आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफलातून... एकाच दिवशी पुणे मार्गावरील ४६ बसेसवर कारवाई, सहा गाड्या जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दरवर्षी दिवाळीच्या हंगामात खासगी बसवाहतूकदारांकडून प्रवाशांची मनमानी आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे एप्रिल २०१८ मध्ये प्रवासी भाडे आकारणीबाबत खासगी बसेसला शासनाने मर्यादा घालून दिल्या होत्या. त्यानंतरही यंदाच्या दिवाळीत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट वसूल करून खासगी बसवाहतूकदारांनी 'अापली दिवाळी' साजरी केली. प्रवाशांची भरमसाठ लूट झाल्याची बाब प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिवाळीनंतर आठ दिवसांनी लक्षात आल्यावर त्यांनी कारवाई सुरू केली असून,शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत ४६ खासगी बसेसवर कारवाई करत सहा गाड्या जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. 

 

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खासगी कंत्राटी वाहनांचे भाडे दर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने एप्रिल महिन्यात घेतला. यानुसार, खासगी कंत्राटी वाहनांना आता गर्दीच्या हंगामी काळात एसटी महामंडळाच्या बस भाडे दराच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. अमरावती वरून दरदिवशी ७० ते ७५ खासगी बसेस नाशिक, औरंगाबाद, पुण्यासाठी धावतात. इतरवेळी असलेेले तिकीट दर दिवाळी किंवा गर्दीच्या हंगामात आपसूकच दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात आकारले जातात. अमरावती ते पुण्यासाठी जास्तीत जास्त २ हजार ३०० प्रति प्रवासी भाडे घेवू शकतात मात्र यंदाच्या दिवाळीत काही खासगी बसेसमध्ये तब्बल ३५०० ते ३७९१ रुपयापर्यंत प्रति प्रवासी भाडे आकारल्याचे आरटीओंनी मिळवलेल्या माहिती वरूनच पुढे आले आहे. 

 

विशेष म्हणजे प्रवाशांची ही लूट ४ ते ११ नाेव्हेंबर या आठवडाभरात उघडपणे सुरू होती. मात्र या दरम्यान खासगी बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओची यंत्रणा पुढे आली नाही. आता दिवाळीचा संपूर्ण 'सिझन' संपल्यावर अमरावती आरटीओने १६ नोव्हेंबरला रात्रीपासून खासगी बसेसवर कारवाईचे अस्त्र उगारले. आरटीओेंची ही कारवाई म्हणजे 'साप गेल्यावर फरकांडीवर दणका मारणे' अशा वऱ्हाडी म्हणीप्रमाणे असल्याचे संतप्त प्रवाशांनी सांगितले आहे. 

जवळपास १५ ते १६ अधिकाऱ्यांची एक्स्प्रेस हायवेवर कारवाई : दरम्यान शुक्रवारी सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत आरटीओ रामभाऊ गित्ते, उपप्रादेशिक अधिकारी विजय काठोडे यांच्यासह सहायक परिवहन अधिकारी, मोटर वाहतूूक निरीक्षक असे जवळपास पंधरा ते सोळा अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक्स्प्रेस हायवेवर या पुण्याला जाणाऱ्या आणि शनिवारी पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पुण्यावरून अमरावतीत येणाऱ्या ४६ बसेसवर कारवाई केली आहे.

यामध्ये दिवाळीत ज्यांनी अतिरिक्त प्रवासी भाडे आकारले, प्रवासी बसेसवर मालवाहतूक करणे, टॅक्स न भरणे, परमिट इतर राज्यांचे आणि महाराष्ट्रात चालवणे, स्पीड गव्हर्नर नसणे अशा विविध कमी असलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये एआरटीओ प्रशांत देशमुख, मोटर वाहन निरीक्षक डी. एस. कदम, ए. एन. खेमनार, वाय. जी. मालठाणे, डी.पी. सुरडकर, ए. बी. पाटील, प्रफुल्ल मेश्राम यांचा समावेश होता. 

