आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी विमानसेवेतील धक्कादायक बाबी चव्हाट्यावर; ना कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण ना प्रवाशांची सुरक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- २८ जून रोजी मुंबईतील घाटकोपर येथे चाचणीदरम्यान कोसळलेल्या 'यू वाय' कंपनीच्या खासगी विमान अपघाताबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाने स्थापन केलेल्या स्थायी समितीच्या चौकशीत धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. खराब हवामानात विमानाची चाचणी घेण्यास वैमानिक तयार नसतानाही कंपनीने बळजबरीने चाचणी घ्यायला लावल्याचे, चाचणीत सहभागी होण्याची परवानगी नसलेल्या फ्लोअरवरील दोन तंत्रज्ञांना बळजबरीने त्यासाठी पाठवल्याचे, अपघातात दगावलेल्या पाचही कर्मचाऱ्यांची भरतीच बेकायदेशीर असल्याचे व त्यांना कोणतेही विमा संरक्षण दिले नसल्याचे या चौकशीत पुढे आले आहे.

 

एवढा गंभीर गुन्हा घडूनही पोलिस तक्रार टाळण्यात हवाई उड्डाण संचालनालयाने केलेला अक्षम्य हलगर्जीपणा, याबाबत हा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कामगार मंत्रालयाने ही स्थायी समिती स्थापन केली आहे. सध्या देशात ६०० हून अधिक खासगी विमाने वापरली जात असल्याने त्यांची सुरक्षा व देखभाल याबाबतचे मुद्दे गंभीर बनले जात असल्याचा अभिप्राय या समितीने केंद्रीय कामगार मंंत्रालयाकडे दाखल केलेल्या अहवालात नमूद केला आहे. उलटपक्षी या अपघातानंतर न्यायासाठी झगडणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंंबीयांना सदर कंपनी व प्रशासन यांच्याकडून अत्यंत अवहेलना सहन करावी लागल्याचे जबाब समितीपुढे नोंदवण्यात आले आहेत.

 

देशातील खासगी हवाई वाहतुकीची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांचे नियमन, प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याबाबतची चौकशी ही समिती करीत आहे. त्यात घाटकोपरचा अपघात व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खासगी विमानात तीन वेळा निर्माण झालेली बिकट परिस्थिती या घटनांचा विचार करण्यात आला. यात सर्व घटनांमधील व्यक्ती, कामगार मंत्रालय आणि हवाई उड्डाण मंत्रालयांची बाजू समितीने ऐकून घेतली. यातून खासगी कंपन्यांच्या विमानांची दुरुस्ती, देखभाल व उड्डाण अत्यंत असुरक्षित, बेकायदेशीर व अपारदर्शक पद्धतीने होत असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.

 

त्यात पुढे आलेले हे धक्कादायक वास्तव
शेड्यूल्ड, नॉन शेड्यूल्ड व टेस्ट विमानांच्या उड््डाणाच्या नियमनात बऱ्याच त्रुटी
अपात्र कर्मचाऱ्यांवर सक्ती
असुरक्षित विमाने चाचणीसाठी व उड्डाणासाठी वापरण्यात येतात
खराब हवामानात चाचणी घेण्याची सक्ती करण्यात आली
डीजीसीएची अत्यावश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती
फ्लोअरवर काम करणाऱ्या २ तंत्रज्ञांना जबरदस्तीने व बेकायदेशीरपणे विमानात नेले.
डीजीसीएकडून प्रमाणपत्र घेण्यापूर्वी त्याचे चाचणी उड्डाण करण्यात आले
दगावलेल्या कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा असल्याचे कामगार मंत्रालयाचे स्पष्टीकरण
त्यांना कोणत्याही अपघाती विम्याचे संरक्षण नसल्याचा खळबळजनक खुलासा
कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची संवेदनशीलता दाखवण्यात आली नाही
या बेकायदेशीर कृत्याबद्दल सदर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली

 

समितीच्या शिफारशी
हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करावी
कुटुंबीयांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अधिक मनस्ताप देऊ नये
कंपनी व पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवा
खासगी विमानांच्या उड्डाणाच्या सुरक्षेबाबत कडक नियम व्हावेत
खासगी विमानांची देखभाल व दुरुस्तीचे निकष अधिक कडक करावेत
नियमनाचे नियम व यंत्रणा अधिक विकसित करावी
हवाई उड्डाण संचालनालयाच्या संशयास्पद परवान्यांची चौकशी व्हावी
सध्याच्या यंत्रणेतील कमतरता त्वरित भरून काढाव्यात

 

सव्वा कोटीच्या विमानाला ७ कोटींचे संरक्षण, कर्मचारी मात्र वाऱ्यावर
घाटकोपर अपघातातील ते विमान 'यू वाय एव्हिएशन' या खासगी कंपनीचे होते. या कंपनीने ते सिल्व्हर ज्युबिली कंपनीकडून १ कोटी २५ कोटींना खरेदी केले होते. त्याआधी २००८ मध्ये विमानास अपघात झाल्याने त्याचे उड्डाणाचे प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यानंतर त्यातील दुरुस्ती अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा समितीचा ठपका आहे. इतकेच नाही तर सव्वा कोटीच्या या विमानावर कंपनीने जानेवारी २०१७ रोजी ७ कोटींचा विमा काढला आहे आणि त्यातील कर्मचाऱ्यांना मात्र विम्याचे संरक्षण देण्यात आले नाही. याबाबत समितीने शंका उपस्थित केली असून सदर विमा कंपनीचीही चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...