आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कभी कभी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेमातल्या दर्शनीय रोमान्सचा भारतीय मनावर खूप पगडा आहे. प्रेमाचे प्रदर्शन त्याला कसे अपवाद असणार! अनेक चित्रपट प्रेम आणि लग्नानंतरची पहिली रात्र या संकल्पनेभोवती फिरताना दिसतात. ‘आली हासत पहिली रात’ जाऊन ‘अरे संसार संसार’ म्हणायची वेळ येते तरीही पहिल्या रात्रीचे आकर्षण कमी होईल का?


लग्न ठरले की, आईवडिलांची मंगल कार्यालय शोधायची धावपळ सुरू होते आणि भावी वर-वधू स्वप्नं रंगवायला लागतात ती पहिल्या रात्रीची आणि मधुचंद्राची. लग्नाआधीच्या चोरट्या भेटीची मजा काही औरच पण लग्नानंतर मिळणारा हा जो एकांत असतो, तो अगदी हक्काचा. मंत्रोच्चारांबरोबर चार अक्षता डोक्यावर पडल्या की भेटीचा संदर्भ बदलतो. तो माणूस आपला होतो, निदान त्या क्षणाला तरी आयुष्यभराकरिता.


तसे म्हटले तर नवरा असतो फणसासारखाच. आत गोड, बाहेर  काटेरी. तरीही गोड मानून घ्यायचा आणि बायको तर कायमच चंद्राप्रमाणे. सुंदर तरीही अनेक वेळा तिच्या मूडप्रमाणे दूरस्थसुद्धा. लग्नाला काही महिने उलटले की स्त्रीचे मन ब्रह्मदेवालाही कळणार नाही हे पटायला लागते. दोन तासाचा सहवास आणि चोवीस तास एकत्र यात जमीन - अस्मानाचा फरक असतो. मग जेवतानाचा मचमच आवाज खटकायला लागतो, तयारीला उशीर व्हायला लागला की  डोक्यावर आठ्या चढतात. सोवळा वाटणारा नवरा एखाददुसरा पेग रिचवतो हे समजते. नवीन बूटही पायाला लागतो मग माणसाचे काय?


‘आली हासत पहिली रात’ जाऊन ‘अरे संसार संसार’ म्हणायची वेळ येते तरीही पहिल्या रात्रीचे आकर्षण कमी होईल का? आताच्या काळात अगदी लग्नाआधीसुद्धा साजरी झाली तरी! हिंदी सिनेमातल्या  दर्शनीय रोमान्सचा भारतीय मनावर खूप पगडा आहे. प्रेमाचे प्रदर्शन त्याला कसे अपवाद असणार! मंद प्रकाशात सजवलेले शयनगृह, जळणारे दिवे, फुले जडवलेला पलंग, पांढऱ्याशुभ्र चादरीवर गुलाबांच्या पाकळ्यांची पखरण, त्यावर हातभार घुंघट घेऊन बसलेली नायिका, शेजारच्या टेबलवर ठेवलेला दुधाचा ग्लास आणि शेरवानीत नटलेला नवरदेव या सर्व घटकांनी आणि पात्रांनी या पहिल्या रात्रीची खुमारी अजूनच वाढवली आहे. प्रेम या एकाच कल्पनेवर तगलेल्या चित्रपटात, नायकनायिका बोहल्यावर चढले की, पडद्यावर ‘द एन्ड’ची अक्षरे उमटतात. काही चित्रपटात मात्र लग्नाच्या या पहिल्या रात्रीला महत्त्व दिले आहे. अनेक वेळा या रात्रीने सिनेमाला एक वेगळीच कलाटणीसुद्धा दिली आहे. पहिल्या रात्रीची ही गाणी.
चौदवी का चाँद हो, या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजबाब हो
तू पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल आहेस की सूर्यासारखी तेजस्वी, ते मला सांगता येणार नाही, पण तू जी कोणी आहेस तशी या जगात दुसरी कोणीही आढळणार नाही. आजसुद्धा वहिदा रहमान यांचे सौंदर्य नावाजणारे अनेक चाहते आहेत. वाहिदाच्या सौंदर्याला मानाचा  मुजरा देताना शकील बदायुनी म्हणतात,
चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कँवल
या जिंदगी के साज़ पे छेड़ी हुई ग़ज़ल
जाने बहार तुम किसी शायर का ख्वाब हो
चौदहवी का चाँद हा मुस्लिम सोशल होता. बुरख्यात दडलेले सौंदर्य असे उघडे, तेही स्वतःपासून मिठीच्या अंतरावर! शाहिराच्या भावना उचंबळतात त्यात नवल ते काय! मोहंमद रफी यांना या गीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरवले गेले.
पहिली रात्र कभी कभी या सिनेमातसुद्धा आहे. तीच फुलांची शेज, दिव्यांनी उजळलेली रात्र, नववधूच्या पोशाखात सजलेली राखी आणि तिच्या सौदर्याने मोहित झालेला शशी कपूर. हे लग्न ठरवून झालेले. नायिकेने ते मान्य केलेले. या रात्रीला मात्र एक अंधारी कड आहे. 
नायिकेचे प्रेम असते एका शायरवर. घरात ती आपल्या भावना सांगू शकत नाही आणि तिचे लग्न दुसऱ्याबरोबर होते. पहिल्या रात्री, तिला तिचा नवरा एक गीत गायला सांगतो. हे गीत असते त्याच्या आवडीच्या शायरचे, जो तिचा आधीचा प्रियकर असतो.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझ को बनाया गया है मेरे लिये
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये
या गीतातील भावना शायरच्या स्वतःच्या असतात, त्या त्याच्या प्रेयसीसाठी असतात पण त्यावर आता हक्क मात्र दुसऱ्या कुणाचा असतो. गाणे जरी लताबाईंच्या आवाजात आहे तरीही “सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं” या दोन ओळी मुकेशच्या आवाजात आहेत.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे बजती हैं शहनाइयां सी राहों में
सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं
सिमट रही है, तू शरमा के अपनी बाहों में
प्रेम कितीही विसरायचा प्रयत्न केला तरीही तो प्रयत्नच असतो. कधीतरी तो प्रयत्न  यशस्वी होतो किंवा अनेक वेळा हृदयाच्या खोल टप्प्यात त्याचे दफन केले जाते. अशा अनेक सुहाग रात्री, कधीकाळी केलेल्या प्रेमाचे स्मारक म्हणूनही उरतात. एका बाजूने, आता जे नाते निर्माण झाले आहे, ते निभावायचा निर्धार आणि दुसऱ्या बाजूने डोळ्यात साठणारे पाणी. राखीचा अप्रतिम अभिनय, साहिर लुधियानवी यांचे शब्द, खय्याम यांनी त्यावर चढवलेला साज आणि लताबाईंचा स्वर यामुळे हे गीत केवळ श्रवणीय नाही तर नेत्रसुखदसुद्धा झाले आहे.
{{{

बातम्या आणखी आहेत...