उटणं

साहित्य : घरची मलई दोन चमचे, दुधात भिजवलेल्या केसराच्या सात ते आठ काड्या, कच्चं दूध दोन चमचे, नारळाचं तेल एक चमचा, बदाम तेल अर्धा चमचा, चंदन पावडर अर्धा चमचा.

कृती : केशराच्या काड्या दुधात पाच ते दहा मिनिटं भिजवून ठेवा. त्यानंतर मलई, कच्चं दूध, नारळाचं तेल, बदाम तेल आणि चंदन पावडर हे सगळं एकत्र करून चेहऱ्यावर अथवा शरीरावर लावू शकता. चेहऱ्यावरचा लेप दहा ते पंधरा मिनिटं राहू द्यावा. तो पूर्ण सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन टाका. साबण वापरू नका. 
 
 

आयुर्वेदिक उटणं

साहित्य : हरभरा डाळीचं पीठ (बेसन) दोन चमचे, मसुर डाळीचं पीठ दोन चमचे, मुलतानी माती एक चमचा, कडुनिंब पावडर अर्धा चमचा, संत्रा पावडर अर्धा चमचा, नागरमोथा पावडर अर्धा चमचा, आंबेहळद पावडर अर्धा चमचा, आवळा पावडर पाव चमचा, अनंतमूळ पावडर पाव चमचा, गुलाब पावडर दोन चमचे, चंदन पावडर दोन चमचे, लिंबाच्या सालीचंी पावडर पाव चमचा.

कृती : वरील सर्व पावडरी एकत्र करून चाळणीनं चाळून घ्या. कोरड्या काचेच्या बरणीत हे मिश्रण भरून ठेवा. जेव्हा उटणं वापरायचं असेल तेव्हा बरणीतलं मिश्रण तीन चमचे घेऊन त्यात कच्चं दूध टाकून पेस्ट करून घ्या. नंतर हे उटणं चेहऱ्यावर लावा. लेप पूर्ण सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या. साबण लावू नका.
 

फेअरनेस उटणं

साहित्य : चंदन पावडर एक चमचा, लिंबू रस अर्धा चमचा, गुलाबजल अर्धा चमचा, हळद पावडर पाव चमचा, कच्चे दूध आवश्यकेतनुसार, मुलतानी माती पावडर एक चमचा, संत्रा पावडर एक चमचा.

कृती : वरील सर्व पावडर चाळणीनं तीन वेळेस चाळून घ्या. नंतर हे मिश्रण काचेेच्या बरणीत भरून ठेवा. आवश्यकतेनुसार मिश्रण घेऊन त्यात कच्चं दूध, लिंबू रस, गुलाबजल टाकून पेस्ट तयार करून घ्या. मिश्रण चेहऱ्यावर लावून पूर्ण वाळू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुऊन टाका. बरणीत भरलेली पावडर एक महिन्यापर्यंत टिकू शकते. 
 

मॅजिक उटणं

साहित्य : गव्हाचा कोंडा दोन चमचे, हरभरा डाळीचं पीठ (बेसन) एक चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, गुलाब पावडर दोन चमचे, ताजं दही एक चमचा, चंदन पावडर अर्धा चमचा.

कृती : वरील सर्व पावडर आणि पिठं एकत्र करून स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा. आवश्यकतेनुसार हे मिश्रण वाटीत काढून त्यात ताजं दही आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटं ठेवून नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या. साबण वापरू नका.
 

लेखिकेचा संपर्क : ९७६४६९०९७०

बातम्या आणखी आहेत...