आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधून १५ ऑगस्टपासून सुरू होणार खासगी विमान कंपनीची सेवा; सत्काराला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  -  उद्योग, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या औरंगाबादहून केवळ दोनच विमाने सुरू असल्यामुळे उद्योजक, नेते, व्यापारी तसेच पर्यटकांची अडचण होत असून हवाई वाहतूक वाढवण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश येण्याचीही चिन्हे आहेत.  या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतून १५ ऑगस्टपासून खासगी कंपनी स्पाइसजेटची विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी दिली. ही एअर कनेक्टिव्हिटी मिळाल्यास  विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. 


प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी आयोजित सत्काराला उत्तर देताना इम्तियाज  म्हणाले, शहराच्या विकासासाठी पाठपुरावा हे खासदाराचे कामच आहे. माझ्या प्रयत्नांनी विमानसेवा सुरू होईल. आधी  हे फार अवघड काम नव्हते. जेव्हा मी लोकसभेत निवडून आलो, तेव्हा माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले होते, तुला सरळ करू. परंतु, मला वाटते सरळ करायचे होते तर स्पाइसजेट, इंडियन एअरलाइन्सच्या कार्यालयात जायचे असते. औरंगाबादेत सेवा सुरू केली नाहीत तर तुम्हाला सरळ करू, असे त्यांना बजावायला हवे होते. 
 

 

इम्तियाज यांचे प्रयत्न...
औरंगाबाद, मुंबई येथे विमान प्राधिकरणाशी चर्चा केली. स्थितीचा आढावा घेतला. यानंतर स्पाइस जेट, गो एअर , ट्रू जेट आणि इतर काही खासगी विमान कंपन्यांशी चर्चा केली. त्यानंतर दिल्लीत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून गरज समजावून सांगितली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय दिल्लीत हवाई वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव उषा पाधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्पाइस जेटच्या शिष्टमंडळाने चिकलठाणा विमानतळाची पाहणी केली होती.

 

श्रेयासाठी धडपड, इम्तियाज यांनी सांगितला किस्सा
खासदार इम्तियाज यांनी या वेळी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले,  साडेतीन वर्षांपूर्वी औरंगाबादेत पासपोर्ट ऑफिस सुरू व्हायचे होते. त्या वेळी मी विमानाने मुंबईला जात होतो. तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेही त्याच विमानात प्रवास करत होते. उतरताना मी त्यांना म्हणालो, सर, तुम्ही पुढचे दोन दिवस दिल्लीत आहात का? खैरे  म्हणाले हो आहे. असे का विचारता आहात? मी म्हणालो, ओवेसी साहेब आणि मी परवा दिल्लीत येत आहोत. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालयासाठी निवेदन द्यायचे आहे. ते लगेच उत्तरले, ते कशाला येत आहेत? मी आहे ना. आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो. त्याचा परिणाम हा झाला की दोन दिवसांनी वृत्तपत्रांत सुषमा स्वराज यांना खैरे यांनी निवेदन दिल्याच्या बातम्या फोटोसह झळकल्या. 

 

मंत्री दानवे म्हणतात, विमानसेवेसाठी मंगळवारी केंद्रीय मंत्र्यांकडे बैठक

औरंगाबादेतून जेट कंपनीची विमानसेवा बंद झाल्यामुळे शहरवासीयांची अडचण झाली आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यासाठी येत्या मंगळवारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यासोबतच शहरातील पाणी, रस्ते,कचरा,ड्रेनेज हे प्रश्नही मार्गी लावणार असून शहरातील पाण्यासाठी लागणारा १६९३ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देणार असल्याचे  त्यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री पुरी यांची भेट घेतली होती. १० तारखेला एक पुन्हा बैठक बोलावली आहे. आम्ही विमानसेवेच्या संदर्भातील स्थानिकांच्या  मागण्या, नवीन विमानसेवा कशी असली पाहिजे यासाठी पुन्हा भेट घेणार असून त्यावेळी विमानसेवा सुरू करण्याबाबत आग्रह करणार आहोत, असे दानवे यांनी सांगितले. तसेच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली असून डीपीआर तयार झाला आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...