 

अमरावती ते पुणे जास्तीत जास्त २३०० रुपये घेऊ शकतात भाडे : राज्यशासनाने २७ एप्रिल २०१८ ला खासगी प्रवासी वाहतूकदारांसाठी कमाल तिकीट दर निश्चित केले आहे. एसटी महामंडळाच्या टप्पा वाहतुकीच्या सद्यःस्थितीत प्रती किमी भाडे दरापेक्षा ५० टक्क्यापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. 

 

म्हणजेच महामंडळांच्या शिवशाही स्लीपर बसचे अमरावती ते पुणे भाडे दिवाळीत १५५० रुपये असेल तर खासगी बस २३०० रुपयांपेक्षा अधिक घेवू शकत नाही. मात्र आरटीओने केलेल्या तपासणी तसेच काही खासगी बसेसच्या कार्यालयातून प्राप्त केलेल्या रेकॉर्डनुसार ११ नोव्हेंबरला सात खासगी बसेसमध्ये ३५००, ३७९१ रुपये प्रति प्रवासी असे भाडे आकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत आरटीओ पथकांकडून तपासणी 
प्रवाशी करू शकतात तक्रार : खासगी बसेसमध्ये अतिरिक्त तिकीट दर आकारला जात असेल तर प्रवाशी ०२२-६२४२६६६६ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच www.transport.maharashtragov.in या संकेतस्थळावर तक्रार करू शकतात. 

 

यापूर्वीच हवी होती कारवाई 
वास्तविकता: दिवाळीत लूट सुरू असल्याचे आरटीओच्या यंत्रणेला माहिती नव्हते, असे नाही. लूट झाल्याची लेखी तक्रार अद्यापही एकाही प्रवाशाने आरटीओकडे केली नाही. मात्र खासगी बसचे भाडे किती, हे विविध बेबसाइट व अॅपवरच दिसत असल्यामुळे अारटीअाे अधिकाऱ्यांनी स्वत:हून दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित हाेते. मात्र सर्वसामान्यांच्या नजरेत धूळ फेकून खासगी वाहतूकदारांनी दिवाळीत प्रवाशांची आर्थिक लूट केली आणि आता आरटीओने कारवाईसुद्धा केली. हा प्रकार म्हणजे विचित्र आणि सर्वसामान्य प्रवाशांना समाधान देणारा दिसत नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. 

 

प्रवाशांच्या जिवाशी खेळ 
आरटीओने जप्त केलेल्या सहा बसेसमध्ये तीन बसेस या तर अमरावती ते पुणे प्रवासी वाहतूक करूच शकत नाही. कारण त्यांना असलेले परमिट हे महाराष्ट्रा बाहेरच्या राज्याचे आहे. अशा वाहनांंचा अपघात होवून जीवितहानी झाली तर विमासुद्धा मिळू शकत नसल्याचे आरटीओ गित्ते यांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे प्रवाशांच्या जिवितासोबत खेळच आहे. याचवेळी तीन बसेसने नियमित कर भरणा केला नसल्यामुळे त्या जप्त केल्या आहेत. 

 

२५ डिसेंबरपासून पुन्हा कारवाई 
दिवाळी दरम्यान अनेक खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेतल्याचे आमच्या तपासणीत पुढे आले आहे. मात्र दिवाळीच्या वेळी कारवाई केली असती तर प्रवाशांची गैरसोय झाली असती. आता ४६ खासगी बसेसवर कारवाई करून सहा बसेस जप्त केल्या आहेत. इतर चाळीस बसेसवर दंड ठाेठावण्यात येणार आहे. एकाच वेळी ४६ बसेसवर कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान पुढील महिन्यात नाताळच्या वेळी खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे घेण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू करणार आहे. रामभाऊ गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी. 

 

बातम्या आणखी आहेत...