आमने-सामने: प्रिया V/S पूनम; वडिलांची पुण्याई कामी येणार की स्वकर्तृत्व तारणार

चंद्रकांत शिंदे

Apr 13,2019 09:45:00 AM IST

मुंबई - राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांना भाजपने २०१४ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या आखाड्यात उतरवले. दत्त कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात पूनम महाजन यांनी करामत दाखवत प्रिया दत्त यांना १ लाख ८६ हजार मतांनी हरवले. खरे तर या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसचे प्राबल्य असताना काँग्रेसवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, नरेंद्र मोदी यांची लाट आणि शिवसैनिक खंबीरपणे मागे उभे राहिल्याने पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला. त्यानंतर गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात त्यांनी भाजपची ताकद चांगलीच वाढवली आहे. दुसरीकडे प्रिया दत्त या काहीशा अनिच्छेनेच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने व काँग्रेसमध्ये आपसातच सुंदोपसुंदी सुरू आहे.

या मतदारसंघात जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, वाकोला आदी भागांचा समावेश आहे. या ठिकाणी चित्रपट तारे-तारका मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागात दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, गुजराती असा बहुभाषिक, बहुधार्मिक समाज असून उच्चभ्रू वस्तीसोबतच झोपडपट्टीधारकांची संख्याही मोठी आहे. मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून ही मते विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरवतात. पूनम महाजन यांनी मतदारसंघात २० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगितले जाते. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी २०१९ पर्यंत या मतदारसंघातून ९० हजार मतदार विविध कारणांमुळे कमी झालेले आहेत. कमी झालेल्या या मतदारांचा कोणाला फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

व्यक्तिमत्त्व

प्रिया सुनील दत्त

माजी खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी ही प्रिया दत्त यांची ओळख. त्यांच्या पुण्याईमुळेच २००४ मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला. २००९ मध्ये त्या उत्तर मध्यमधून जिंकल्या. मितभाषी, गांधी कुटुंबीयांशी चांगले संबंध. यावेळी स्थिती वेगळी आहे. त्यांनी कुटुंबाला वेळ देण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय बदलला आणि निवडणुकीस उभ्या राहिल्या.

पूनम प्रमोद महाजन

पूनम महाजन या भाजपचया फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. प्रमोद महाजन यांची मुलगी ही जशी त्यांची जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे सतत कार्यरत राहणे ही त्यांची खासियत आहे. मतदारसंघात नेहमी फिरत राहिल्याने मतदारांच्या समस्यांची चांगली जाण. महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय, भाजप आणि शिवसेनेत चांगली इमेज. पाच वर्षात मतदारसंघ बांधण्याचे चांगले काम.

विजयाचे गणित

प्रिया दत्त

२०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर मतदारसंघात फेरफटका नाही. काँग्रेस बैठकांनाही उपस्थित नाही. २००९ मध्येही निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरकल्या नव्हत्या त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी. मात्र काँग्रेस कार्यकर्ते प्रिया दत्त यांच्यासाठी जिवाचे रान करत आहेत.

पूनम महाजन

पाच वर्ष मतदार संघात केलेले काम, विमानतळाजवळील झोपडपट्टीचे पुनर्वसन, सैन्यदलाच्या आणि कलेक्टरच्या ताब्यातील जमिनीवरील बांधकामांना सूट मिळवून देण्याचे काम, शिवसेना आणि भाजप नेते, कार्यकर्त्यांशी चांगले संबंध.

एक्स फॅक्टर

प्रिया दत्त

मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये सहानुभूती. सेलिब्रिटींचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता. दोन वेळा खासदार असल्याचा अनुभव. मते फिरवण्याचीही शक्यता.

पूनम महाजन

२४ तास कार्यरत, वडिलांच्या पुण्याईमुळे पक्षात चांगले स्थान, खासदार म्हणून चांगली कामगिरी, मतदारसंघात चांगला संपर्क, युतीचे कार्यकर्ते सांभाळून घेण्यात यश.

X
COMMENT