आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचन सुधारणारे मुखवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीती सुगंधी

दिवाळी म्हणजे रसना तृप्त करणाऱ्या पदार्थांची रेलचेल. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या प्रत्येक दिवशी करायच्या विशेष मेनूचं तुमचं नियोजन एव्हाना तयार असेल नाही? सणाच्या आनंदात दोन घास जास्त जेवण होतं. फराळावरही उभा-आडवा ताव मारला जातो. मात्र नंतर हेच भोजनप्रेम आरोग्याला हानिकारक ठरतं. आणि म्हणूनच दिवाळीतलं साग्रसंगीत भोजन आणि चमचमीत फराळानंतर गरज असते ती मुखवासाची. अशाच काही पाचक मुखवासांची ही मेजवानी...
 

पोहा मुखवास

साहित्य : पातळ कागदी पोहे दीड वाटी, बडीशेप पावडर दोन चमचे, पिठीसाखर एक चमचा, टुटीफ्रुटी दोन चमचे, खरबूज बीज, रंगीत बडीशेप, धनाडाळ एक चमचा. 

कृती : पोहे सर्वप्रथम भाजून घ्या. बडीशेप, धनाडाळ, खरबूज बीज भाजून घ्या. पोहे मिक्सरमधून जाडसर कुटून घ्या. नंतर बडीशेप पावडर, पिठीसाखर, टुटीफ्रुटी, खरबूज बीज, रंगीत बडीशेप एकत्र करून घ्या. सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. 
 

आवळा मुखवास

साहित्य : ८ ते १० आवळे किसून घ्या. सैंधव एक चमचा, साधं मीठ  एक चमचा, लिंबु रस अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, आमचुर पावडर  एक चमचा, जीरा पावडर दोन चमचे

कृती : प्रथम आवळा किसून घ्या. नंतर त्यात सैंधव, साधे मीठ, लिंबु रस, चाट मसाला, आमचुर पावडर, पिठीसाखर, जीरापावडर एकत्र करुन मिसळून घ्या. उन्हात दोन दिवस सुकवून घ्या. आवळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वाळवून घ्यावे. अन्यथा बुरशी लागू शकते.
 

इन्स्टंट फ्रेश मुखवास

साहित्य : विड्याची पानं पाच ते सात , बडीशेप दोन चमचे, धनाडाळ दोन चमचे, टुटीफ्रुटी तीन चमचे, गुलकंद एक चमचा, खोबऱ्याचा बारीक किस दोन चमचे.

कृती : विड्याची पानं स्वच्छ धुऊन कोरडे करा. ही पानं बारीक चिरुन घ्या. नंतर त्यात बडीशेप, धनाडाळ, टुटीफ्रुटी,रंगीत बडीशेप, गुलकंद, खोबरा किस एकत्र करुन चांगले एकत्र करा. मिसळून घ्या. हा मुखवास एक दिवस टिकतो. साठवून ठेवता येत नाही.  
 

जवस मुखवास

साहित्य : एक कप जवस, एक चमचा साधं मीठ, अर्धा चमचा सैंधव, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा चाट मसाला, दोन चमचे पाणी

कृती : जवस स्वच्छ करून त्यात पाणी टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात साधे मीठ, सैंधव, मीठ लिंबाचा रस चाट मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्या. पंधरा मिनिटं हे मिश्रण तसंच राहू द्या. नंतर जवसात घातलेलं पाणी चाळणीने गाळून घ्या. एका कढईत जवस मंद आचेवर भाजून घ्या. हा मुखवास जास्त दिवस टिकतो. 
 

जिरा गोळी

साहित्य : चार चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा कप पिठीसाखर, दोन चमचे आमचूर पावडर, एक चमचा मॅंगो पावडर, एक चमचा आवळा पावडर, अर्धा चमचा सैंधव, साधं मीठ, एक चमचा खोबरा किस, अर्धा चमचा लिंबाचा रस.

कृती : प्रथम एका बाऊलमध्ये भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, पिठीसाखर, आमचूर, मॅंगो व आवळा पावडर, सैंधव, साधं मीठ, खोबरा किस आणि लिंबू रस एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करून घ्या. मिश्रण व्यवस्थित एकत्र मळून घेऊन त्याची गोळी तयार करा.  अशा प्रकारे तयार केलेल्या गोळ्या थोड्या वाळवून घ्या. वाळलेली गोळी पिठीसाखरमध्ये घोळवून घ्या. काचेच्या बरणीत भरून ठेवा.
 

पान मुखवास

साहित्य : विड्याची बारीक चिरून घेतलेली आठ ते दहा पानं, बडीशेप पावडर दोन चमचे, धनाडाळ दोन चमचे, भाजलेल्या कोथिंबिरीच्या पानांची पावडर तीन चमचे, पिठीसाखर अर्धा चमचा, टुटीफ्रुटी अर्धी वाटी, गुलकंद तीन चमचे, लिंबुसत्त्व एक चमचा, बारीक सुपारी दोन चमचे, खोबरा किस दोन चमचे, बदाम पावडर एक चमचा.

कृती : सर्वप्रथम विड्याची पानं स्वच्छ धुऊन कोरडी करा. नंतर ती पानं बारीक चिरून त्यात बडीशेप पावडर, भाजलेल्या कोथिंबिरीची पावडर, पिठीसाखर, धनाडाळ, टुटीफ्रुटी, गुलकंद, बारीक सुपारी, खोबरा किस आणि बदाम पावडर एकत्र करुन घ्या. हा ओला मुखवास असल्यानं एक दिवसापेक्षा अधिक  टिकत नाही.  
 

लेखिकेचा संपर्क : ९७६४६९०९७०