आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा शहराजवळ खासगी बस-कारची समोरासमोर धडक; 4 ठार, 1 गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - हैदराबादकडून उमरग्याकडे येत असलेली खासगी बस व तुळजापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.४) मध्यरात्री एकच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साई कॉलनीजवळ घडली. बिदर जिल्ह्यातील भालकी व औराद तालुक्यातील पाच जण कारने (टीएस ०७ ईके ५९३९) तुळजापूर येथे देव दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून तुळजापूरहून हैदराबादकडे परतत होते. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान उमरगा शहराजवळील साई कॉलनी समोर आले असता हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी बसने (केए ०१ एसी ३५५०) समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील धनाजी बिराजदार (३५, रा. मुदळ, ता.औराद, जि. बीदर), उमाकांत व्हरांडे (३०, रा. तलवाड, ता. भालकी, जि. बीदर), चंद्रकांत बिराजदार (५८, रा. हिप्पळगाव, ता. औराद, जि. बीदर), दीपक अगसगिरे (२१, रा. दुपतमहागाव (औराद, जि. बीदर) यांचा अपघातात मृत्यू झाला. कारचालक सतीश निडोडे (३२, रा, दुपतमहागाव,औराद, जि. बीदर) हे गंभीर जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. खासगी बस व कारचा समोरासमोर झालेला हा अपघात भीषण असल्याने कारचे मोठे नुकसान झाले असून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली.

  • अरुंद वळण रस्त्यामुळे अपघात

उमरगा शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर साई कॉलनी ते वळण रस्त्यापर्यंत असलेल्या अरुंद रस्त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घटनेची माहिती मिळताच अंतुबळी सभागृहाजवळील युवक व नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. खासगी बस पोलिस ठाण्यात लावण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले. उमरगा पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...